मनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक - स्वामी विज्ञानानंद

देवा मला क्षमा करू नकोस.
प्रत्येक अपराधाबद्दल मला शासन कर,
कारण अयोग्य अशा क्षमेने
सर्वशक्तिमान अशा ईश्र्वराचाही नाश होईल.
- स्वामी विज्ञानानंद

वैज्ञानिक, बुद्धिनिष्ठ, आध्यात्मिक व्यक्तित्वाचा त्रिवेणी संगम - स्वामी विज्ञानानंद

स्वामी विज्ञानानंद ह्यांनी विज्ञान आणि धर्म-तत्त्वज्ञान यांची सांगड घालून आधुनिक युगाला साजेसे आणि व्यवहारात उपयुक्त असे ‘न्यू वे’ तत्त्वज्ञान मांडले. स्वामीजी स्वतःसुद्धा या तत्त्वज्ञानाप्रमाणे जगले. मनशक्ती प्रयोगकेंद्राचे सर्व उपक्रम ह्या मूळ ‘न्यू वे तत्वज्ञानावर’ आधारीत आहेत.
‘न्यू वे’ याचा अर्थ, न्यूटन वृत्तीनेच वेद-सर्वधर्मज्ञान (न्यूटनची ज्ञानप्रेमवृत्ती आणि वेद अथवा इतर सर्व धर्म यातील सत्य ज्ञान शोधण्याचा भाग, यातील वृत्ती एकच, या अर्थानेही ‘न्यू वे’).
स्वामीजींनी सुमारे छत्तीस वर्षे अनेक विज्ञानशाखा, धर्म, तत्त्वज्ञान, यांचा अभ्यास करून प्रयोग केले. या सर्व संशोधनातून साकार झाले अडीचशेच्या वर ग्रंथ, चाळीस प्रकारचे अभ्यासवर्ग, साठ प्रकारच्या मशिन्सच्या साहाय्याने घेण्यात येणार्‌या मानस चाचण्या.
‘न्यू वे’ मधील विज्ञानाचे प्रतीक असलेला ‘न्यूटन’ आणि धर्माचे प्रतीक असलेले ‘वेद’ हे दोन्ही स्वामीजींचे आदर्श होते. विज्ञान युगाला शोभतील असे बुद्धिनिष्ठ विचार त्यांनी जपले. अंधश्रद्धेला वाव ठेवला नाही. वेदातील तत्त्वज्ञानाप्रमाणे निसर्गशक्तीला श्रेष्ठ मानले. व्यक्तिमाहात्म्य त्यांनी वाढविले नाही. स्वामीजी स्वतःला साधा खाली वाकून नमस्कारही घेत नसत, तर इतर सन्मानाच्या गोष्टी दूरच. स्वामीजी साधे अन्न घेत. पोत्याचे, शरीराला टोचणारे वस्त्र वापरीत असत. दर्शन/प्रसिद्धी-साठी त्यांनी स्वतःचा फोटोही कधी काढून घेतला नव्हता. त्यांच्या प्रकाश-समाधीनंतरही त्यांचा फोटो अथवा पुतळा कोठेही दर्शनार्थ दिसणार नाही.
स्वामीजी म्हणत असत, ‘‘तुम्हाला कृतज्ञता अर्पण करायची असेल, तर ‘न्यू वे’चा अभ्यास करा. त्यागाने आणि सेवारूपाने तो आचरणात आणा आणि लोकांना त्याची माहिती द्या.’’
स्वामीजींनी ३६ प्रकारची कष्टमय, दुःखमय तपे स्वतः केली आणि लोकांनाही संदेश दिला, की छोट्या दुःखाची सवय करा म्हणजे मोठे दुःख पचवू शकाल. स्वामीजींनी नव्या शतकासाठी समृद्ध असे तत्त्वज्ञान मांडून १८ नोव्हेंबर १९९३ रोजी ‘प्रकाशसमाधी’ घेतली. त्यांनी साधकांना आधीच सांगून ठेवले होते, की त्यांच्या देहमुक्तीनंतर त्यांची पारंपारिक पद्धतीने समाधी बांधू नका किंवा त्यांचे व्यक्तिमाहात्म्य वाढेल अशी कोणतीही गोष्ट करू नका. साधकांच्या आग्रहामुळे, लोकांना ज्ञान चांगल्या तर्हे्ने मिळावे यासाठी, त्यांच्या आवाजातील ध्वनिफिती ठेवण्याची परवानगी स्वामीजींनी दिली. विविध अभ्यासवर्गांच्या माध्यमातून या ध्वनिफितींचा लाभ लोकांना घेता येतो.

स्वामीजींविषयी

1963 साली स्वामीजींनी संन्यास घेतला. ‘स्वामी विज्ञानानंद’हे त्यांचे संन्यासोत्तर नाव. संन्यास म्हणजे ‘परसेवा व स्वकर्मशुध्दीसाठी तपाचरण यांचे माध्यम’ अशी त्यांनी संन्यासाची व्याख्या केली. 1957 पासूनच अंतरिक साक्षात्कारातून निर्माण झालेली सत्‌प्रेरणा त्यांना साद घालत होती. व्यावहारिक जगात तडजोडी करिता कराव्या लागलेल्या असत्य गोष्टींची दाहकता या काळात प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आली.
संन्यासोत्तरच्या उच्च जीवन मूल्यांच्या शोधकाळात, प्रथम 14 इंग्रजी व नंतर पाच भाषांत 250चे वर ग्रंथ लिहिले. या खेरीज टाइम्स, ब्लिट्‌झ, इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस, जन्मभूमी, मुंबई समाचार, सकाळ, लोकसत्ता, तरूण भारत, नवशक्ति, किर्लोस्कर समूहाची नियतकालिके यामध्ये सुमारे 20प्रबंध व इतर स्फुटलेखन केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ञ यांनी प्रस्तावना, परीक्षण, समीक्षा किंवा थेट चर्चेद्वारे त्यांच्या संशोधानची महती मानली, गुणवत्ता पारखली.

संन्यासपूर्व चुका

स्वामीजी स्वत: निर्व्यसनी व समाजाच्या प्रचलित नीतिमूल्यांना पूर्णपणे मानत असत, तरीही संन्यासपूर्व काळातील आर्थिक व्यवहारात आपल्याला असत्य करावे लागले याची जाहीर कबुली तशी गरज नसतानाही त्यांनी स्वत:हून दिली. ‘फॉच्यून ऍण्ड हॅपिनेस’या पुस्तकाच्या अठराव्या पानावर या संदर्भात एक उल्लेख आहे. अर्थात संन्यास घेण्यापूर्वी त्यांनी पूर्वीची सर्व आर्थिक देणीघेणी मिटवली. कारण कोणत्याही प्रकारचा संन्यास असो, त्याला कायद्याच्या कचाट्यापासून संरक्षण नसते.

संन्यासोत्तर कठोर आचरण

संन्यासानंतर पुढील आठ वर्षात स्वामीजींनी विविध तपे आचरली. 1963 मध्ये ‘न्यू वे आश्रम’ `या विश्र्वस्त संस्थेची स्थापना केली. त्यावेळी कार्यकर्ते कमी असल्यामुळे त्यांना स्वत:ला संस्थेचे कार्यकारीपद स्वीकारावे लागले. संस्थेसाठी कोणत्याही तऱ्हेच्या देणग्या किंवा शासकीय अनुदान केव्हाही घ्यायचे नाही असे धोरण त्यांनी अंगिकारले. तीन वर्षात कार्यकर्ते,साधकांची संख्या वाढल्यावर ‘मनशक्ती रेस्ट न्यू वे’(रिसर्च, एज्युकेशन, सॅनिटोरियम ट्रस्ट) या दुसऱ्या ट्रस्टची स्थापना केली. नंतर 1982 मध्ये आरोग्यसेवा समाजाला अधिक चांगल्या तऱ्हेने देता यावी म्हणून ‘हेल्थ न्यू वे’ हा तिसरा ट्रस्ट स्थापन झाला. या दोन्ही ट्रस्टमध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासंबंधिचे अधिकारपद त्यांनी घेतले नाही. ते या दोन्ही सहट्रस्टचे विश्र्वस्तही नव्हते.
संन्यास घेतल्यानंतर स्वामीजींन विविध प्रकारची 22 तपे केली. त्यामध्ये एकांत व्रत (600 दिवस एकांतात राहणे), नेत्र मर्यादा व्रत, शरीर अग्नि संयोग तप (स्वत:ची कातडी जाळून घेणे), कठोर शय्याव्रत वगैरेंचा समावेश होता. याशिवाय त्वचादान व्रत म्हणून दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला बळी पडलेले, भाजलेले व अपघातग्रस्त अशांसाठी स्वामीजींनी मांडीवरील कातडी काढून दिली होती. त्वचादानानंतर कोणतेही अँटीबायोटीक किंवा वेदनाशामक त्यांनी घेतले नाही. तीव्र वेदना सहन करत तीन महिने येणारे अपंगत्व, प्रतिगती (रेसिप्रोपॅथी तत्व) म्हणून सहन करून संपविणारे ते पहिलेच योगी असतील. शेवटचे तिसरे त्वचादान करताना भारतातील त्वचारोपण तज्ज्ञ डॉ.केसवानही स्वामीजींची वेदना स्वीकृती पाहून नतमस्तक झाले होत.
सामाजिक नीतिमत्तेबाबत त्यांची आचारंसहित कठोर असे. “पुरुष नातेवाईक बरोबर असल्याशिवाय बंद खोलीत स्त्रीस स्वामींजींची भेट घेता येणार नाही. “अशी सूचनाच त्यांच्या दरवाज्याजवळील फलकावर लावलेली असे. तसेच अगदी जवळचे नातेवाईक सोडून इतर स्त्रीपुरुषांनी एकमेकांच्या हातात वस्तूंची देवघेव करू नये असा त्यांचा नियम मनशक्ती आश्रमात अजूनही पाळला जातो.
व्यक्तिसमतेचा आदर राखण्याकरिता स्वामीजींनी वाकून केलेला नमस्कार कधीही घेतला नाही. हार-तुरे, सन्मान स्वीकारले नाहीत. ऐवढेच नव्हे तर व्यक्तिपूजा, व्यक्तिस्तोम त्यांना मान्य नव्हते म्हणून आपला फोटोही त्यांनी कधी काढू दिला नाही. ते स्वत:ला ‘गुरू’ मानत नसत, त्यामुळे लौकिक अर्थाने त्यांना ‘शिष्य संप्रदाय’ ही मान्य नव्हता.
अशा विज्ञानाधारित आश्रमाच्या उभारणीची सुरुवात स्वामीजींनी लोणावळे येथे 1963 साली केली. आज येथे संध्याकाळी यज्ञात हवन होते. सकाळी मंत्र म्हटला जातो. त्याचबरोबर मोठे कॉम्प्युटर सेंटर आहे. इंटरनेट, ईमेलची सुविधा आहे, अद्यायावत कम्युनिकेशनच्या सोयी आहेत. माईंड रिसर्च सेंटर आहे.
आश्रमातील जीवनदान केलेले सुमारे शंभर साधक समतेने वागतात. मालक-धनी-नोकर संबंध नसलेले एक अनोखे ‘कम्यून लाईफ’ येथे आहे. अशा व्यवस्थेत कोणीही वरिष्ठ नाही, कनिष्ठ नाही. प्रत्येकाने स्वत:शी प्रामाणिक राहून विहित काम कतर रहावे, अशी रास्त अपेक्षा असते आणि तसा प्रत्ययही येत राहतो.

सद्यस्थिती

आश्रमातील ’16 जागत्या तासातील 1 तास समाजाकरिता’ म्हणजेच 6.25 टक्के श्रम किंवा धनाचा त्याग हे तत्व पटलेले हजारो साधक आहेत. लोणावळे येथील मुख्य मनशक्ती प्रयोग केंद्रात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकणांसह संशोधन विभाग आहे. फटिग टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट यासारख्या विविध चाचण्यांची सुविधा तज्ज्ञ इंजिनिअरांच्या देखरेखीखाली आहे. जन्म-मृत्यू विज्ञान, मत्सरघातमुक्ती, जीर्णरोग मुक्ती, योगशक्ती ध्यान, कुटुंबसुखवर्धन, बालसमस्या असे तीस प्रकारचे तीन-चार दिवसांचे वर्ग वर्षभर चालू असतात. वर्गाचे वर्षाचे वेळापत्रक उपलब्ध असते. शिबिरार्थींचा निवास, भोजनाची व्यवस्था असते. बालकांपासून पालकांपर्यंत होणाऱ्या मार्गदर्शनामुळे मानवी आयुष्य अधिक अर्थपूर्ण होण्यास मदत होते. ग्रंथालय, जमीनजुमला, वाहनादयी मालमत्ता मूल्य पाच कोटींपेक्षा अधिक आहे.

पारदर्शित्व

साधक किंवा अन्य नागरिकांस न्यू वे तत्वज्ञानासंबंधी कोणतीही शंका किंवा आक्षेप असल्यास त्यावर चर्चा करण्याची नेहमीच तयारी असते. उदा. 1964 ते1976या काळात नैतिक व आर्थिक प्रश्र्नांवर, तर 1981मध्ये तत्वज्ञानावर मुंबईच्या क्रॉस मैदानावर जाहीर चर्चा झाली. ‘न्यू वे’दोन घोषवाक्यांचा सन्मानाने आदर करतो: (1) ‘मी चुकत असेन तर मला सुधारा. (2) ‘पाप करणे हा गुन्हा नाही, ते नाकारणे हा आहे. ‘ अशा मोकळेपणाने ‘न्यू वे’चे काम चालते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView