ताप मोठा की तप?

Date: 
Sat, 28 Jul 2012

कोवळ्या किरणांचे आकाशभर पसरलेले पीक फस्त करून पोसलेली तृप्त दुपार सुस्त पडली होती. उतरतीच्या निराश मार्गावर होती.
विश्र्वामित्र औशनस तीर्थावर तपाला बसला होता. हे तीर्थ अनेक पूर्वतपानं पुण्यवान झालेले होते. आणि म्हणूनच विश्र्वामित्रानं आपल्या तपाचा मांड मांडला होता.
निदान विश्र्वामित्राला तरी ती तशी वाटली.
गाधीपुत्र विश्र्वामित्र, एका महान राज्याचा वारस. राजकर्तव्यासाठी महाप्रचंड सैन्य घेऊन विश्र्वामित्र जेव्हा निघाले होते, तेव्हा त्यांच्या सैनिकांनी वशिष्ठाचा आश्रम धोक्यात आणला. तो उपसर्ग पाहून वशिष्ठानं आपल्या तपातून शबर निर्माण केले. आणि त्या महाघोर शबरांनी विश्र्वामित्राच्या सैन्याचा पराभव केला.
चतुर माणसाला पराभवाचा क्षण विद्यासंपन्न करतो. त्याच्या लक्षात आलं की, सैन्याच्या सामर्थ्यापेक्षा शांतीचं सामर्थ्य मोठं आहे. ताप देणाऱ्या आयुधांपेक्षा, तप करणारं अयुध्द अधिक बलवान असतं.
विश्र्वामित्रानं शस्त्र खाली ठेवलं, आणि तपाचं शास्त्र जवळ केलं. औनशस या तीर्थावर म्हणूनच तो बसला होता. पहिली सकाळ ध्यान लागू देईना. दुपार तर अगदीच बैचेन गेली. विश्र्वामित्राला क्षणभर वाटलं सोडावं तप.
असे अनिश्र्चयाचे क्षण प्रगत प्रगतीवरही घाला घालतात. विश्र्वामित्राची तर काय सुरुवातच होती. सुदैव एवढंच, की विश्र्वामित्राचा निश्र्चय हलला, पण डोलला नही. डळमळीत झाला. पण स्थलभ्रष्ट झाला नाही. सैरावैरा धावणारं मन त्यानं आवरलं. बाहेरच्या पोळणारा निसर्ग त्यानं पवित्र मानला.
तो दिवस पार पडला. आणि मग दुसरा दिवसही पार पडला. आणि मग तो पंधरवडा गेला. मास गेला. अंगावरचं मांस झडू लागलं. अंगावरचा मेदही झडू लागला. देहाचं ओझं कमी होत चाललं तसा दिव्यत्वाचं मोठेपण वाढत चाललं. दिव्यत्वाचा अनुभव ही एक अपूर्व शक्ती असते. तिला वजन नसतं, पण वजन असलेल्या कुठल्याही वस्तूपेक्षा ती शक्तीयुक्त असते.
विश्र्वामित्र सरस्वती नदीच्या काठी, त्या तीर्थावर तप करीत राहिले. जलाहार, पर्णाहार आणि वायुभक्षण हे त्याचं पथ्य होतं. स्थंडिलावर शयन असे. देवांनी परीक्षेसाठी आणलेली विघ्नं, आशीर्वादरूप मानत, विश्र्वामित्राचं मन उन्नत होत राहिलं.
तपाच्या तलवारीनं इंद्राचं आसनसुध्द डळमळतं, तर ब्रह्मदेवाच्या आदिशक्तीला करूणा का येणार नाही?
ब्रह्मदेव आले. वर देऊ केला. विश्र्वामित्रानं मागितलेले ब्राह्मण्या ब्रह्मदेवांना द्यावचं लागलं. ते वशिष्ठाच्या सहकार्यानं त्यांना पुढे मिळालं; जेव्हा मत्सराचा उरलेला अंश विश्र्वामित्रानी मनातून काढून टाकला तेव्हा.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView