झोरास्टर अमर झाले

Date: 
Sat, 10 Nov 2012

सूडाच्या निखाऱ्यात बाल्क शहर पेटलं होतं, धुमसत होतं. तुराण फौजा बाल्कभोवती जमा झाल्या होत्या. मानवतेचे महापुत्र झोराष्टर, सुरक्षित नव्हते. म्हणजे खरं तर त्यांना स्वत:च्या सुरक्षिततेची पर्वाच नव्हती. ती असती, तर त्यांना काही कमी नव्हतं. त्यांचा झगडा होता तो धर्मरक्षणासाठी त्यांच्या धर्मपुत्रांच्या आत्म्याचं रक्षण व्हावं म्हणून.
बाल्कच्या त्या अग्निमंदिरात झोराष्टर अखेरच्या प्रार्थनेसाठी आले. शत्रू चौफेर दबा धरून होते, हे त्यांना माहीत होतं. तसंच बोलायचं तर, मागच्या झरोक्यातून सैतानाचा एक साथीदार, तुरीन सैनिकाच्या वेषात हातातला सुरा पाजळत, चाहून घेत होता. झोराष्टर प्रार्थनेत मग्न झाले की, त्यांच्यावर घाव घालायचं काम, त्याला सैतानाच्या नावानं उरकायचं होतं.
या सगळ्या शक्यता माहीत असूनसुध्द झोराष्टर अग्निमंदिरात नि:शंक उभे होते. नेत्याचं मरण हे भित्र्या अनुयायानासुध्दा बळ देतं, तर शूराचं बळ वाढवतं. ज्यांचा जन्म उपयोगी असतो ते सज्जन, आपलं मरणही समाजाच्या कसं उपयोगी पडेल, याची चिंता वाहात मृत्यूला सामोरे जातात.

त्या अखेरच्या क्षणात झोराष्टरना कितीतरी प्रसंग आठवले. बायकोची साथ मिळाली नाही. नातेवाईकांची साथ मिळाली नाही. राजा विस्तुपाच्या दरबारात साध्या दरवानानंही त्यांना अडवलं, तेव्हा दरबारात प्रवेश करण्यासाठी त्यांना आपलं तेज खर्ची टाकावं लागलं. राजदरबारामध्ये त्यांचे हात सन्मानित झाले खरे! पण क्षुद्र मत्सराच्या धुमसत्या धगीपासून झोरष्टर होरपळतच राहिले. अर्थात् ते होरपळणं तप म्हणूनच झोराष्टरनी आदरलं.
ज्यांनी जीवनसुध्दा यज्ञसमिधा म्हणून स्वीकारलं, त्यांना जळण्याची भीती कसली वाटणार? निखारा जळत नसतो, आणि बर्फ बुडत नसतो.
झोराष्टर म्हणाले, “सत्य न्याय यांच्याविरुध्द असत्य आणि अन्याय यांंचा झगडा सैतानानं सुरू केला आहे. त्या झगड्यात माझा बळी जायचा असेल, तर जाऊ दे. पण सत्याचा विजय होऊ दे. मी व सत्य, यात सत्य जगलं पाहिजे. त्यात माझं जगणं आपोआप आलं. “
झोराष्टर खाली वाकले. तोवर मागे सैतानाचा दूत खाली उतरला होता. त्याच्या उजव्या हातात सुरा होता. डावा हात त्यानं एकदा दाढीवरून फिरवून घेतला. देवासमोर वाकलेल्या व्यक्तीवर वार करणं सोपं म्हणून तो तुराणाचा सूडकरी वेगानं धावला, आणि त्यानं झोराष्टरांच्या पाठीत सुरा खुपसला.
अग्नीदेवतसेमोर एक अग्नीज्योत एका देहातून मालवली. अनंत देहात सत्यप्रकाश पेटवण्यासाठी.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView