पापाचा इन्कार हेच पाप

Date: 
Sat, 9 Jun 2012

आकाशत पक्षी परतीला लागले होते. तांबडं विरत चाललं होतं. काळं परसरत चाललं होतं.
खाली दाट झाडांनी अधिक अंधारी केलेली. नारदांची पायवाट रोखून एक भव्य आकृती नारदांना दरडावीत होती, “काय असेल ते मुकाट्याने द्या. “
नारद हसत सुटले. ते म्हणाले, “ही भोपळ्याची बांधलेली वीणा तेवढी माझ्याजवळ आहे. मग म्हणशील वाल्या, तुझ्या हातात मी भोपळा दिला म्हणून - “
आपण पुढे उभे राहिल्याबरोबर समोरचा माणूस थराथरा कापायला लागायचा, हे वाल्याने जन्मभर पाहिले. त्याऐवजी खदाखदा हसणारे नारद पाहून तो स्वत:च भ्यायला. निर्भयता पाहिली की भय स्वत:च भितं. नारदांनाच वाल्याची कीव आली. ते म्हणाले, “ अरे वा रे वा, माझ्याजवळ काही असतं तर तुझ्या जंगलात मरायला मी कशाला आलो असतो? पण तू तरी लोकांना लुबाडून नरकाची धन कशाला करतो आहेस? त्याचं शासन भोगायला तुझी बायको, तुझ्या यातनांचा वाटा उचलणार आहे का हे तिला जाऊन विचार. “

वाल्याला काय वाटलं कोणाला ठाऊक? त्याला खरंच वाटलं, एकदा बायकोला तरी विचारावं. तो परत गेला. बायकोपुढे जाऊन उभा राहिला. आणि तिला विचारण्यासाठी त्याने तोंड उघडलं, तेव्हा त्याचे डोळेही उघडले.
वाल्याची बायको डाफरली, “तुम्ही चोऱ्या करून पैसा आणा, नाही तर भीक मागून पैसा आणा. त्याच्याशी माझा काय संबंध आहे? मी तुमची बायको आहे. संसाराला लागणारं सामान आणून देणं, तुमचं काम आहे. आणि ते कसं आणता हे पहाणं तुमचंच काम आहे. “
बायकोचा मुद्दा तर बरोबर होता. वाल्याला काही बोलता येईना. घरातल्या कामाची ती धनी होती. बाहेरच्या श्रमाची वाटणी नवऱ्याकडे होती. मुलाबाळंाना काही विचारायची सोयच नव्हती. बाहेरचं काम असून त्यांना माहीत नव्हतं आणि घरातलं काम आई त्यंांना देत नव्हती. छाप पुण्याचा पल्ला त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता.
वाल्या सुन्न झाला. तो नारदाला लुटायला गेला होता, आणि नारदाकडूनच लुटला गेला होता. नारदानं त्याच्या अनीतीचं हरण केलं होतं.
पापातून मिळालेली सुटका एवढी सुखद असते, याचा मनोरम अनुभव वाल्याने घेतला आणि त्याची आध्यात्मिक ओढ वाढली. नारदाकडे तो अतिशय नम्रतेनं परतला आणि म्हणाला, “महाराज, मी कशानं शुध्द होईन? गंगेच्या पाण्यांन? “
“नाही वालोबा. शीतल जलानं अशी शुध्दी होत नाही. ऊष्ण पश्र्चात्तापानं अशा पापाची शुध्दी होते. आणि त्याच्या मागोमाग केलेल्या तपानं.”
वाल्या तपाला बसला. अंगातली रग, अंगातला सगळा निश्र्चय यानं तपाच्या बैठकीला अर्पण केला. त्या बैठकीतून तो उठला तो वाल्मिकी म्हणूनच. पाप हा गुन्हा नसतो. पाप नाकारणं हा गुन्हा असतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView