आईला मारणारे पावित्र्य

Date: 
Sat, 15 Sep 2012

“उडव डोकं आईचं” जमदग्नीचे जळते शब्द कडाडले. तेव्हा ऐकणारा मुलगा रडायला लागला. आई निश्र्चल होती. निराकांत होती. पतीच्या हातून मरण येण्याचं भाग्य आलं, तर मरणातूनही पुण्य जमेल, हा संस्कार तिनं जोपासला होता. परशुरामाची आई रेणुका. ती ज्या जलाशयात पाणी आणायला गेली होती, तिथं चित्ररथ गंधर्व विहार करत होता. तो पाहताना रेणुकेला थोडा वेळा लागला. ती परतली, तेव्हा तिच्या उशीरा येण्यानं जमदग्नी कोपून गेला होता. उशीरा येण्यापेक्षासुध्दा तिच्या पापविचारचं ज्ञान, जमदग्नीला झालं होतं. आणि म्हणून तो तिला ठार मारणार होता. एका मागून एक चार मुलांना जमदग्नीनं आईला ठार मारायला सांगितलं, कोणीही पुढे आलं नाही.
तेवढ्यात परशुराम बाहेरून आला. खांद्यावर परशु घेतलेला. जटावल्कलधारी, अग्नीज्वालेसारखा तांबुस गोरा, सूर्यासारखा तेजस्वी, कुणाकडूनही क्षुब्ध न होणारा, आणि जसा काही देहधारी शांतीसागरच.
जमदग्नीनं तर्जनी रेणुकेच्या गळ्याकडे वळवून म्हटलं,”उडव डोकं हिचं.”
परशुरामानं परशु उजव्या हातानं उंच पेलला. तिरपा केला, खच्चदिशी ते हत्यार खाली आणलं. आईचं मुंडक उडवलं.
“शाब्बास! माझ्या मुला शाब्बास. “ जमदग्नी परशुरामाला मिठी मारत म्हणाले, “आज तू माझी अब्रू राखलीस.तुला हवं ते माग. “
जराही विलंब न लावत परशुराम पित्याच्या पायाशी वाकला. पायांना स्पर्श करून म्हणाला, “आईचं प्रायश्र्चित्त भोगून झालं आहे. आता तिला जिवंत करण्याची परवानगी द्या. “
“तेच मी तुला सांगणार होतो मुला. मला पापी विचार संपवायचा होता. रेणुकेची पवित्रता शुध्द राखायची होती. हा कमंडलू घे. तिचं मस्तक होतं तसं चिकटव. कमंडलूतलं पाणी पुन्हा जीवन देईल. “
पाझरत्या डोळ्यांनी परशुरामानं मातेला जिवंत केलं. संस्कृतीचं सगळ्या बाजूनं जतन करणं कठीण असतं. अखेर शिस्तीचे प्रतीक, आदर्श, कठोरच असतात. जिवंत करण्याची ताकद असणाऱ्याला मारण्याचं पाप कसं लागणार? एक प्रतीक म्हणायचं तर दुसरं प्रतीकच म्हणावं लागेल. मेलेल्या आईचे तुकडे तुकडे करणारे शंकराचार्य मातृभक्त होते. वरवरचं प्रेम आणि कठोरता, या पलीके मोठी प्रतीकं राहतात आणि आदर्श ठरतात. विष्णूचा हा सहावा अवतार कठोर लाभदायक शिस्त लावण्याचं प्रतीक म्हणून, समजलं जाईल.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView