सोमवारची शाश्र्वत शक्ती

Date: 
रवि, 20 जाने 2013

उग्रहांच्या परोक्ष रांगेत सौम्य सोमचंद्र बसला होता. सूर्यानंतर नारदांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तो तोंड लपवायला लागला, तसे नारद त्याला म्हणाले, “अरे तुझ्या नावानंसुध्दा पृथ्वीवरची लोकं एक वार पाळतात, त्याला सोमवार म्हणतात. “
चंद्राच्या मुखावर चांदणं विखुरलं.
नारदांनी त्याला म्हटलं, “पृथ्वीवरचे लोक तुझी मूर्ती करतात. ती ही अशी. आणि तुझ्या स्तुतीचा ऋग्वेदातील जो मंत्र म्हणतात तो असा -
आ प्यायस्व समेतु ते विश्र्वत: सोम वृष्ण्यम्।
भवा वाजस्य सङ्‌गथे।।
त्यात मागता, “हे सोमा, तू प्रवृध्द हो. तुझ्या शौर्यभराचा प्रवाह चहूकडून चालू होवो. जिथे अनेक सत्व-पराक्रम एकवटले असतील, तिथे तुझा वास असतो. “
“पृथ्वीवरचे काही लोक मला भेटायला आले होते. “चंद्र सांगायला लागला, “तेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी सांगत होते की, पृथ्वीवरचे लोक मला चंचल समजतात म्हणून. मग ते माझी शूर म्हणून कशी प्रार्थना करतात? “
नारद हसून म्हणाले, “पृथ्वीवरच्या माणसांचं सोड तू. स्वत:च चंचल असल्यामुळे असं उलट सुलट बोलत असतात. रोहिणी नक्षत्र आणि तू नजीक असताना तर त्यांनी पृथ्वीवर एक गोष्ट रचली आहे. दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्या त्यानं तुला दिल्या, आणि त्यातली रोहिणी फक्त तुला आवडते. सत्तावीस नक्षत्रं आहेत आणि त्यातील रोहिणी तुझ्याजवळ आहे, हे ठसवण्यासाठी शहाण्या पूर्वजांनी ती गोष्ट कथेच्या रूपानं सांगितली, हे काही हल्लीच्या लोकांच्या लक्षात येत नाही. “
चंद्राच्या मुखावर शिशिराचं चांदणं पसरलं. तो म्हणाला, “अंधारातसुध्दा धीर बाळगायला मदत करण्याचा माझा संदेश हा शुभकारक आहे. शिवकारक आहे. “
नारद मान डोलवून म्हणाले, “हां, ती शिवकारक सूचना मात्र माणसं पाळतात. शिवाचं व्रत सोमवारी करतात. शिव म्हणजे शुभ. काहीतरी चांगलं व्रत करण्याचं शिवव्रत तुला जोडलं आहे , तुझं भाग्य आहे, प्रदोष म्हणजे दिवसभर भोजन आणि रात्री उपवास. शुध्द किंवा वद्य त्रयोदशीला सोमवार आला तर सोमप्रदोष, तो विशेष फलप्रद मानतात. निष्ठा एकाग्र करण्याची ती एक चांगली रीत आहे. “
मग नारदानं माहिती सांगितली, “कुंडलीत चंद्र अनिष्ट असेल तर सोमवारी शिव-पार्वतीची पूजा करावी. शिवाला वर्षभर सोमवारी तूप द्यावं. तिळानं भरलेलं सुवर्णपात्र लायक गरीबांना दान द्यावं. सोमवारी अष्टमी असेल तेव्हा सोमपूजाही करावी. आठ ज्ञानी माणसांना वर्षभर भोजन द्यावं आणि रुप्याचं शिवलिंग दान करावं.” अशी अनेक व्रतं नारदांनी सांगितली.
चंद्र म्हणाला, “भोळसट समजुती सोडून माझ्या नावानं शुभपूजा म्हणून शिवपूजा लोक करत असतील, तर चांगलंच आहे.”
नारदानं आश्र्वासन दिलं, “तशा काही चांगल्या प्रथाही आहेत. सोमवारी बैलांना काम न देण्याची पध्दत होती. अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे. कष्ट करणाऱ्या प्राण्याला सुटी मिळावी, हा त्यातला हेतू. “
समतेच्या या शिवप्रतीकांनी चंद्र प्रसन्न हसला. त्या हसण्यच्या लाटा, पृथ्वीवरच्या सात समुद्रांवर पसरल्या.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView