अमर झालेली हाडे

Date: 
Sun, 16 Oct 2011

मंत्राचा घोष मंदावत होता. देवाचा पराभव होत होता. दैत्य दाही दिशांनी देवांवर विजय मिळवीत होते.
गाठ होती वृत्रासुराशी. विष्णूशिवाय निभाव लागायचा नाही, हे ओळखून सर्व देव वैकुंठाला गेले. ‘वयं कुंठतं’ ते वैकुंठ. आत्मपूर्ण वाढलेला म्हणून कीर्ती वर्धिष्णु. स्वयंपूर्ण संतुष्ट, विष्णू, शेषशायीवर ध्यानमग्न होते. देवांनी त्यांना साकडे घातले. तेव्हा त्यांनी सल्ला दिला ‘तुम्ही दधिची ऋषीकडे जा. त्यांची हाडे मागून घ्या. त्वष्ट्याकडून त्यंाचं वज्र करून घ्या. मग वृत्रासूर संपले. ‘
दधिचींच्या दिशेने देवांचे दूत धावले. दधिची म्हणजे अग्नीच्या विद्युत्‌रुपाचे प्रतिबिंब. तपाने धगधगता. विद्वत्तेचे प्रकांड. अभ्यासाने उन्नत.
दधिचींच्या आश्रमातले दार किरकिरे झाले. महर्षींनी किलकिल्या डोळ्यांनीच समोर पाहिले. त्यंाची ध्यानपूजा नुकतीच संपत होती.
ती त्यांची अखेरचीच ध्यानपूजा होती. त्यांना सुनावण्यात आले, “हे थोर महर्षे, देवांचा पराभव होतो आहे. त्यागाच्या बीजाने झिजलेली आपली हाडेच यावेळी उपयोगी पडू शकतील. आम्हाला आपली हाडे हवी आहेत. “

एखादा मंगल मान मिळावा, एखाद्या सर्वोच्च पदासाठी निवड व्हावी, तशी हर्षाची लहर, दधिचींच्या नेत्रतेजात बहरून गेली. उपनिषदातले श्रेष्ठ असे “ईशावास्य” त्यांनीच रचले होते. ‘टाकून भोग’ ही सांगी, त्यांनी संागितली होती.
ते तत्वज्ञान देहात असताना महर्षी जगत होतेच. देहाने मिळवलेले धन आणि ज्ञान, ते देहाने इतरांना जन्मभर देत राहिले होते. आणि आता मंगल प्रसंग असा उभा राहिला होता, की शरीराच्या साहाय्याने महर्षी लोकसेवा करत होते. ते देहसाधनच देऊन टाकावे लागणार होते.
दधिचींची श्र्वास टाकायची वेळ आली होती. अखेरच्या श्र्वासत्यागाची ती संधि एखादे वेळी निसटून जाईल, म्हणून काहीशा घाईने दधिची पुन्हा आसनावर बसले. त्यांनी डोळे मिटले, गुडघ्यावर हात टेकले. अगदी क्षणभर बुध्दी घुटमळली. दधिचींनी वळवळत्या बुध्दीला त्या क्षणाला दटावले, “टाकले ते टिकेल, हे तू सांगितले आहे. मुकाट्याने ‘टाकून दे.” बस्स! बुध्दीचे बंड एका क्षणार्धात थांबले. दधिचींचा श्र्वास मंद होऊ लागला. कल्पांताच्या, कैवल्याच्या कुशीत दधिची सूक्ष्म होत, होत, भव्य झाले. ते शरीराचे उरले नव्हते. सगळे जगच त्यांचे शरीर झाले होते. जी हाडे त्यांनी टाकून दिली, तेवढी मात्र अमर झाली.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView