पश्चिमेतला तुकाराम

Date: 
Sun, 13 Nov 2011

तुम्ही सॉक्रेटिसला धर्म विचारयला गेला असता, तर त्याने सांगितले असते, “सत्य.”
“सत्यानास्ती परो धर्म:” म्हणजे भारतीय धर्मानेच म्हणून टाकले आहे की सत्यापेक्षा मोठा धर्म नाही.
सॉक्रेटिसच्या नावावर एकही ग्रंथ नाही. त्याचे नाव माहीत झाले, ते केवळ प्लेटो या परमशिष्याने “संवाद” हे पुस्तक लिहिले, म्हणून. सॉक्रेटिसबरोबर झालेले संवाद त्याने लिहून ठेवले आहेत. या गुरूनेच शिष्याला सांगून टाकले, “प्लेटो तू मला मोठा मानतोस हे ठीक आहे. पण लक्षात ठेव, सत्य माझ्यापेक्षा मोठे आहे. “
शांत नवरा आणि कजाग बायको एवढेच तुकारामाशी सॉक्रेटिसचे साम्य नव्हते. दोन बायका हेही त्याचे तुकारामाशी साम्य होते. महान तत्ववेत्तेपण हे तिसरे साम्य होते. दारिद्रय हे चौथे साम्य. त्या दारिद्यातही दुसऱ्याचा ओशाळेपणा नको असणे, हे पाचवे साम्य. गद्य, पद्य हा फरक सोडला तर अत्यंत सोप्या भाषेत जनतेला शहाणे करण्याचे सामर्थ्य हे सहावे साम्य.
दोघांचाही जनतेने केलेला छळ हे सातवे साम्य आणि भांडणाऱ्या बायकोचे आतून अतीव प्रेम हे आठवे साम्य.
ग्रीसमधल्या त्या महापुरुषाला विष खाऊन मरण्याची शिक्षा ठोठावली गेली. वय सत्तर. न्यायाधिशांनी विचारले, “काही सांगायचं आहे का? दुसरी काही सौम्य शिक्षा आम्ही करावी का? “
सॉक्रेटिसने सांगितले, “अथेन्सच्या राजाने मला ऑलिंपिक विजेत्याप्रमाणे मान द्यावा. “
या उध्दट प्रत्युत्तराला न्यायाधिशांनी हेमलॉक विष पिऊन मरण्याची शिक्षा दिली. आरोप दोन होते. देवाची अवज्ञा व लोकांना बिघडवणे. सॉक्रेटिसने दोन्ही नाकारले. तो न्यायाधिशांना म्हणाला, “मी मरणार आहे. तुम्ही जगणार आहात. माझे मरण महनीय आहे. तुमचे जगणे दयनीय आहे. “
क्रीटो हा त्याचा श्रीमंत मित्र. सॉक्रेटिसला तुरुंगातून पळवून न्यायचा कट, क्रीटोने केला. सॉक्रेटिस क्रीटोला म्हणाला, “जिथे तू मला पळवून नेणार आहेस तिथे मला कधीच मरण येणार नाही, अशी तुझी खात्री आहे? “
पण फाशीची अंमलबजावणी करणारा अधिकारीच ढसाढसा रडू लागला. त्याने तोंड फिरवले. सॉक्रेटिसने आपले तोंड विषाजवळ नेले. तो विष प्याला. एखाद्या मरणाने जग रडते तेव्हा त्या आयुष्याच्या श्रेष्ठतेचे शिफारसपत्रकच असते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView