आवडलेला पराभव
गुरूश्रेष्ठांचा घणात्मक आवाज आश्रमभर पसरला. तसे गुरूवर्य रागीटच. आध्यात्मात ज्ञानी माणसे रागावत नाहीत असा उगीचच भ्रम असतो. जमदग्नि रागीट होता, दुर्वासही रागीट होता. जमदग्नि हा दशावतरापैकी परशुरामाचा पिता होता, तर दुर्वास हा दाशरथी रामाला वंद्य असा महाऋषी होता. रामाला तसाच कृष्णाला. म्हणजे होऊन गेलेल्या नऊ अवतारापअकी आणि मनुष्य देहातल्या मुख्य तीन अवतारांपैकी तिघेही रागाशी नम्र झालेले होते. कारण रागावणारा माणून जेव्हा नि:स्वार्थी असेल, तेव्हा त्याचा राग वरवरया शांतीपेक्षा अधिक शुभ आहे,हे शहाण्या माणसाला माहीत असते.
त्यामुळेच लतापल्लवांनी शोभिवंत झालेला तो आश्रम करपत्या व कडाडत्या आवाजाने चरकू लागला तेव्हा ऐकणाऱ्यांना फार आश्र्चर्य वाटले नाही. “आज कोणाची पाळी? “ हा प्रश्र्न फक्त जो तो विचारू लागला. आणि गुरूवर्यांच्या रागाचे लक्ष रामानुजम् आहे हे कळले तेव्हा मात्र सगळ्यांना आश्र्चर्य वाटले. कारण रामानुजम् गुरूश्रेष्ठांचा लाडका होता, आवडता होता.
समार उभ्या असलेल्या रामानुजम्ला गुरूवर्य तिरस्काराने बजावत होते, “तू माझा घात केलास, विश्र्वासघात केलास. “
“काय झालं गुरूदेव? “रामानुजम्च्या आवाजात निर्भयता होती. पण शब्दात आदर होता. स्वत:बद्दल निर्भयता, गुरूदेवांच्याबद्दल आदर.
आवाज आणखी चढवून गुरूवर्य म्हणाले, “तुला मी तुझ्यासाठी मंत्र दिला होता ना? “
“होय.”
“त्याचवेळी तुला सांगितलं होतं ना की तो मंत्र तुझ्याशिवाय कोणाला सांगू नको म्हणून? “
“होय, गुरूजी.
“तेव्हा तुला हेही सांगितलं होतं की जर तो मंत्र तू इतरांना संागितलास तर नरकात जाशील. “
“होय गुरूश्रेष्ठ. तुम्ही मला तेही सांगितलं होतंत. पण मला हे नव्हतं सांगितलंत की जर मी तो मंत्र दुसऱ्यांना सांगितला, तर त्यांना तो उपयोगी पडेल की नाही!! “
गुरूश्रेष्ठ आणखीनच आवाज चढवून म्हणाले, “न पडायला काय झालं? अगदी क्वचित् योगायोग असतो, तेव्हा तपश्रेष्ठ शिष्यापुरतं असं आश्र्चर्य घडू शकतं. पण आता तुझं वाटोळं तूच करून घेतलं आहेत, स्वत:ला मिळालेलं शक्तीधन दुसऱ्याला दिल्यामुळे. “
डोळ्यातले अश्रू टिपत रामानुजम् म्हणाला, “गुरूश्रेष्ठ, ज्यांना मी मंत्र सांगितला त्यांचं कल्याण होणार असेल, तर मी नरकात गेलो तरी चालेल. मंत्राचा अर्थ मननाने त्राण देणारा. आणि परोपकार हे उत्तम मनन आहे असं तुम्हीच मला अनेकदा सांगितलंत. त्या परोपकाराचं कर्तव्य, तुमच्या कृपेने मला करायला मिळालं. मी तुमचा ऋणी आहे. “
गुरूश्रेष्ठांच्या रागाचे रुपांतर रडण्यात झाले. ढगांच्या गडगडण्यानंतर पाऊस येतो, तसाच वैचारिक गडगडाटानंतर अशा ज्ञानधारा, मानवाचे मंगल करतात. गदगदलेल्या आवाजात गुरूश्रेष्ठ म्हणाले, “तू आज माझा पराभव केलास, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. “