आणि मग शकुंतला लाजली

Date: 
Sun, 5 Oct 2014

भर दरबारात लाजावे कसे, हे मनात न आणता, शकुंतला सरळ लाजली आणि दरबारही कौतुकमिश्र संकोचाने, लाजण्याच्या लहरीने भरून गेला.
शकुंतला दुष्यंतांचे कालिदासाचे कथानक महाभारतातील गोष्टीपेक्षा पुष्कळच वेगळे आहे. विस्मरण, अंगठी, मासा, कोळी ह्या सगळ्या कालिदासाच्या काव्यकल्पना महाभारतात नाही. राजा दुष्यंत याने लोकरंजनासाठी शकुंतलेची एकदम ओळख दाखवली नही. हे सूत्र आदिपर्वाच्या सत्तर ते चौऱ्याहत्तर या अध्यायात आहे. सत्कृत्याचा विशाल अर्थ केला, म्हणजे दुसऱ्यांसाठक्ष स्वत:च्या अधिकाराचा संकोच करून कष्ट भोगणे, हे येते. प्रत्येक गोष्टीचे महत्त्व तौलनिकच असते. नेहरूंनी आदिवासींची टोपी घातली, किंवा त्यांच्याबरोबर भाकरी खाल्ली, म्हणजे त्यांचे कौतुक होते. ते कृत्य चांगले ठरते. कारण ते जनसंतोषाचे असते, या विशाल आणि सत्य अर्थाने भारतातील ही प्रेम मृदुस्पर्शी सत्यकथा वाचली पाहिजे.
राजा दुष्यंत शिकारीसाठी सुर्वणतुल्य रथात बसून गहन वनाकडे आला. अनेक वन्य पशूंचा संहार केल्यानंतर राजा चपळ अशा एका हरणाचा पाठलाग करीत मालिनी नदीच्या तीरावर येऊन पोचला. नदीच्या दोन्ही तीरावर अनेक अग्निशाला होतया. छोटे मोठे आश्रम होते.
पुढे हा श्रीमान राजा मनोहर अशा मुख्य आश्रमाकडे चालला. पवित्र जलाने युक्त व आश्रमाला लागूनच असलेली मालिनी तेथील सर्व वातावरणाची जणू काय जननीच आहे, असे त्याच्या मनात आले. त्या नदीच्या वाळवंटात चक्रवाक पक्षी संचार करीत होते. तिच्या प्रवाहातून फुले व फेस वहात होता. किन्नर, वानर व अस्वले तिच्या दोन्ही तीरांवर वृक्षादिकांचा आश्रय करून राहिली होती. पवित्र वेदध्वनी ऐकू येत होता. विविध पशुपक्षांनी युक्त असलेल्या त्या मालिनीच्या तीरावर कश्यपगोत्रज महात्य्या कण्वाचा श्रेष्ठ आश्रम त्याला दिसला. अतिशय रम्य व ऋषीगणांनी युक्त!! मालिनी नदी त्या आश्रमाच्या अगदी जवळून वहात होती. गंगेने सुशोभित झालेल्या नरनारायणाच्या स्थानाप्रमाणेच रम्य मालिनी नदीने अलंकृत झालेल्या त्या आश्रमपदामध्ये प्रवेश करण्याची दुष्यंताला इच्छा झाली. त्या महावनामध्ये, मत्तमयूरांच्या केका वारंवार ऐकू येत होत्या. कुबेराच्या चैत्ररथ उद्यानाप्रमाणे सर्वगुणसंपन्न व अति सुंदर असलेल्या त्या आश्रमात, या राजाने महर्षि कण्वाला भेटण्यासाठी प्रवेश केला. त्यात प्रवेश करताना दुष्यंताने आपल्या चतुरंग सेनेला त्या महद्वनाच्या बाहेरच तळ देण्यास सांगितले. तो आपल्या मुख्य सेनापतीस म्हणाला, “मी तपोधन कण्वमुनीस भेटावयास जातो. मी परत येईपर्यंत तुम्ही येथेच रहा. “

राजचिन्हे बाजूला काढून ठेवून, राजा त्या तपोवनात शिरला. पण कण्व तेथे नव्हतेच, त्यंाची मानलेली कन्या शकुंतला तेवढी होती. सुंदर, मनोरम, रूपयौवनसंपन्न आणि तेजस्वी अशी शकुंतला पाहून, राजा पूर्ण मोहून गेला. साध्या तापसी वेशात शकुंतला तेजस्वी दिसत होती. पण कण्वांची कन्या म्हणून तिने आपली ओळख करून दिल्यावर, राजा चक्रावून गेला. कण्वमुनी उर्ध्वरेता होते. उर्ध्वरेता हा नैष्ठिक ब्रह्मचारी असतो, मग त्याला मुलगी कशी, असा राजाला प्रश्र्न पडला.
शकुंतलेच्या गोड, मधुर आणि हसऱ्या शब्दांनी आपल्या जन्माची कथा सांगितली. विश्वामित्र ऋषी आपल्या तीव्र तपाने इंद्रपद घेतील, ही इंद्राला भीती पडली, तेव्हा मेनकेला पाठवून इंद्राने विश्वामित्राचा तपोभंग केला. या परिस्थितीत शकुंतलेचा जन्म झाला. मेनकेने त्या आपल्या मुलीला मालिनी नदीच्या तीरावर ठेवले. कण्वमुनी त्या बाजूला गेले होते. तेव्हा त्यांनी त्या मुलीला पाहून बरोबर घेतले. धर्मशास्त्रात कर्माने जन्मदाता, अन्नदाता, प्राणदाता, या तिघांनाही पिता म्हणतात. तेव्हा शकुंतला कण्वांना पिता समजत असे.
शकुंतला ही दुष्यंताच्या प्रेमाची शिकार झालीच होती. राजाच्या अक्षाने सिंह मेले होते. हरीण मेले होते. तसे त्याच्या कटाक्षाने ही हरिणीही घायाळ झाली होतीच. तो दुष्यंत राजा आहे, असे कळल्यावर शकुंतलेने एवढेच म्हटले, की दोघांच्या लग्नानंतर जो मुलगा होईल, तो युवराज व्हावा, त्याला राज्य मिळावे. मुलाच्या कल्याणासाठी आई आस धरील नाहीतर काय करील? प्राणापेक्षा अपत्यप्रेम अधिक चिरकालीन असते ना?

राजाला तरी ते कशाला नको असेल? त्याने प्रसन्न प्रसादाने ते आर्जव मानले. कण्वमुनी बऱ्याच दिवसांनी येणार होते. त्यांची वाट पहात त्यंाचे हे राजराजेश्वर जावई तिथेच राहिले. पण राज्यकारभाराची जबाबदारी सोडून फार दिवस राहणे कठीण होते. होणाऱ्या मुलाला राजधानीत घेऊन ये, तो पर्यंत कण्वमुनी येतीलच, असे सांगून राजा राजधानीला परतला. कण्वमुनी काय म्हणतील, अशा भीतीने शकुंतला मनात बावरली होती. पण कण्व परतले, तेव्हा त्यांना सर्व ऐकून संतोषच झाला. सरिता समुद्राला मिळाली, तर आकाशाचा अवकाश रागवेल कशाला?

शकुंतलेच्या पोटी भरताचा जन्म झाला. त्याचे राजपुत्रपण जन्माबरोबरच दिसले. आणि तो वयाने वाढत होता, तेव्हा तेजही वाढत होते. सहा वर्षाचा असताना तो सिंह, वाघ, वराह, रेडे आणि हत्ती यांना लीलेने खेळवी. दात शुभ्र आणि अणकुचीदार, शरीर सिंहासारखे. तळहात रेखाचित्रमय, अंगकांती अर्पू. असा हा भरत.

पण रत्न आपल्या कोंदणातच अखेर शोभायचे. कण्वांनी माया बाजूला टाकली. आणि शकुंतला भरत या मृदुमहान रत्नांची जोडी त्यांनी दुष्यंताच्या दरबारात आणली. आणि काय आश्चर्य -सिंहासनातल्या सोन्यारूप्याने मंडीत अशा महाना राजाने शकुंतला, लग्न, मुलगा आणि त्याला राज्यावर बसवण्याचे वचन, या सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत असे सांगून टाकले.

प्रथम शकुंतलेने आपले तेज प्रकट केले नाही. सत्याला सत्ता खाऊन टाकते, म्हणून ती संतापाने चूर झाली, पण तिने तो संताप आवरला. राजाला तिने अनेक तऱ्हेने विवेकाची आरती ओवाळली. अखेर ती त्याला म्हणाली, “पुरूषाने पुत्राच्या मातेला आपली जन्मभूमी मानावी आणि खुद्द पुत्राला आपले सर्वस्व मानावे. लहान मुलाचा स्पर्श रेशमापेक्षाही रमणीय असतो.
मुलाच्या ज्ञानकर्माच्या वेळेला वेदामध्ये मंत्रसमूह आहे. त्यात मुलाला उद्देशून ‘पुत्र नावाचा आत्मा’असे म्हटले आहे. मुलगा हा स्वत:चे शुध्द सरोवरातील प्रतिबिंब असते. मी पुन्हा जंगलात जाते, पण या मुलाचे पालनपोषण तरी तू वचनाप्रमाणे कर. “
राजाचा निर्दय नकार सिंहासनावरून साकार झाला. त्याच्या नजरेतली निष्ठुराता, आवळलेल ओठांवरून ओसंडून वहात होती.
शकुंतला रडवेली झाली. ती म्हणाली, “जन्मले तेव्हा मातापित्याने टाकले, आता पतीही फेकून देतो आहे, मी करू तरी काय? “

त्या अश्रूतूनच मग अग्नी उसळला. मांजरसुध्द अति झाले म्हणजे उसळते. शकुंतलेचा जहाल ज्वालामुखी शब्दाने पेटत म्हणाला, “मी सत्य संागितले. द्वेषरहित सत्य सांगितले. म्हणून मी तुझ्या नाशाचा शाप देणार आहे. तो माझा शाप नसून सत्याचा शाप आहे असे समज. “
शकुंतला मागे जाण्यासाठी परतली आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, “राजा, शकुंतला सांगते ते सर्व खरे आहे. भरत या नावाने तुझा हा महापुत्र लौकिक मिळवील. “
सर्व राज्यसभा चकीत झाली. त्यांचा राजा खोटे बोलत होता, याची साक्ष आकाश देत होते. कदाचित दरबारातल्या प्रत्येक अंतरात्म्याचा अवकाश ती साक्ष देत असावा.
राजा उत्तरासाठी उठला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मंदस्मित होते. तो काय सांगणार हे ऐकण्यासाठी अमात्य आणि पौरजनांनी कानाचे द्रोण केले. आणि त्यात रहस्यभेदाचे अमृत ओतत राजा म्हणाला, “मंत्रिजन आणि पौरजनहो, शकुंतला संागते आहे ते सत्य आहे. पण मी जर हे आधीच कबूल केले असते, तर प्रजेने आणि तुम्ही माझी शंका घेतली असती. एखादी रानसुंदरी राजाला बनवू शकते, असा प्रवाद पसरला असता. म्हणून मी तुमच्यासमोर शकुंतलेची परीक्षा पाहिली. “

सभा संतुष्ट झाली होती. शेवटले शब्द उच्चारताना राजा सिंहासनावरून पायऱ्या उतरत शकुंतलेपाशी पोचला. अधोवदन तिला म्हणाला, “मला क्षमा कर. तुझी परीक्षा मी पाहिली नाही, तर माझीच परीक्षा पाहिली. तुला मी नाकारत होतो, त्यावेळी माझ्या हृदयात मला हलाहल जाळीत होते. राजाने लोकरंजनापेक्षा स्वत:चे सुख अधिक मानू नये, हा महाराणीपदाचा पहिला धडा तुला गिरवावा लागला. मला क्षमा कर. “
कृतकृत्य, कोमल, कुसुम विचारांनी शकुंतला शहारली होती. दावा लुप्त झाला होता. शरीराच्या कणाकणातून लाज लुकलुकत होती. एका बाजूला तिचा छोटा प्राणांकुर भरत आणि दुसऱ्या बाजूला दाही दिशांचा सम्राट शक्तिमान दुष्यंत पौरसभेच्या साक्षीने तिचा झाला होता. राजाने स्वत:च्या प्रतिबिंबाला, भरताला कडेवर घेतले. आणि त्याच्या कडेवरून भरताने शकुंतलेचे मुख वर उचलले, मोकळा उजवा हात त्या मुखावर ठेवून राजा म्हणाला, “इतके महान सौख्य इथे आणायला तू उशीर का केलास? “
शकुंतलेचे शब्द संपले होते. तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर प्राजक्त फुलला होता. आणि त्यात गुलाबी लाजेचा रंग रेखला होता. तिचे लाजणे पाहून सगळी सभाही लहरली.
आणि ती कौतुकमिश्र संकोचाने स्वत:च लाजली. त्यागाच्या अनंत तऱ्हा असतात. प्रजेसाठी राजा स्वत:च्या सुखाचा त्याग करण्याची तयारी दाखवतो, तेव्हा त्या त्यागाचे तेज, सत्याशिवाय कोणाला बोलवील? आणि त्यातून शुभपरिणामाशिवाय आणखी काय निघेल?

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView