डोळे असलेला आंधळा
गांधारी दुर्योधनाला म्हणाली, “तू माझा अत्यंत प्रिय पुत्र आहेस. आडदांड आहेस, पण कर्तबगार आहेस. माझ्या पतीला जे आंधळेपणामुळे करता आलं नाही ते करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. दोन आयुष्यांचं काम तुला एकट्याला करायचं आहे. तुला समर्थ करणं, बळकट करणं, हे कौरवकुलाचं कर्तव्य आहे. मी माझं पुण्य तुला देते. माझ्या अंंाधळ्या पतीचं दु:ख घेण्याचं व्रत म्हणून मी डोळ्यावर पट्टी बांधली. तेव्हा माझं सगळं सामर्थ्य डोळ्यात आहे. जिथे तप होतं, त्याला सामर्थ्य येतं. माझं सामर्थ्य माझ्या डोळ्यात आलं आहे. तुझ्यासाठी माझ्या डोळ्यावरची पट्टी मी दूर करते. एकदाच. फक्त एकदाच. “
दुर्योधन महत्त्वाकांक्षेने मोहोरलेला जीव होता. तो नाचत म्हणाला, “दे आई, मला सामर्थ्य दे. मी सगळं जग जाळून टाकीन.“
सगळं जग जाळून टाकण्याची भाषा करतात ती माणसं, त्या जगाचा आपणही एक घटक आहोत, हे विसरतात. हे विस्मरणच त्याचं दुर्दैव असतं.
गांधारी डोळ्याची पट्टी सोडत म्हणाली, “अंगावरचे कपडे काढून टाक. माझी दृष्टी तुझ्यावर लागलेला सर्व भाग मृत्यूहीन होईल. त्याला कधी धोका पोचणार नाही. “
दुर्योधनाने सारे कपडे भराभर काढून टाकले. गांधारीनं डोळ्यावरची पट्टी सोडलेली होती. तो आईला म्हणाला, “उघड डोळे आई.”
गांधारीने पापण्या सुट्या केल्या. झाकलेल्या शिंपल्यातून दोन तेजस्वी, टपोरे मोती मुक्त व्हावे, असं दुर्योधनाला वाटले. गुहेतले दोन सिंह गुहेच्या द्वाराशी यावे तसे पापण्याच्या आयाळीतून दोन निश्र्चय सिंह दुर्योधनाच्या कायेकडे रोखत राहिले. आकाशत दोन मंगळ दिसावेत तसे तांबूस तेजवान, गोलाकार, भेदक.
लक्ष शब्द आणि डोळ्याचे एकच लक्ष. कोटी कोटी वर्णने आणि वर्ण साक्षीने डोळ्यंाची झालेली एकच उघडझाप, यात अंतर नसतं. त्या एकाच उघडझापीत गांधारीनं आपले पुण्यरक्षक कवच, दुर्योधनाच्या शरीरावर रोखलं. डोळे मिटून पुन्हा पट्टी बांधताना ती दु:खी आई म्हणाली, “दुर्योधना, शरीरावर तुझ्यासारखा दुर्दैवी तूच आहेस रे. तुला शरीर उघडं करायला सांगितलं होतं, तरी तू लंगोटीची लाज शरीरावर बाळगली होतीस. तीच तुझा घात करणार आहे. जी मांडी आज तू लाजेने झाकलीस त्या झाकलेल्या मांडीवरच अखेर तुझी लाज उघडी पडणार आहे. तुझं मरण मांडीवर आहे रे मुला. “
दुर्योधन आयुष्यात पहिल्यांदाच लाजला, ओशाळला. आपल्या हतभागीपणाची त्यास चीड आली पापाच्या प्राश्र्चित्तासाठी निसर्ग अशीच दुर्बुधी पाप्यासाठी राखून ठेवत असतो. दुर्योधन डोळे असून आंधळा होता. आणि गांधारी डोळे मिटूनही डोळस होती. तिला विवेकाची जोड असती, तर महाभारत निराळं घडलं असतं.