पुराणातील समता श्रेष्ठत्व

Date: 
Sat, 24 Mar 2012

पुराणातील समता श्रेष्ठत्व
‘पुराणमतवादी’ हे प्रतिगामीपणाचे आप-वर्णन आपण अनेकदा ऐकलं. पण याच पुराणात गरीबांना दान करून भिकारी झालेल्या महात्म्यांच्या कथा पानोपानी विखुरलेल्या आहेत. शिबीसारखं पक्ष्यांनाही समान रक्षण देणारे राजे आपल्याला तेथे आढळतात. गीतेने ब्राह्मण, चांडाळ, कुत्रा यांना एकाच पंक्तीला बसवले आहे. ही पुराणे वाचूनच नामदेव स्वत:ची भाकरी पळवणाऱ्या कुत्र्यामागे तुपाची वाटी घेऊन धावला.
पुराणातही नसेल असे नाही. कोणी स्वत:च्या स्वार्थाने वाटेल त्या कथा घुसडल्या आहेत. कोणी अन्यायी चमत्कारही घुसडले आहेत. पण अखेर व्यासाने सर्व पुराणाचे सार परोपकार हेच सांगितले आहे.
त्या साराचे सार हरिश्र्चंद्राच्या कथेतही मिळते. मार्कंडेय पुराणाच्या पहिल्या नऊ अध्यायात ही कथा आहे. विश्र्वामित्राला राज्यदान करणारा तो हरिश्र्चंद्र. दक्षिणेसाठी स्वत:ला विकून घेणारा हरिश्र्चंद्र म्हणून बहुतेकांना माहीत असेलच.
पण या सगळ्या परीक्षांची परीक्षा हरिश्र्चंद्र उत्तीर्ण झाल्याचे किती जणांना माहीत असेल?
सत्याच्या आणि त्यागाच्या तपाचे पुण्य मेरु पर्वताएवढे वाढल्यावर हरिश्र्चंद्राला स्वर्गाचे फळ मिळणे प्राप्तच होते.
इंद्र ते आपले देणे चुकते करण्यासाठी हरिश्र्चंद्रासमोर साजिरा झाला.
सगळी पुण्यवान प्रगता, हा वैभवशाली सोहळा पाहण्यासाठी आतूर उमाळ्याने उभी होती.
हरिश्र्चंद्र छातीवर दोन हात बांधून उभा होता. तारामती-रोहिदास शेजारी साथ करीत होते. सर्वांची एवढीच अपेक्षा होती की हरिश्र्चंद्र आपल्या पत्नी व पुत्र यो दोन साथींच्यासाठीही स्वर्गाचे हक्क मागेल.
हरिश्र्चंद्र डोळ्यांची उघडझाप करीत स्वस्थ राहिला. त्याच्या घुटमळण्याचा अर्थच लोकांना कळेना. अ-पुण्यवान माणसांनासुध्दा, पुष्कळदा पुण्यवंताना मिळालेले सुख पाहतांना आनंद होत असतोच.
तो आनंद हरिश्र्चंद्राने पाहणाऱ्यांना मिळू दिला नाही. त्या उत्सुक श्रोत्यांना व इंद्रालाही धक्का देत हरिश्र्चंद्र म्हणाला, “हे देवेंद्रा, मी तो स्वर्ग घेणार नाही. तू माझ्या वाटचे सगळे पुण्य या प्रजाजनांना सारखे वाटून दे. त्यात माझ्या वाट्याला एक दिवस आला तरी पुरे. “
स्वर्ग ही उच्च मनाची अवस्था असते. हरिश्र्चंद्र डोंबाच्या घरीसुध्दा मनाने कर्तव्यसुखाच्या स्वर्गातच राहात असला पाहिजे. भारतीय संस्कृती मोठी केली ती बाष्फळ चमत्काराने नव्हे, तर विचाराच्या अशा त्यागी दृढतेने.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView