चौथा अवतार नरसिंहाचा

Date: 
Sat, 1 Sep 2012

नारद ब्रह्मदेवाला आणि शंकराला भेटले. तेव्हा नारद जराशा घुश्यातच होते. आसनावर बसताना नारदांनी मांडीवर वीणा काहीशा घुश्यातच आपटली, तेव्हा आजचा रंग काही ठीक नाही,हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं.
त्यानं नारदमुनींना विचारलं, “मुनीवर्य, आज तुम्ही चांगलेच रागावलेले दिसता! “
आतापर्यंत दाबून ठेवलेला राग बाहेर काढायला जणू परवानगीच मिळाली आहे, असं समजून नारद उसळले, “तुमचं सगळं ठीक आहे. स्वर्गात बसता. तुमची कोणी स्तुती केली की, वाटेल त्याला वाटेल तो वर देता. लायक कोण, नालायक कोण, हे पहातही नाही तुम्ही. मला सगळीकडे हिंडावं लागतं. आणि मग लोकांचे जोडे खावे लागतात. “
शंकरानं हसत हसत विचारलं,”तू खातोस कशाला जोडे? “
शंकरानं विरुध्द बाजू घेतलेली पाहून नारद आणखीनच उसळले. ते म्हणाले, “मूर्ख म्हणून मी जोडे खातो. तुम्ही देव मोठे चांगले असता. तुमची भक्ती करावी म्हणून, तुमचे गुणगान करत पृथ्वीवर फिरता. पृथ्वीवर हिरण्यकश्यपूसारखे अनाचारी जन्माला आले, म्हणजे लोक मलाच विचारतात. “
ब्रह्मदेवांनी उत्तर दिलं,”हिरण्यकश्यपूनं घोर तप केलं. मला वर द्यावाच लागला. तप केलेल्याला, ताप सोसलेल्याला, सुखाची राशी मिळावी असा आपला नियमच आहे. “
नारदांना जास्ती चिडवण्यात अर्थ नाही, हे शंकरानं ओळखलं. कारण नारद जागेवरून ताडकन् उठले होते. वीणा उचलून जायच्या तयारीत होते. तेव्हा शंकर म्हणाले, “नारदमुनी, कर्माप्रमाणे फळ द्यावं लागतं. कर्म करणाऱ्यानं चुकीचा हेतु बाळगला, तर त्या हेतुनंच तो गिळला जातो. वाईट हेतूनं मागितलेली शक्ती, आपोआप उलटते आणिभस्मासुराचं भस्म करते. तसंच हिरण्यकश्यपूचाही नाश ती शक्ती करील. “
“कसा काय होणार हा हिरण्यकश्यपू नष्ट?” नारद म्हणाले.
“त्याला अभय मिळालं आहे. तो माणसाकडून मरणार नाही. आत मरणार नाही. बाहेर मरणार नाही. मग मरणार तरी कशानं?”
ब्रह्मदेवानं नारदांना खाली पहाण्याची खूण केली व म्हटलं, “तो पहा तो. आताच मरतो आहे. आत नाही, बाहेर नाही. शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही. नखानं मरतो आहे. माणसाकडून नाही, पशूकडून नाही, तर विष्णूनं घेतलेल्या चौथ्या रूपाडकडून मरतो आहे. “
नारदानं खाली पाहिलं. हिरण्यकश्यपू फाडला जात होता. वाईट हेतूनं मिळवलेली मोठी शक्तीसुध्दा टिकत नाही, हे सत्य सांगणारा दशावतारातला त्या चौथ्या अवताराचा चौथा धडा.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView