पालखीच्या पलीकडे

Date: 
Sat, 10 Mar 2012

पालखी हिंदकळली. धक्का बसल्यामुळे, संतापाने लाल झालेला राजा, पालखी धरलेल्या जडभरतावर खेकसला, “बेअकल्या तुझे लक्ष कोठे आहे? “
‘बेअकल्या’ हा शब्द ऐकल्याबरोबर जडभरत मागे फिरला. दोन जन्मापूर्वी जडभरत हा भरताच्या अवतारात होता. त्या जन्मात, संसार सोडून एका नदीकाठी तो राहात असे. एक दिवस सिंहाच्या झेपेत सापडत असलेली हरणी भितीने गर्भगळीत झाली होती. आणि त्या प्रसंगात निर्माण झालेले छोटेसे पाडस, भरताने पाळले. पाहता, पाहता, सर्व संगपरित्याग केलेल्या भरताची माया, त्या गोजिरवाण्या पाडासावर जडली. आणि ती माया भरताच्या साधनेतसुध्दा व्यत्यय आणायला लागली. मरतानाही, त्या हरणाचे कसे होईल ही चिंता भरताला होती. पुढल्या जन्मात स्वत: भरतच हरणाच्या जन्माला आला. पण गेल्या जन्मी जी काही साधना केली होती, त्यामुळे हरिण जन्मात त्याची पूर्व स्मृति कायम राहिली. हरणाचा कळपसुध्दा ऋषी मुनिंच्या आश्रमात हिंडे.
कानावर पुण्य शब्द पडत. म्हणून तिसरा जन्म जडभरताचा आला. दोन जन्मातील स्मृती कायम राहिली. मागले धडे लक्षात ठेवून, या वेळी जडभरतानं ठरवून टाकलं की काही झालं तरी मायेत गुरफटायचे नाही. कोण काही बोलो आपण शांत रहायचे. या जन्मातील त्याच्या भावजया, जडभरताला छळत. तरी तो शांत राही. असंच एकदा राजाची पालखी घरावरून जात असताना, त्याचा एक भोयी आजारी पडला. त्याच्या ठिकाणी त्या भावजयांनी जडभरताला उभा केल, आपल्या पायाखाली जंतु किडुक मरू नये म्हणून जडभरत काटेकोरपणाने काळजी घेत होता. त्यामुळेच पालखी हिंदकळली आणि राजा रागावला.
जडभरताने मान फिरवून विचारले, “तुम्ही बेअक्कल कोणाला म्हणालात? माझ्या शरीराला म्हणाला असाल, तर माझे शरीर ज्या पंचमहाभूताचे केलेले आहे त्याच्यावर तुमच्या रागाचा काही परिणाम होणार नाही. “
राजा चमकला. विचार करायला लागला.
जडभरत पुढे म्हणाला, “आत्मा तर सगळीकडेच भरलेला आहे. तो तुमच्या बोलण्याच्या ओठात आणि माझ्या ऐकण्याच्या कानांत सारखाच आहे. “
राजाला उत्तर सुचले. तो म्हणाला, “मी तुझ्या मनाला बेअक्कल म्हणालो”

“हत्तीने बेडकाला ‘तू माझ्यापेक्षा लहान आहेस’ असे म्हटले म्हणून निराळे काय साधेल? प्रत्येक मन कमजास्त निराळे असतेच. लहान मोठ्या लायकीचे असतेच. “
राजा चांगलाच हादरला. मनातला हा कमीजास्तपणा कमी करण्यासाठी समतेच्या लक्षासाठी धर्माची धडपड असते. राजा पालखीतून खाली उतरला. जडभरताला त्याने पालखीत बसविले आणि आपण पालखी खांद्यावर घेतली. ज्या निर्विकारतेने जडभरत पालखी खाली होता, त्याच निर्विकारतेने पालखीत आत्मरत राहिला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView