अखेरची मेजवानी

Date: 
Sat, 31 Mar 2012

रात्र काळोखी होती. बारा माणसे मेजाभोवती बसली होती. खाद्यपदार्थ समोर होते. जेवण शब्दांनी जीवंत होत नव्हते. कुठल्यातरी अनाकलनीय अशा गंभीर विचाराने, ती मेजवानीच खाऊन टाकली असे दिसत होते.
जॉन म्हणाला, “जीजस प्रभु, आज तुम्ही बोलत नाही. एरवी जेवायच्या वेळेला तुम्ही आम्हाला कितीतरी तऱ्हेचा उपदेश करता. चांगल्या चांगल्या गोष्टी सांगता. “
येशु प्रभु प्रेमळ हसले. सगळ्यांच्याकडे नजर फिरवीत म्हणाले, “शब्दांचं साम्राज्या केव्हा तरी संपत असतं. संपवायचं असतं. कुणाला ठाऊक आज आपण कदाचित शेवटचे एकत्र जेवत असू. “
ऐकणारे अकरा जण चरकले. बारावा खोटा शिष्यही चरकला. पण तो बारावा कोण होता, याचा अंदाज कोणाला करता येण्याजोगा नव्हता.
प्रभु म्हणाले, “कुणाला ठाऊक! ही आपली भेटण्याची शेवटचीच रात्र असेल. “
मॅन्युस मुनी व्याकुळले. ते कळवळून म्हणाले, “का असं सांगता प्रभु! आम्हाला तुम्ही अखंड हवे आहात. “
प्रभुंनी सौम्य शंात उत्तर दिले, “मी अखंडच आहे, अखंडच राहीन. पण देहात नसेन. तुमच्या बारापैकीच एखादा मला देहनष्ट करण्याचे कारस्थान करील. “
अकरा एकनिष्ठ बाळं एकमेकाकडे पाहू लागली. एक भिण्याचे सोंग करीत होता. तो कोण होता, हे कोणालाच कळले नाही.
वणवण वणवण, वर्षानुवर्षे जनतेसाठी झुरलेला तो महादेव असा काही निरोपाचा इशारा देत होता. लोककल्याणासाठी धावणारं त्याचं आयुष्य अवघे बारा शिष्य जमा करू शकले हे मानव जातीचं एक दुर्दैव व त्यातही कोणी विश्र्वासघातकी लपला होता, हे मानव जातीचे दुसरे दुर्दैव.
जगाच्या कल्याणासाठी आलेला एक महामानव महादेवाचं काम करून दुसऱ्या दिवशी स्वत:कडे परतणार होता, कार्यपूर्तीचं त्याला समाधान होते. तरीही एका स्वार्थी शिष्याच्या कृतघ्नतेने मानवतेला काळिमा लागेल, हे दु:ख त्याच्या मायाशील चेहऱ्यावर दिसत होतं, “प्रभो! आम्ही तुम्हाला केव्हाही सोडणार नाही. “
ते आश्र्वासन पुरं व्हायचं नव्हतं. माणासाचं अपुरेपण संपायचं नव्हतं. एका शिष्यानं जुडासनं-विश्र्वासघात करून येशूला सुळाकडे धाडलं. आणि त्याला पडल्यावर अकरा जणांची बावीस पावलं पळून गेली. ती पावलं पळून गेली, हा मानव जातीचा शाप होता. सुळी गेलेल्या येशूचा ंसंदेश सांगण्यासाठी तो परतला, एवढाच मानव जातीचा उ:शाप होता.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView