आध्यात्मिक ‘ध’चा ‘मा’

Date: 
Sat, 19 May 2012

गुरू नानक शहाणे व्हावेत म्हणून त्यांच्या वडिलांनी कितीतरी प्रयत्न केले. गुरू नानक अर्थात् शहाणेच झाले; असंख्य लोकांना त्यांनी शहाणे केले. पण वडिलांना ज्या अर्थाने नानक हुशार व्हायला हवे होते, त्या अर्थाने नानक कितपत शहाणे झाले असते, याचा हिशोब पहाण्याजोगा आहे.
एकाच प्रसंगाचा हिशोब सांगतो.
नानकाच्या वडिलाांनी नानकाला बोलावले. म्हटले, “नानक तू भाईजीला घे, बाजारात जा आणि मी सांगतो त्या यादीप्रमाणे वस्तू घेऊन ये. काही वस्तू नाही मिळाल्या तरी हरकत नाही. मी पैसे जास्त देऊन ठेवतो. पण तुला जो दवा हवा आहे, तो घ्यायला विसरू नकोस. “
नानक हरिनाम पुटपुटत होते. त्यात त्यांनी अडथळा आणू दिला नाही. फक्त वडिलांची अवज्ञा नको म्हणून मान डोलाावली. भाईजी हा नोकर उभा होता. तो बाजाराच्या दिशेने चालू लागाल. नानकांनी त्याच्या मागोमाग वाट धरली.
बाजाराच्या वाटेवर माणसे जात येत होती. नानकरायांचे तिकडे लक्षच नव्हते. पण बाजूच्या छोट्या रस्त्यातून ओंकार ध्वनीची परवल ऐकू यायला लागली, तेव्हा नानकांनी कान टवकारले, डावा बाजूला पाहिले तर सात आठ साधूंचा मेळा येत होता. ते साधू काहीसे खुरडत चालत होते. बहुधा उपाशी असावेत. पोट रिकामे होते तरी तोंड ॐकाराने भरलेले होते. नानकांचे पाय आपोआप थांबले. त्यांनी भाईजीकडे वळून अजीजीने म्हटले, “थोडे जास्त पैसे आपल्याजवळ दिले आहेत तर आपण त्यांना थोडे देऊन टाकू. “
भाईजींनी काही पैसे दिले. साधूंच्या हातात ते पडल्यावर साधू म्हणाले, “बेटा, आम्ही बरेच दिवस खाल्ले नाही. आता आमचे अर्धे पोट तरी भरेल. “
गुरू नानक भाईजींच्याकडे वळले आणि त्याला कळवळून म्हणाले, “भाईजी देऊन टाक रे उरलेले पैसे. द्यायचे तर पूर्ण देऊ या. “
आता मात्र भाईजीचा हात आखडू लागला. नानकांचे वडील चांगलेच रागावतील, असे त्याच्या मनात आले. नानकांनी त्याची स्थिती ओळखली आणि म्हणाले, “भाईजी, मी पुढे दोन दिवस जेवणार नाही पण तू यांना पैसे दे. बाबा बला बोलू देत. पण तू माझे एवढे ऐक. माझ्यावर एवढी दया कर. “
भाईजीला त्या स्थितीतही हसू आल्यावाचून राहिले नाही. जणू काही नानकच उपाशी होते, अशा तऱ्हेची त्यांची आळवणी होती. आणि खरोखरच नानकांना भावना इतकीच होती की ते स्वत: उपाशी होते. नानकांना साधूंबद्दल अपार आदर वाटला. त्यांना वाटले साधू बिचारे चार दिवस उपाशी आहेत. माणून चार आठ दिवस असा उपवास करू शकतो? आणि तरीही ॐकार शक्तीला विसरत नाही? श्रध्दा भुकेपेक्षा मोठी असू शकते?
नानकांना हे प्रश्र्न सुचत होते. त्यांना विश्र्वाची चिंता होती. भाईजील विश्र्वाची चिंता नव्हती आणि भविष्याचीही चिंता नव्हती. पण नानकांना नारज करू नये एवढी चिंता होती आणि त्याने उरलेले पैसे त्या चिंतेपोटी देऊन टाकले.
परतलेल्या नानकांना जवळ घेऊन वडिलांनी विचारले, “कोणत्या वस्तू मिळाल्या, कोणत्या मिळाल्या नाहीत?
नानकांनी खाली घातलेल्या मानेने उत्तर दिले, “एकच वस्तू मिळाली. “
“कोणती? “
“आशीर्वाद, धन्यवाद, दुवा!! “
वडील पहात राहिले,ऐकतच राहिले. नानक आवर्जून वडिलांना वळवत सांगत होते, “रागवू नका. दवा आणला नाही. पण दुवा आणला. दवा आणला असता तर माझे दु:ख थोडे गेले असते. आता दुवा आणवला तर त्या दु:खाचं दु:खच मला वाटत नाही. “
वडिलांनी कपाळाला हात लावला. पण त्या कपाळावर नियतीने अपूर्व असा पुत्र लिहिला होता. त्याने आणलेल्या वस्तूची, दव्याची आख्यायिका झाली नसती. पण न आणलेल्या वस्तूची, दुव्याची अमरकथा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView