बासरी बेभान लढली

Date: 
Sun, 7 Apr 2013

कृष्णजन्माच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा आठवण्याजोगा प्रसंग म्हणजे त्या बालराजानं केवळ मुरलीच्या हत्यारानं महानाग कालिया जिंकला, त्यावेळचा.
कृष्ण अशा खुबीनं मुरलीच्या स्वरमाला फेकत होता की त्या निरनिराळ्या दिशेनं येत आहेत असं काळनागाला वाटावं. उंच, मध्येच खाली, थरथरलेली, थबकती, गोड, गहिरी, मृदू, मारकी अशी बासरीची आवर्तनं कालियाभोवती फिरू लागली. कालिया पुरता गोंधळून गेला. कृष्णानं त्याला हातही लावला नव्हता पण त्याला स्वरांनी पुरता वेढून टाकला होता. जसं अनयाला आपल्या विळविळत्या देहानं काळनागानं वेढून टाकलं होतं, तीच अवस्था कृष्णाच्या लहर सुरांनी काळनागाची करून टाकली.

मुंगुस आणि साप यांची लढाई होते तेव्हा मुंगुस जिंकतं आणि साप हरतो. मुंगुंसाला विषाचं शस्त्र जवळ नसूनही लढाई जिंकता येते. मुंगुासाची मुजोरी विषात नसते, त्याच्या चपलतेत असते. कृष्णाचं मुंगुसनृत्य नकुलाधिपतीलाही मागे टाकणारं होतं. हां हां म्हणता कृष्णानं लय वाढवली. सगळीकडे भिरभिर फिरणारा तो कृष्ण पाहाता पाहाता काळनाग थकून गेला. शत्रूचा अनिश्र्चय वाढवणं नेहमी अर्धी लढाई जिंकतो. कृष्णानं नव्वद टक्के लढाई शत्रूला प्रक्षुब्ध करूनच जिंकत आणली. प्रक्षुब्धतेचं प्रलयगीत गात कृष्णाची पावलं नाचत होती. जणु काही ती नागाच्या डोक्यावरच नाचत होती. कृष्ण गोपाळांच्याबरोबर, गोपींच्या बरोबर नाचतो. म्हणून त्याला नावं ठेवणारे महावीर, मूग गिळून दुरूनच हे मृत्यूसाथीबरोबरचं कृष्णाचं नाचणं पाहात होते. कृष्णाच्या नाचण्याचा असा मर्मग्राही अर्थ निंदकांना एरवी गैरसोयीचा होता. पण आता नृत्याचं ते उपयोगवैभव त्यांच्या डोळ्यासमोरच नाचत होतं.
एकेका फुत्काराची फेक काळनाग अजूनही फेकत होता. ज्या फेकीच्या सपाट्यात एरवी आलेला खग स्वर्गस्थ झाला असता, एवढ्या द्वेषवेगाची ती फेक कृष्णानं नुसत्या निर्भय हसण्याच्या ढालीवर झेलली. समोरचं चिमुरडे आपल्याला काहीच भीत नाही हे पाहून एका बाजूनं खवळून गेलेला कालिया आता निराशेच्या टोकापर्यंत आला. कृष्ण धैर्यानं आणखी एक पाऊल पुढे आला. मग आणखी एक पाऊल, मग आणखी एक पाऊल.

आता त्या काळनागाला काय करावं तेच कळेना.
कृष्णानं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.
फुस्स! फुस्स!! फुस्स!!!
द्वेषाचे दरवाजे वाऱ्यावर सोसाटले जात होते. विजेचं कातडं पांघरलेलं ते विष लखलख करत, लवलवत, कृष्णाच्या या आणि त्या बाजूला झेपा घ्यायला लागलं.
शत्रूवर भुंकून मालकाकडे परतलेल्या एखाद्या रानटी कुत्र्याला मालकानं थोपटून शांत करावं तेवढ्या आपुलकीनं, विश्र्वासानं, कृष्ण कालियाच्या डोक्यावर मुरली थोपटत राहिला. हळूच त्यानं मुरली डाव्या हातात ठेवली, आणि उजव्या हातानं चक्क नागाचा फणाच थोपटला.
पहाणाऱ्या मोठ्यांनी श्र्वास रोखून धरले. मुलं टाळ्या पिटत होती. “वारे कृष्ण! वारे कृष्ण!! “

शेषेंद्राचं फणीदार छत्रचामर एकाएकी पाहाता पाहाता कोसळलं. कृष्णाच्या पायाशी वळवळलं, सरपटलं, थोड मागेपुढं झालं आणि शात झालं. त्याचं शेपूट यमुनेच्या पाण्यात होतं. तोंड कृष्णाच्या पायाशी पहुडलं होतं.
यमुनाकाठच्या एक भयविषाचा पूर्णविराम झाला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView