अर्ध्या डाळिंबाचे आक्रित

Date: 
Sun, 5 Feb 2012

राजगृहाचा तो परिसर माणसांनी मोहरून गेला होता. ‘राजगृह’म्हणजे उत्तर भारताच्या बुध्द विहारांचे धर्मक्षेत्र. मोठ्यामोठ्या राजांचे रथ, सम्राटांचे महारथ, धनवंतांच्या पालख्या, सरदार सेनापतींचे अश्र्व, यांची रीघच्या रीघ लागली होती, मानवान आणि धनवान यांनी एवढी गर्दी केली होती. तर इतर जनता केवढ्या उत्साहाने गर्दी करून उसळली असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
संपत्या जंगलाचा तो एक भाग होता. एका विशाल पिंपळवृक्षाखाली, भगवान बुध्द स्थित झाले होते. एकेक भक्त त्याच्यापुढे नम्रतेने येई., त्यांच्या पायाशी आणलेली भेट ठेवी. रत्ने, कंठे, हिरे, मोती, सुवर्णालंकार यांच्या भेटी. त्याला हात न लावता, भगवान नुसत्या खुणेने त्या वस्तू बाजूला ठेवायला सांगत. त्यांचा उपयोग दीन दुबळ्यांच्या कल्याणासाठी व्हायचा आहे, हे सर्वांनाचा माहिती होते.
दुपार कलत आली होती. पण ती सायंकाळकडे झुकली, तसा देणग्यांचा तो वर्षाव विरत चालला.
त्या वाटेवर एकाएकी एक वृध्दा धापा टाकीत तेथे आली. अंगावर फाटकी लक्तरे, लटपटते पाय, थरथरे हात. उजव्या हातात अर्धवट खाल्लेलं एक डाळिंब.
पहाणारे चमकले. रामाला उष्टी बोरे आणून देणारी शबरी या बाईच रूपात कोठून उपटली, हे लोकांना समजेना.
लागलेली धाप थोडीशी कमी झाल्यावर म्हातारी म्हणाली, “त्या दूरच्या डोंगरावर मी बसले होते, मला कुणीतरी सांगितलं ‘तुम्ही येथे आला आहात. ‘ कालपासून खायला मिळालं नव्हतं, म्हणून मी फळं शोधीत होते. एका झाडावर मला एवढं एकच डाळिंब पिकलेलं दिसलं. त्यातलं मी अर्धं खाल्लं. मग तुम्ही आल्याचं ऐकलं. तशीच धावत निघाले आणि इथवर पोहोचले. तुम्ही एवढं फळ घ्याल का? “
येथवर भगवान बुध्द स्वत: उठून उभे राहिले होते. त्यांनी आपली करकमले एकत्र जुळवली. वृध्देपुढे धरली. आणि ते लगबगीने म्हणाले, “माते, अवश्य दे मला. “
डाळिंबाचे अर्धुकले आणि जणू काही दानावर अर्घ्य म्हणून डोळ्यातले अश्रू, तथागतांच्या हातावर मुक्त झाले.
चकित् राजे-रजवाडे, हे दृश्य पाहात राहिले. त्यांनी सम्राटांना हात जोडून विचारले, “महाराज, आमच्या वस्तूंना आपण हातही लावला नाही आणि या उष्ट्या अर्ध्या डाळिंबासाठी आपण स्वत: हात पसरले? “
बुध्दाच्या मंद स्मिताने उत्तर दिले, “होय, सज्जन हो. या मातेनं मला सर्वस्व देऊन टाकलं होतं”

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView