कलकीचं स्वप्नरहस्य

Date: 
Sat, 13 Oct 2012

कलकी हा भारतीय आध्यात्माचा मानवी चमत्कार आहे. विष्णूचे दहा अवतार झाले असं मानलं जातं. त्यापैकी दहावा अवतार कलकीचा. पण हा अवतार झालेला नसून ही ‘कल की बात’ आहे. उद्याची बात आहे.
विष्णू हे एक मूलशक्तीचं वर्णन आहे. शंकर आणि विष्णू या दोन्ही महाशक्ती. दोघांचाही विषाशी संबंध आला. शंकर लोककल्याणासाठी विष प्याला. आणि विष्णू हा शब्दच मुळी विषापासून सुरू होतो. विष+अणू = ”विष्णू” आता ‘णु’ऐवजी न् वापरतात तरी काही या ‘नु’चा अर्थ करताना, ’प्रणव’ या शब्दाकडे वळले पाहिजे. आचार्य विनोबाजींनी ‘उपनिषदाचा अभ्यास’ या पुस्तकात पान अकरावर ‘प्रणवा’वर चांगले विवेचन केले आहे. ‘प्रण’ म्हणजे ‘श्रेष्ठ’, ‘प्रगाढ स्तुती’ असा अर्थ होऊ शकेल. कारण ‘प्रणव’ हा शब्द ‘नु’ म्हणजे स्तुती करणे या धातूला ‘प्र’ हा उपसर्ग लागून तयार झाला. आता ‘नु’ किंवा ‘णु’ म्हणजे जर स्तुती करणे, तर विष्णु म्हणजे विषाची स्तुती करणे असेच झाले.
विष्णुच्या आजुबाजूला पाहिलं, तर छायाराज नाग विषाचे कुंभ घेऊन विष्णुवर छत्र धरतो आहे, असं दिसेल. तेव्हा विष्णु आणि विषाचे संबंध अगदी सरळ आहेत.
विषाचं अमृत बनतं, अशी कल्पना गीतेच्या अठराव्या अध्यायात सांगितली आहे. स्वत: विष पिऊन लोकांचं कल्याण करणारा शिव आणि त्याच लोककल्याण व्रताचं प्रतिबिंब होत राहिलेला विषधारी विष्णु, दहा अवतारभर कष्ट भोगीतच लोकांचं कल्याण करीत राहिला. अर्थात्, अजून दहाव्या अवताराचं अग्निदिव्य त्याला करायचं आहे. हे सगळं विषदिव्य, जगातल्या या महाशक्तीला कशासाठी करावं लागणार आहे? तर फक्त लोक सुखी व्हावे म्हणून. परोपकारची ही पताका, युगानुयुगं फडकावीत आज लोाकंाच्या आदराला पात्र झाली. कलकी नावाचा अवतार या कलियुगात पतितांच्या उध्दारासठी येणार आहे, असं महाभारताच्या वनपर्वाच्या 197व्या अध्यायात म्हटले आहे. जडदेहात संपूर्णाला अपूर्ण रूप येते, अमर्यादेला मर्यादा पडते, हे एका अर्थानं खरं आहे. पूर्वीच्या पुण्ययुगात, राम, कृष्ण, शंकर यांना दैत्यांचं दमन करता करता आपलं सगळं आयुष्य खर्ची घालावं लागलं, तिष बोलून चालून कलियुग कालात एका कलकीला किती कष्ट उपसावे लागतील? ज्याला सत्याचं ज्ञान झालं त्यानं स्वत:ला कलकीचा अवतार मानावं, तसं व्हावं, स्वत:ला उंच न्यावं, त्याच्या समर्पणातून दुसरा कलकी स्फूर्ती घेईल, मग तिसरा, मग चौथा.
धर्मानं सांगितलं आहे, की देव प्रत्येकातच आहे, तेव्हा कलकी होण्याची जबाबदारी सर्वांच्यावरच आहे. ती टाळली, आणि “उद्याचं कोणी पाहिलं आहे? कलकी बात कल” असं म्हटलं, तर कलकीचा अवतारसुध्दा तुम्हाला वाचवू शकणार नाही.

व्हाल्टेअरनं म्हटलं होतं, “जगात देव नसेल, तर तो निर्माण केला पाहिजे. “ देव ही माणसाला आवश्यक अशी, माणसाला तारक अशी शक्ती आहे. ती केवळ विषयोपभोगासाठी वापरता येणार नाही. कर्तव्य करत असताना, भोवती फेर घालणारे विषयोग सुसह्य करण्यासाठी ही शक्ती तुम्हाला आदर्शाचं सामर्थ्य देईल. विष्णुच्या दहाव्या अवताराचं हे रहस्य तुमच्या-आमच्यात दडलं आहे. विषमय परिस्थितीवर मात करणाऱ्या प्रत्येकामध्ये विष्णुचं हे दशावतारपण अवतरेल.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView