ते रेशमी स्वप्न

Date: 
Sat, 22 Sep 2012

राम!!
भारताला पडलेले एक रेशमी स्वप्न.
भव्य, दिव्य, अष्टदिशा सुगंधित केलेलं, अमृताची अमरता ल्यालेलं, आल्हादाचा सुगंध श्र्वासलेलं.
दिवस चैत्रातला नवमीचा. नक्षत्र पुनर्वसु. वेळ मध्यदिवसाची.
कौसल्येच्या कुशीत साकार झाला. ओठ लाल चुटुक. बाहू दीर्घ, तेज आदितीच्या उज्ज्वलतेचं, गालावर हसऱ्या खळ्या, चेहरा नीलमान.
राम हा विष्णूचा हा अर्धा अंश होता, तर भरत हासुध्दा विष्णूचा चौथा अंश होता. तीन अष्ठमांश पायस घेऊन विष्णूचा अर्धा अंश साकारला, तर तेवढंच पायस घेऊन भरताकडे विष्णूतेजाचा फक्त चौथा भाग आला. तेजाचं कोडं देहातल्या गणिताने सुटत नाही हेच खरं.

बिचारी कैकेयी. “आपल्या पोटी आलेला सख्खा पुत्र व कौसल्येच्या पोटी आलेला तो सावत्र शत्रू. “असं गणित ती मांडत होती. एकाच विष्णूचे दोन सख्खे भाग ओळखण्याची पात्रता तिच्या स्वार्थी डोळ्यांनी गमावली होती.
रत्नजडित पाळण्यात रत्नेश्र्वर राम हाताच्या कोवळ्या मुठी चोखत पडला होता. कौसल्या वात्सल्यभाराने खाली वाकून म्हणाली, “अयोध्येच्या उद्याच्या राजा, तू जगाचा लाडका हो. माझाच नाही, सगळ्या जगाचा. “
शेजारच्या पाळण्याजवळची कैकयी निखारलेल्या डोळ्यांनी मनात कडाडली, “सखे कौसल्ये, तुझा मुलगा राजा होण्याची वाटच पहात राहा. त्याला सिंहासनाच्या स्वप्नातून मी केव्हाच ढकलून दिलं आहे. माझा भरत राजा या अयोध्येचा राजा होणार अणि माझ्यावर प्रेम करणार. फक्त माझ्यावर, माझ्या एकटीवर. “
पाळण्यातला भरत पिसाळलेल्या किरट्या अदृष्य आवाजात रामाला म्हणाला, “मला वाटलं होतं, ही महामाया आपल्या स्पर्शानं तरी सुधारेल. टाकू का रे हिला मारून रामदादा इथल्या इथे? “
रामानं तोंडातली मूठ बाजूला केली, एक फुरकी मारली आणि भरताला म्हणााला, “रागावू नको रे भरता तिच्यावर. दुष्ट माणूस त्याच्या स्वभावाप्रमाणे वागलं तर त्यावेळी शांत शौर्यानं कसं वागायचं, हेच दाखवायला आपण आलो ना इथं? “
भरत आपल्या दादाच्या कौतुकानं हसला. ते हसणं आपल्या स्तुतीसाठीच आहे असं समजून खाली वाकलेल्या कैकयीच्या, तोंडावर भरताची एक बालबुक्की अजाणातच बसली.
देहात आल्यावर मोठं शहाणपणसुध्दा मधून मधून डुलक्या घेतं हेच खरं. कैकयी तर बिचारी अज्ञानी, स्वार्थी होती. पण तिच्या दुष्टपणाचा उपयोग रामानं जगाच्या कल्याणासाठी केला. कैकयी नसती तर रावणाला त्यानं कुठेतरी मारलं असतं. पण कैकयीच्या निमित्तानं, रामाच्या हातून दिसलेले शांत त्यागाचे धडे, जगाला दिसले नसते. नुसता रावण मारणारा राम फार तर अयोध्येचा राजा झाला असता. कैकयीच्या काळोखात, रामाच्या शुभ्र त्यागाचं तेज स्वप्नातच खरं वाटावं एवढं मोठेपण रेशमी रामकथेनं साकारलं.
सत्य आणि शौर्य साकार झालेला हा विष्णूचा सातवा अवतार.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView