काळ्या टोळीचे रहस्य

Date: 
Sun, 15 Jun 2014

थॉमसनचा मुलगा बॉब काळ्या टोळीने पळविला ही बातमी पोलिसांना कळल्यावर पोलीस घामाघूम झाले.
काळ्या टोळीचा दरारा मोठा होता. तसा थॉमसानचाही. काळी टोळी अत्यंत क्रूर धाडसी पण हुशार गुंडाची गाजलेली मजलस होती. तिने आजपर्यंत चार पोलीस अधिकाऱ्यांचेच खून केले होते. स्कॉटलंड यार्ड दीड वर्ष या टोळीच्या मागे राहूनसुध्दा हतबल होते. उलट थॉमसन हा मातबर उद्योगपती, तीन गिरण्या, विशाल धनदौलत, कित्येक छोटी मोठी दुकाने आणि अनेक वरिष्ठ मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी घरोब्याचे संबंध असलेला हा उद्योगपती.
सकाळच्या अंकात पहिल्या पानावर बॉबच्या फोटोसकट ही बातमी झळकली. स्कॉटलंड यार्डच्या कचेरीतून सात वाजून चाळीस मिनिटांनी थॉमसनला फोन आला. थॉमसनने कसलीच घाई केली नाही. तो बाथरूममध्ये होता, त्याने पुन्हा अर्धा तासाने फोन करा म्हणून निरोप दिला.

स्कॉटलंड यार्डच्या जेम्सना थॉमसनचा थंडपणा माहीत होता. पण या बिकट क्षणालासुध्दा तो चळला नव्हता, याचे त्यांना कमालीचे आश्र्चर्य वाटले. त्यांनी फोन खाली ठेवला आणि समोरच्या इन्स्पेक्टर केनिंगपुढे दोन्ही हात उडवीत म्हणाले, “झुंज जबरी होणार. “
सकाळी सव्वानऊला थॉमसनला जेम्सचा पुन्हा फोन आला. जेम्सनी टेलिफोनवर सांगितले, “आम्ही आमची शिकस्त करतो. तुम्हाला काही माहिती कळली तर कळवा. “
“ठीक आहे. “ मोजके दोनच शब्द उच्चारून थॉमसनने फोन खाली ठेवला. त्याच्या मेजाभोवती टेलिफोनचे जवळ जवळ अर्धवर्तुख होते. त्यातला अत्यंत खाजगी नंबर वाजत होता. तो नंबर डिरेक्टरीत नव्हता. तो थॉमसनच्या सेक्रेटरीलाही माहीत नव्हात. फक्त थॉमसनच्या बायकोला - घटस्फोट घेतलेल्या आणि आता नव्या पत्नीला. पण नवी पत्नी तर घरातच होती. मग फोन कोणाचा होता?

थॉमसनने शांतपणाने फोन उचलला - दुसऱ्या बाजूने आवाज आला, “काळ्या टोळीचा नमस्कार. थॉमसन आम्हाला फक्त 5लक्ष पौंड पाहिजेत. तुझी एक गिरणी विकल्याने तू काही गरीब होणार नाहीस. “
थॉमसन म्हणाला, “दोन मिनिट तुम्ही मला क्षमा केली पाहिजे. मी सिगारेट पेटवून पुन्हा तुमच्याशी बोलता. “उत्तराची वाट न पहाता थॉमसनने फोन बाजूला ठेवला. सिगारेट पेटवली.
दुसरे टोक थोडेसे हसले आणि म्हणाले, “तुझ्या धैर्याच्या आजपर्यंत पुष्कळ गोष्टी ऐकल्या. सिगारेटनं धीर येतो असं डॉक्टर सांगतात. पण तुला गरज वाटेल असं वाटलं नव्हतं. “
थॉमसन काहीच बोलला नाही. न बोलणे हेच त्याचे बोलणे होते. ते दुसऱ्या टोकाला पोचले आणि ते दुसरे टोक पुन्हा म्हणाले, “आता आपण व्यवहार बोलू यो. तू पाच लक्ष पौंडाच्या नोटा पोत्यात घालून वर प्लॅस्टिकच्या - “

थॉमसने झुरका हवेत सोडला आणि मग तो म्हणाला, “एवढ्या छपवाछपवीचे काही कारण नाही. मी स्कॉटलंड यार्डला काहीसुध्दा सांगितलं नाही. यावरून पोलिसांची मदत घेण्याचा माझा विचार नाही हे तुमच्या हुशार हेरांना समजायला हवं होतं. तुम्ही माझ्याशी सरळ व्यवहार करू शकता. प्रथम आपण स्पष्ट बोलू. माझ्या कचेरीत तुम्ही दीड तासाने येऊ शकता. बरोबर दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आलात, तर खोलीचं दार उघडून सरळ आत येऊ शकता “

उत्तराची वाटही न पाहता थॉमसनने टेलिफोन खाली ठेवला. तेवढ्यात दुसरा फोन वाजला. सेक्रेटरीने टेलिफोनवरून सांगितले की, “टाइम्सचा प्रतिनिधी त्यांची मुलाखत मागत आहे. “
थॉमसनने उत्तर दिले, “त्याला तू दुपारी पावणेतीनची वेळ दे. आणि मला ब्रेकफास्ट पाठवून दे. “ ब्रेकफास्ट आला. थॉमसनने तो खुषीत खाल्ला. आणि अगदी ठराविक वेळेला तो आपल्या कचेरीत पोहोचला. त्याच्या खुडी काळ्या टोळीचा प्रतिनिधी समोरच्या खुुर्चीत होता तरीही कायम होती. दाढीवाला, गॉगल्स लावलेला, आणि चार्लस हे आपले नाव सांगणारा तो टोळीवाला थॉमसनच्या थंडपणानेच हादरून गेला होता.
हातातली फाईल चाळतच थॉमसन चार्लस्शी बोलत होता. त्याला तो म्हणाला, “तुमच्या हातात बॉब सापडला आहे. तुम्ही त्याला ताबडतोब मारून टाका आणि त्याचे प्रेत लंडन टाइम्सच्या समोर धावत्या मोटारीतून टाकून द्या. या कामासाठी माझी एक मोटार मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुमच्या उजव्या बाजूच्या ट्रेमध्ये मोटारीची किल्ली आहे.

चार्लस चक्रावून गेला होता. त्याने ट्रेकडे पाहिले, किल्ली पाहिली. त्याला काय बोलावं हेच सुुचेना.
थॉमसन थोडा हसून म्हणाला, “तुम्ही घाबरू नका. तुम्ही या पोराला मारलं तर माझ्यावर उपकार होतील. त्याचं असं आहे, माझ्या पहिल्या बायकोचं नाव फ्रेडी. तिचं माझं गेल्या दीड वर्षात क्षणभरही पटलं नव्हतं. पण तिच्या या म्हणजे माझ्याही जॉन या नावाच्या मुलावर मात्र माझा फार जीव. त्याउलट हल्लीच्या बायकोपासून झालेल्या बॉबचं. हल्लीच्या बायकोचं आणि माझं बरं जमतं, म्हणून मला तिच्यापासून झालेल्या बॉबवर प्रेम दाखवावं लागतं. पण माझी इस्टेट त्याला मिळावी हे मला मुळीच नको आहे. त्याला तुम्ही पळवला नसता, तर मी त्याला मारलं असतं. आता ते माझं काम तुम्ही करणार आहात. आभारी आहे. “

चार्लस् चकित होऊन पहात राहिला. हे नसते लचांड निर्माण झाले होते. थॉमसनला मुळातच संकट नाही आणि आपण तर येथे येऊन बसलो. आपल्या मागावर न राहण्याचे कोणतेही बंधन थॉमसनवर किंवा पोलीस खात्यावर नाही, हे चार्लसच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. काळी टोळी प्रथमच एका विलक्षण धोक्यात आली होती. चार्लस म्हणाला, “आम्ही विनाकारण हव्यास करत नाही. यातून आता तुम्हीच मार्ग सांगा. “
थॉमसन पुन्हा हसून म्हणाला, “त्याची किंमत फक्त 5लक्ष पौंड आहे. काळ्या टोळीला एवढी रक्कम महाग नाही. अर्थात्

लाजेकाजेस्तव बॉबही मला मिळाला पाहिजे. तेव्हा बॉब आणि 5 लक्ष पौंड बंद मोटारीतून माझ्याकडे दीड वाजायच्या आत पोचवले पाहिजेत. मी देत होतो तीच मोटार घेऊन जा. म्हणजे तुमचा संशय कोणाला येणार नाही. “
चार्लसने ट्रमधली किल्ली उचलली आणि खालच्या मानेने तो बाहेर पडला.
दुपारी

दुपारी दीड वाजता थॉमसनच्या सेक्रेटरींना 5 लक्ष पौंड मोजायला अर्धा तास लागला. टाइम्सच्या बातमीदार, स्कॉटलंड यार्डच जेम्स दुपारी पावणेतीनला थॉमसनच्या कचेरीत बसले होते तेव्हा चार वर्षाचा बॉब एका डुलत्या खुर्चीत बसला होता. सकाळी जेथे चार्लस बसला होता तेथेच जेम्स बसले होते.
थॉमसन खुर्चीवर मागे रेलून म्हणाला, “फ्रेडीच्या मुलावरूनच माझं तिच्याशी भंाडण होत होतं. आणि तो माझा मुलगा नसून, तिच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा होता. बॉबबद्दल मी बेफिकीपणा दाखवला नसता तर बॉबही मेला असता आणि पाच लक्ष पौंडही गेले असते. “
“पण “ जेम्सने तोंड उघडले.
“पण बिण काही नाही हो. धंदेवाल्याजवळ धाडस असल्याशिवाय त्याला धंदा करताच येत नाही. हे बॉब कार्ट पुन्हा पुढे मोठे होणार. चौथ्या वर्षी त्याने पाच लक्ष मिळविले आहेत. आणि त्यानं काळी टोळी पकडण्याचं महान काम केलं आहे. “

जेम्सच्या चेहऱ्याचे प्रश्र्नचिन्ह झाले होते. थॉमसनने खुलासा केला, “मिस्टर जेम्स, चार्लसला मी मोटार दिली होती, त्या मोटारीच्या मागल्या सीटवर छोटा साऊंड कॅमेरा होता. आणि मोटार चालू झाली की तिच्या चाकाबरोबर तो चालू होण्याची व्यवस्था होती. चार्लस कुठे गेला हे तुम्हाला खालच्या मोटारीतल्या फिल्म्स् एक्सपोझ केल्यावर कळेल. काळी टोळी पकडण्याचे श्रेय तुम्हाला आठ तासाच्या आत मिळेल. आणि लंडन टाइम्सला दोन मोठ्या बातम्या मिळतील.
आपल्या दोन चकित ज्येष्ठ मित्रांना आश्र्चर्याच्या समुद्रात सोडून थॉमसन डोलत्या खुर्चीपाशी गेला आणि बॉबला म्हणाला, “पाप पचत नाही बॉब, केव्हातरी ते उघडकीस येतंच येतं. मग त्याचा एखादा अजाण पोर का कारण असेना. “
बॉबला बापाचे बोलण काही कळले नाही. पण बापाच्या हाताला चॉकलेटचा पुडा तेवढा कळला. तेवढा त्याला पुरेसा होता.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView