कापले ते उगवले

Date: 
Sun, 21 Aug 2011

कापले ते उगवले
किरणांच्या टोपल्यातून उन्हाचे निखारे रस्त्यावर पसरत होते. जळती पावले टाकीत सूर्य चालला होता.
पंचनद्यांच्या प्रदेशात थंडी ‘मी’ म्हणते, तसा अहंकार उन्हाळ्यात असतो. आणि अशा कडक उन्हाळ्यामध्ये एखाद्या शीतल चांदण्यात फिरायला निघाल्यासारखा गुरू नानक चालत होता. तोंडाने हरीनामाचा मंद गजर होत होता. मधुरतेला स्वत:च मान डोलली जात होती. आणि दोन्ही हाताच्या चुटक्या, टाळपखवाजाची र्उीीव भरून काढीत होत्या.
रस्त्यवर लागलेली ही ब्रह्मानंदाची टाळी आणि चुटक्या, सूर्याच्या चटक्याने थांबवल्या नाहीत. त्या एका उन्मत्त व्यवहार कौशल्याने थांबवल्या.
‘ए वेडपटा, पुरे झालं तुझं ढोंग. ‘

नानक रागावला नाही. समोर उभारलेला संताप, नीट निरखत थबकला. थोडासा सुध्दा हसलासुध्दा. आरोप करणारा व संतापणारा माणूस दुसऱ्याला नमवण्यासाठी जी ओरड करतो, त्याच्यासमोर लाचारी ऐवजी, लोलकासारखे हास्य दिसले, तर रागावणारा माणूस भडकतो. तसेच नानकाला थांबवणाऱ्याचे झाले. आदल्या महिन्यात नानकानी रानात राखायला नेलेल्या गुरांनी, नानक भजनाच्या नादात असताना, या माणसाचे कापणीला आलेले उभे शेत खाऊन टाकले होते. आणि अधिकाऱ्यांसमोर आज, कमी पडलेल धान्याची भरपाई नानकाला करून देण्याची बोली होती. ‘हरि’ला ओंकाराची जोड देत नानकाने पावलं मागे वळवली. मोजणीच्या जागी उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांसमोर, नानक मिटल्या डोळ्यांनी आणि हरिनाम उच्चारणाऱ्या तोंडानीच, मोजणीचा साक्षी झाला होता.
शेताचा मालक अधिकाऱ्याला व मोजणीदाराला बजावून सांगत होते. “सहा खंडी धान्या मला दरवर्षी येतं. त्यात एक कण कमी पडला तरी या ढोंग्याल भरून द्यावा लागेल.”
मापे सहा खंडी भरली. मोजणी अखंड चालूच होती. अधिकाऱ्याने मिटल्या डोळ्याच्या नानकाचे पाय धरले. त्याचे डोळे उघडले होते. शेतमालकाचे डोळे विस्फारले होते.
खाल्लेली, कापलेली झाडे दुप्पट जोमाने तरारतात. टाकलेले मिळेत व उगवते. नि:स्वार्थ हा उत्तम स्वार्थ साधून देतो. त्याचा चमत्कार नानकाच्या मदतीला उभा राहिला होता की काय, हे नानकाच्या निष्ठेला माहीत की ‘हरि’ला माहीत!

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView