जिथे देवही भितो

Date: 
Sat, 3 Mar 2012

शेवटले क्षण उरले होते. नरबळी म्हणून ठरलेल्या अभागी माणसाच्या चेहऱ्यावर जी विफलता, जी आर्तता, जो टाहो दिसायचा, तो जडभरताच्या चेहऱ्यावर मुळीच दिसत नव्हता.
जणु काही पंचपक्वान्नांच्या मेजवानीसच बसलो आहोत, अशा थाटात जडभरत पाटावर बसला होता. काही क्षणातच त्याचे मुंडके उडवले जाणार होते.
जडभरत मेल्यावर त्याच्यासाठी कोणी रडणार नव्हते. जडभरताचे कुटुंब तर त्याला त्रासूनच गेले होते. सरळपणाच्या त्या पुतळ्याला कोणीही फसवावे, अशी गत, व्यवहार काडीमात्र कळत नाही. नुसते शांतीचे सामर्थ्य काय चाटायचे असते? त्याचे भाऊ त्याला कंटाळून गेले होते. शेतावर पहार करण्याचे ढोबळ काम त्याच्या गळ्यात मामाने मारले होते.
आणि शेत राखता राखता जडभरतच चोरीला गेला, शेजारच्या परिसरात भद्रकालीने आणलेला एक अभागी बळी पळून गेला. आयत्या वेळी जवळपास कोणी मिळाला नाही. तेव्हा त्या क्रूरकर्म्याने जडभरतालाच पडकला आणि देवीपुढे कापायचा ठरवला.
“तुला आम्ही पहिल्यांदा आंघोळ घालणार आहोत. “
“छान छान” , जडभरत आनंदाने म्हणाला, “बसतो मी विहिरीच्या काठावर. “ थंड पाण्याने जडभरताची अंाघोळ उरकली.
“आता तुझी पूजा करायला हवी. “त्याला कापणारे उपचार पाळण्याची शिकस्त करत म्हणाले. जडभरताने पूजेसाठी स्वत:चे पाय पुढे केले. याला कशाचेच काही नव्हते. पूजेनंतर नैवेद्य पक्वान्नांचा होता. जडभरताने तोही संतुष्ट ढेकरेची साक्ष येईपर्यंत संपवला.
“चल उठ. आता देवीला तुझा बळी देणार आहोत. “
जेवढ्या निर्भयतेने आंघोळीला, जेवायला, पूजा करून घ्यायला तयार होता; तेवढ्याच निर्भयतेने जडभरत बळी जायलाही बसला.
देवी भरल्या डोळ्याने पहात होती. तलवार उचलली जात होती. तिचा बळी समोर दुभंगला जाणार होता. देवीच्या मनात विचार आला की एवढ्या समतोल अलिप्तपणात, स्फोटक सामर्थ्य असतं. या महाभागाला मारून आपलेच वाटोळे व्हायचे.
आणि मग आश्र्चर्य घडले. जडभरताला मारण्यासाठी उगारलेली तलवार ती उगारणाऱ्याच्याच गळ्यावर सर्रदिशी फिरली. देवीने न्याय दिला. जो मरणाला तयार असतो, तो मरू शकत नाही. जडभरत त्या दिवशी मरताना रडला असता, तर खराच मरून गेला असता. मरण डोळ्यासमोर दिसत असताना, तो अभय राहिला, म्हणून अमर झाला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView