डार्विन व दुसरा दशावतार
चार्लस् डार्विननं एक सिध्दांत मांडला. जिवाची उत्पत्ती कशी झाली, याच्या पायऱ्या त्यानं तयार केल्या. जलचर, सरपटणारे प्राणी, उडणारे प्राणी, हळूहळू सस्तन प्राणी. मग माकडापर्यंत प्रगती आणि तिथून माणूस. अशा तऱ्हेनं सृष्टीच्या प्रगतीची रूपं, त्यानं जगापुढे मांडली. धर्माचाऱ्यांनी तेच काम दशावतरातली दहा स्थळं निवडून केलं. सजीव सृष्टीच्या प्रगतीचे ते दहा टप्पे होते.
म्हणूनच पहिला अवतार जलचर होता, तर दुसरा अवतार कूर्मावतार म्हणजे कासवाच्या रूपानं सृष्टीत जन्मलेला. मनूनं छोट्या कमंडलूतून जग व्यापलं याचा अर्थ वाढता वाढता सजीव सृष्टी, त्यावेळेला असणाऱ्या प्राण्याच्या साम्राज्यात बलिष्ठ झाली, मोठी झाली. आणि त्या मत्स्यसृष्टीनं आंतरिक निश्र्चय केला. तो अज्ञान बुडवून टाकण्याचा, ज्ञान स्वीकारण्याचा. एकमेकाला मदत करण्याचा.
पृथ्वीवरचं पाणी ओसरलं. विशिष्ट जलस्थळात, समुद्रात ते साचण्याची व्यवस्था झाली. तेव्हा प्राणीसृष्टीत सुध्दा बदल व्हावा लागला. मासे फक्त पाण्यात फिरू शकतात पण आता जमीन निर्माण झाल्यावर जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी फिरू शकणारा असा जीव निर्माण व्हायला हवा होता. कोणतंही नवं काम करायला नवी उमेद, नवी हिम्मत अवतरायला हवी असते. तीच अवताराच्या रूपानं अवतरते म्हणून माशाच्या अवतारानंतर झाल, तो शक्तीचा कासवरूप अवतार. पाणी आणि जमीन दोन्हीकडे वावरू शकणारा.
अमृतमंथनाचा तो प्रसंगच अपूर्व होता. देव आणि दानव समुद्रभर आशा घेऊन जमा झाले होते. पण आशा वाईट आहे, हे दुसऱ्याने सांगून समजत नाही. एक म्हण आहे की, “मागच्याला ठेच, पुढला शहाणा. “ दुर्दैवाने पुढल्याच्या ठेचेमुळे कुठलाही मागला शहाणा होत नाही. प्रत्येक ाला आपापल्या अहंकाराच्या दगडावर स्वतंत्रपणानं पाय ठेचून घ्यावा लागतो. रक्तबंबाळ करून घ्यावा लागतो.
ती झाली पुढची गोष्ट. देव आणि दानव जमले होते, तेव्हा त्यांना पुढच्या ठेचा दिसत नव्हत्या तर सुखाचा मंदार पर्वत दिसत होता. तो घुसळला, की समुद्रातून अनंत रत्नं बाहेर पडतील हा आशासागरही.
पण मंदार अस्थिर होता. समुद्रातल्या पर्वतप्राय लाटांचे लोट त्याच्यावर कोसळत असताना तो तरी किती स्थिर राहू शकणार? आणि तो स्थिर झाला नाही तर त्याची रवी कशी करणार? आणि समुद्र कसा घुसळणार?
देव आणि दानव, या दोघांचंही, मंथन सुरू व्हावं, याबद्दल एकमत होतं. बक्षिसांची सोडत सुरू होण्याबद्दल जुगाऱ्याचं एकमत असतं. बक्षिसाचा उपयोग चांगल्या, वाईट, कामासाठी करण्याचा हेतू हा तरतमाचा भाग असतो.
समुद्र खवळलेला होता. मंदार डोलत होता. सगळ्या आशंाकितांच्या जिवाचा आकांत चालू होता. अमृतमंथनाची ‘सोडत’ सुरू कशी होणार? माणूस ज्याच्या आशा सोडत नाही त्या हाताबाहेरच्यालाच ‘सोडत’ म्हणतात ना?
हळूच कासव पुढे झालं. बोलता बोलता ते महाकाय झालं. त्याला आशा नव्हती, अपेक्षा नव्हती. मंदाराच्या खाली जाऊन ते त्याला स्थिर करणं हेच त्याचं अवतारकार्य होतं. कासव धिम्या गतीनं मंदाराखाली गेलं. धिमेपणाचं ते प्रचंड प्रतीक स्थिर झालं, मंदारही स्थिर झाला.
सृष्टीच्या रचनेचं दुसरं पान उमटलं. तिला जरूर अशा विविधता निर्माण व्हायचा क्षण आला होता. अमृतमंथनाचा अमृतक्षण दशावतारांपैकी दुसऱ्या कूर्मावतारां जन्माला आला.