पापाशी एकनिष्ठता

Date: 
Sun, 2 Oct 2011

दुर्योधनाने शांतपणे उत्तर दिले, “वाईट काय ते मला समजतं, पण ते टाकवत नाही. चंागलं काय ते मला समजतं, पण ते धरवत नाही. “
चांगले धरवत नाही आणि वाईट सोडवत नाही, हे दुर्योधनाचे उत्तर अशा प्रश्र्नाला होते की, तू असा खुनशीपणाने का वागतोस?
दुष्ट माणसाचा धर्म, दुष्टपणाने वागणे हाच असतो. ‘धर्म’ या शब्दाचा मूळचा अर्थ नियम, सहज प्रवृत्ती, असा आहे. तो आपण पंथाच्या अर्थाने वापरतो.
दुर्योधन दुष्टपणे का वागत होता, याचे सर्वात प्रामाणिक उत्तर त्याने दिले होते.
भतृहरीने माणसाच्या चार प्रवृत्ती सांगितल्या आहेत. पहिल्या तऱ्हेची माणसे अशी की स्वत:चे वाटोळे झाले तरी चालेल, पण दुसऱ्याचे चांगले करायला तडफडतात. दुसऱ्या प्रकारची माणसे अशी की, ती स्वत:चे पोट भरल्यावर दुसऱ्याचे भले करण्यासाठी प्रयत्न करतील. तिसऱ्या प्रकारची माणसे अशी की, जी स्वत:चे चांगले व्हावे म्हणून दुसऱ्याचे वाटोळे करायला मागेपुढे पाहणार नाहीत. आणि चौथ्या प्रकारची माणसे अशी की जी दुसऱ्याचे वाटोळे करण्यासाठी स्वत:चा नाश करून घेण्यास तयार होतील.
महाभारत वाचले म्हणजे लक्षात येते की धृतराष्ट शरीराने व मनाने आंधळा होता. विवेकशून्य होता, ढोंगी होता, त्या मानाने दुर्योधन अधिक प्रामाणिक, स्वत:चे दोष न लपवता आणि उन्मत्तपणाचा अतिरेक, असा होता.
म्हणूनच धृतराष्ट्राची अखेर पश्चातापदग्ध अवस्थेत, जळत्या वनात झाली. जळत्या मनाने अखेर त्याच्या शरीरालाही पेट दिला. दुर्योधनाची अखेर, पराभवात झाली. पण त्याने उन्मत्तपणा आणि दुरुत्तरे सोडली नव्हती. दुर्वर्तनाशी दुर्योधन प्रामाणिक राहिला. सामान्य माणसाला दुर्योधन होता येणार नाही. त्याने निदान अर्जुनाच्या पातळीवर तरी पोहचावे. दुर्देवाने सामान्य माणूस पुण्यावर विश्र्वास ठेवतो; पण पुण्य करीत नाही. पापावर विश्र्वास ठेवत नाही, पण तेच करीत राहतो. आपण त्रिशंकूचे वारस आहोत. तीच काय, पण तीनशे शंका घेतलेले.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView