पुण्याची जुगलबंदी

Date: 
Sun, 9 Oct 2011

छोट्याशा रुपेरी कट्यारीसारखी ती लखलखीत माणुसकी, महर्षी मनुुंच्या पुढे तळपत होती.
इवल्याशा त्या माशाच्या तळपत्या कट्यारीकडे महर्षींनी कौतुकाने पाहिले. तो चिमणा जीव महर्षींना जणु म्हणत होता, “मला वाचवा”
महर्षी जलाशयातून बाहेर आले. त्यांनी तो रुपेरी जीव, छोट्याशा खड्‌ड्यात ठेवला. मासा मोठा होऊ लागला, तसा जलाशयही वाढू दिला आणि अखेर तो मासा, भला मोठा झाल्यावर त्याला समुद्रात सोडून दिले. मात्र माशाने संागितले होते, की लवकरच महापूर येणार आहे; तेव्हा महर्षींनी पर्वताच्या उंच शिखरावर जाऊन प्राण वाचवावा.
लौकरच प्रलय झाला. कोणी म्हणून उरले नाही. फक्त मनु वाचला. अवाढव्य झालेल्या माशाच्या शरीराचा, मनुला भरीव उपयोग झाला.
ही गोष्ट शतपथ ब्राह्मणात आली आहे. या गोष्टीचे जणु काही प्रतिबिंब पडावे तशी ओल्ड टेस्टामेंट मधली नोव्हाची गोष्ट आहे जेनेसिसमध्ये, म्हणजे उत्पत्तीप्रकरणात ती सात ते दहा या भागात सांगितली आहे. नोव्हा हा देवभीरू आणि परोपकारी मनुष्य होता.
मात्र येथे खुद्द देवानेच नोव्हाला महाप्रलयाचा इशारा दिला होता. सात दिवसांची ती पूर्वसूचना होती. चाळीस दिवसरात्र, पावसाचे प्रचंड आवर्त येणार होते. पृथ्वी बुडून जाणार होती. या प्रलयातून नोव्हाबरोबरच प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी वाचू शकली. प्रलय संपल्यानंतर त्यातूनच सृष्टीची उत्पत्ती पुन्हा होणार होती. दिडशे दिवसपर्यंत पाण्याने पृथ्वी व्यापून टाकली होती. फक्त नोव्हा, त्याचे नातेवाईक व पशुपक्ष्यांच्या ह्या दुकली; तारवात बसल्या होत्या म्हणून वाचल्य होत्या.
आकाशातून हत्ती-सोंडेचा पाऊस थांबला. झरे झरत गेले. जमीन कोरडी झाली. आणि सृष्टी पुन्हा जागून उठली.
मनु आणि नोव्हा यांच्यामध्ये कालांतर व स्थलांतर होते. पण वृत्तीत अंतर नव्हते. जणू दोघांच्या पुण्याची जुगलबंदी जगाने पाहिली. स्वत:च्या कल्याणासाठी झगडणारा माणूस धर्मनियमांच्याच चमत्काराने अनंत काळा कीर्ती मिळवतो. नोव्हा आणि मनु निरनिराळे असतील. त्यांना अक्षय कीर्ती देणारा परमेश्र्वर एकच असला पाहिजे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView