अवतार आठवा, मुलगा आठवा.

Date: 
Sat, 29 Sep 2012

कृष्ण जन्मला. वसुदेवानं बालरुपाला नमन केलं. सोन्याचा रंग काळा असता तर त्याला जशी कृष्णलोभसता आली असती, तशी ती नवजात पुष्पराग दीप्तीसमोर उलमत होती. जगाला आश्र्वासनची फुंकर घालणारी ज्योत जिवंत होत होती. कोमलतेच्या करपाशातली कठोरता, तिथं उघडत होती.
इवल्याशा घट्ट मिटलेल्या मुठी हवेत हलायला लागल्या.
पुत्रजन्माचं एवढे दु:ख आईबापांना क्वचित्च झालं असेल. मुलाच्या स्वर्गसुंदरतेचं कौतुक करायला त्यांच्या करपलेल्या मनाला उसंत नव्हती. श्र्वास जगात आणि नि:श्र्वास परतीच्या स्वर्गात, असं नशीब घेऊन आलेली ती सुंदरता!! मातापित्यांच्या अश्रूंची आंघोळ त्या मुलाला घालण्याचं तेवढं हातात होतं. येता जाता एकच आंघोळ. भरल्या डोळ्यांनी, एकदा तरी त्याच्याकडे डोळे भरून पाहणार कसं?
‘ट्यॉंहाऽऽ ट्यॉंऽृऽ ट्यॉंहाऽऽ “
बाळाला कंठ फुटला. किती गोड ते रडणं? दुर्दैवी जन्माला सनईची साथ कुठली, हे लक्षात घेऊन रडण्याच्या आरोळीतच सनई लपलेली.
देवकीनं अर्धवट ग्लानीत बाळ छातीशी धरलं. त्याचे उष्ण निश्र्वास सुखातिशयाच्या गुदगुल्या करीत तिच्या अंतरात आले.
“ट्यॉंहाऽऽ ट्यॉंऽृऽ ट्यॉंहाऽऽ “
वसुदेवानं एकाएकी आपला हात बाळमुखावर धरला. देवकीच्याही ध्यानात आलं. जन्मावर द्वेषाची छाया धरलं गेलेलं ते निष्पाप मूल, हसू शकत नव्हतं, रडायचीही बिचाऱ्याला मोकळीक नव्हती.
नाते नाकारलेला कंसरूप मत्सर, ही कृष्णकळी कुस्करणार होता. ‘नाते’ जे नसते ते नाते. हा संसाराचा पहिला मोहमुक्त करणारा धडा पहिल्याच धडाक्यात हा छोटा कुलदीपक घोकत होता.
“ट्यॉंहाऽऽ ट्यॉंऽृऽ ट्यॉंहाऽऽ “
“नको रे रडू माझ्या राजा, “ देवकी कळवळून म्हणाली. जणू तिच्या राजाला तिच्या शब्दांचा अर्थ कळणार होता.
“ट्यॉंहाऽऽ ट्यॉंऽृऽ ट्यॉंहाऽऽ “
देवकीला दरदरून घाम सुटला. बाळाचा आवाज बाहेर गेला तर? तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं. नुसत्या डोळ्याचं पाणी कसं पुरेल? दैव दु:ख लादतं तेव्हा दशदिशांनी ते लादतं. सगळ्या आयुष्यला ते रडवतं. अवयवांना पाण्यात बुडवतं.
“नको रे रडू असा... “ ओठांच्या दोन अर्धचंद्रांवर हात ठेवत देवकी म्हणाली. “अगं तो गुदमरेल... “देवकी दचकली.
गुदमरेल म्हणून हात काढावा, तर कंस त्याला आपून मारील. त्या सात मुलांच्या चिळकांड्या, बाहेर आलेले मेंदू, थरथरणारे छोटे पाय. देवकीला वाटलं, कुठलं पाप आपला सूड घेतं आहे?
“ट्यॉंहाऽऽ ट्यॉंऽृऽ ट्यॉंहाऽऽ “कृष्णानं आणखी टाहो फोडला.
देवकी हतबुध्द झाली. तिला भडभडून आलं. त्याला केवळ्यात रडायला लागला, “ट्यॉंहाऽऽ ट्यॉंऽृऽ ट्यॉंहाऽऽ “
देवकीला क्षणभर वाटलं, हा मेला तर बरं, आपल्या क्रूर भावाच्या हातून हा दगडावर पडून रक्तबंबाळ होण्यापेक्षा, इथंच मरून ते पुढले भीषण भविष्य तरी त्याच्या नशिबातून टळेल.
विष्णूच्या आठव्या अवताराचं हे अप्रुप, भीषणता टाळण्यासाठी अवतरलं होतं.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView