कौटुंबिक झगडे कसे टळतील?
गीतेच्या लोकप्रियतेचे एक विशेष कारण सांगितले आहे, ते म्हणजे गीतेतील मूलभूत प्रश्र्न प्रत्येक व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि मानवतेच्या स्वास्थ्याचा झगडा आहे. व्यक्तीच्या मानसिक विचारातून कुटुंबाकुटुंबात झगडा निर्माण होतो. त्या पुढली पायरी म्हणजे समाजातील समूह, उपसमूहातील होणारे;आणि अखेर विश्र्वव्यापी.
ही साखळी तोडायची असेल तर कोठेतरी कौटुंबिक झगडेच तोडलेच पाहिजेत. भांडणाच्या मुळाशीच भांडणाची दिशा बदलली पाहिजे. हेच गीतेचे कार्य होते, आणि आहे. मनुष्याला त्याचा आत्मा शोधून देणे, त्याच्या कर्तृत्वाला योग्य दिशा दाखविणे, त्याच्या उन्मेषप्रवृत्तीला योग्य वळण लावणे, त्याच्या दुर्गुणांचा जाच कौटुंबिक किंवा व्यक्तीपातळीवरच खुडून टाकून, त्याला स्वत:ला आणि समाजाला निर्भय करणे, ही गीतेने हातात घेतलेली कामे आहेत. त्या कामात आपल्या विवेचनाची, आपण भर काय ती टाकू शकू. ही भर टाकताना गीतेचे सूत्र कायम राखून मुळातच व्यक्तीचे आणि कुटुंबाचे झगडे कसे टाळता येतील हे आपण पाहणार आहोत. हे उपया सर्वांना समजण्याजोगे, व्यवहारात शक्य आणि सोपे व्हावेत म्हणून कथारूप सांगायचे आहेत.