क्लीब धर्म ‘कराल’ झाला तेव्हा

Date: 
Sat, 14 Jul 2012

क्लीब धर्म ‘कराल’ झाला तेव्हा
उत्तर पळत सुटला.
त्याला ना वस्त्राचं भान, ना वैराचं, मग वीरत्वाचं भान कुठंल?
पांडवांच्या शोधाला, चालून आलेले कौरव समोर दिसल्याबरोबर, बृहन्नडेच्या वेषातला अर्जुन वीरत्वानं सळसळला. आव्हानानं वीरत्वाचे बाहू नेहमीच फुरफुरतात, आणि भीरुतेचे बाहू पळण्यासाठी पायात शिरतात. तसंच उत्तराचं झालं होतं.
अर्जुनानं खाली उडी टाकली. आणि एक झेपेतच उत्तराला पकडलं.
ते दृश्य मोठं विचित्र होतं, की जे पाहून कौरवही चक्रावले, पण त्या चक्रावण्यातूनच त्यांचं कोडंही सुटलं. बृहन्नडेचं विचित्र रूप त्यांना नेमक्या तर्काला पोचवतं झालं.
अर्जुनानं रथाखाली उडी टाकली, तेव्हा त्यानं सुंदर तांबडं वस्त्र परिधान केलं होतं. त्याच्या पाठीवर वेणी हालत होती. क्लीबाच्या रूपाचं ते विडंबन, वीरत्वाला मागं टाकत विराटामागे पळायला लागलं, तेव्हा दृश्य तर हसण्याजोगचं होतं. पण कौरवांचं हसू नुसत्या विनोदबुध्दीपेा अर्जुन शोधानं प्रसन्न झालं होतं.
उत्तर रडकुंडीला आला होता. अडवणाऱ्या अर्जुनाला तो म्हणाला, “मला तरू का अडवतोस? माझ्या मत्स्य देशातल्या सगळ्या गायी कौरवांनी नेल्या तरी हरकत नाही. राज्यातील बायका मुलं माझी चेष्टा करतील, करू देत. मला लढायला सांगू नकोस. लोक मला विचारतील तर मी सांगेन, की राजधानी सोडून बाहेर का गेलास, असं बाबा विचारतील, म्हणून मी परत आलो. “
अजुर्न चांगलाच कातावला होता. पण करतो काय? तो म्हणाला, “तू नुसता रथ चालव. बाकी सगळं मी पहातो. “
हात जोडलेल्या उत्तरानं गयावया आणि हिरण्यमाया अशी दोन शस्त्रं सोडली. तो म्हणाला, “जाऊ दे मला. मला सुख भोगायचं आहे. तुला शंभर मोहोरा, आठ वैडुर्य मणी, सुलक्षणी रथ आणि दहा गज देतो. पण मला तू सोड.”

दहा गजच काय दहा ‘जग’ दिली असती, तरी अर्जुनाला ती तुच्छ होती. वीरता प्रसंगाला दिमाखानं दिलेलं तोंडं. यानंच त्याचं तोंड उजळ होणार होतं. तो म्हणाला, “तुझी सुखं भोगायला तुला मी खात्रीनं जिवंत ठेवतो, पण कौरवांना मात्र मी जिवंत ठेवणार नाही. तू माझं ऐक. नुसते घोडे हाक, उरलेले काम माझं.”
आणि मग नकाराला वेळ देता अर्जुनानं उत्तराला अश्र्वरथावर चढवलं. उत्तर अचंबा करत राहिला, की वेणीचा शेपटा घातलेला एक शेळपट पोषाख, समोरच्या राक्षसी रणाचं निवारण कसं करणार आहे?
पोषाख लढत नसतो. तलवार लढत नसते. मनगट लढत नसतं, तर घट्ट केलेलं मन लढत असतं. ते मनच उत्तरानं सुखभ्रांतीपाशी गहाण टाकलं होतं. ज्याला कर्माचा अर्थच कळला नाही, त्याला धर्माचा अर्थ कळू शकणार नाही.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView