उंदराने बुध्दी पळवली.

Date: 
Sat, 17 Mar 2012

पद्मा ओरडत बाहेर आली तेव्हा व्हरांड्यात मामा व वसंता गप्पा मारीत बसले होते. वसंता तट्कन उठून म्हणाला, “काय गं काय झालं?”
“या मेल्या उंदराने प्रसादाचा मोदक पळवला “
तोपर्यंत सोफ्यामागे जाऊन तिथून तो उंदीर पळाला. खिडकीकडे धावला. आणि टुणकन बाहेर उडी मारून पसारही झाला. वसंताचा बुध्दीवादीपणा आणि नास्तिकपणा, मोदक खायला काही नाही म्हणत नसे. ‘मोदकापुरता गणपती’ त्याला मान्य होता.
वास्तविक उंदराने काही मोदक पळवला नव्हता. त्याचा तुकडा चावून तो गेला होता. तरीसुध्दा मोदक उष्टाच झाला होता. वाया गेला होता. वसंता चिडून म्हणाला, “तू काय डोळे मिटून बसली होतीस काय?”
त्याच्याकडे हात वेळावीत पद्मा म्हणाली, “होय होय महाराज, नैवेद्य दाखवताना डोळे मिटावेच लागतात, तरी मी काही खरे डोळे मिटले नव्हते; नुसते किलकिले केले होते. तेवढ्या त्या मेल्या उंदराने डाव साधला. “
मामा पोट धरधरून हसायला लागले. ते पाहून पद्मा चांगलीच चिडली. ती म्हणाली, “तुम्हाल हसायला काय झालं? माझी फजिती झाली त्यात तुम्हाला एवढं हसू का फुटतंय?”
मामांनी आपलं हसू आवरायचा मुळीच प्रयत्न केला नाही. ते म्हणाले, “तुझा प्रश्र्न आणखीच हसायाला येणारा आहे. हसण्याजोगे प्रश्र्न असताना रडायचं मी अजून शिकलो नाही. “
वसंता बायकोच्या मदतीला धावला. तो म्हणाला, “मामा, माझा या कर्मकांडावर विश्र्वास नाही. पण पद्माचा आहे. “
“तसा आहे तर देवापुढे ठेवलेला नैवेद्य स्वत: खाण्याऐवजी देवाने खावा, अशी तिनं इच्छा करायला हवी. “
पद्मा ठसक्यात म्हणाली, “देवानं खायचं माझ्या कुठे भाग्यात आहे? देवानं नैवेद्या खायला माझी काहीच हरकत नाही. “
मामानं हसत हसत टोला दिला, “देवाला पुष्कळदा भरवावं लागतं त्याच्या चाकरांनी. उंदीर तर गणपतीचं वाहन. स्वत:साठी किंवा गणपतीसाठी त्यानं नैवेद्य नेला, हे तू भाग्य समजायला हवं होतं.”
अवाक् झालेल्या पद्माच्या चेहऱ्याकडे पहात, आपला टोमणा पुढे चालवत, मामा म्हणाले, “तुझ्या या बुध्दीवादी नवऱ्यानं स्वत:साठी मोदकाची लालूच ठेवण्यापेक्षा, तुला मोदकाऐवजी दुर्वा खायला सांगायला हवं. चोरांनो, तुम्हाला सांगितलं कोणी क गणपतीला मोदक आवडतो? गणपतीला आवडतात दुर्वा. त्याच्या नावानं तुुम्ही मोदक करता आणि वाटणी अशी करता की मोदक तुम्हाला आणि दुर्वा गणपतीला. उलटं नाही करीत”
ओशाळलेल्या वसंताकडे पहात मामांनी टोमणा पुरा केला, “मोदकाऐवजी गणपतीचा खरा प्रसाद दुर्वाच आहे. त्या खाल्ल्याने प्रकृती छान होते. “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView