दारू, डायोथेनिस आणि माती
जग जिंकणारा ऍलेक्झॅंडर अर्ध्या आयुष्यात सेनापती होता. आणि उरलेल्या अर्ध्या आयुष्यात तत्वज्ञानाचा उपासक होता. ऍलेक्झॅंडरला सॉक्रेटिस आणि त्याचा शिष्य प्लेटो, यांच्याबद्दल अतिशय आदर होता.
या डायोथेनिसकडे अथेन्सचा एक उमराव गेला. डायोथेनिस त्या दिवसा किंचित मलूल असे. त्याला तरतरीची आवश्यकता आहे. म्हणून या उमरावाने अतिशय उंची दारू डायोथेनिससाठी आणली.
डायोथेनिस त्या अर्थान धर्मभोळा नव्हता. पण धर्माची सगळी व्यवच्छेदक लक्षणे त्याच्यात होती. तृप्ती, आत्मसंतुष्टता, निरिच्छता.
उमराव नम्रपणे आले. उंची दारूचा बुदला त्यांनी डायोथेनिसपुढे ठेवला. आणि थोडेसे लवून ते डायोथेनिसला म्हणाले, “महाराज, आपल्यासाठी हे आणले आहे. “
डायोथेनिसने त्या उंची बुदल्याकडे पाहिले. त्याचे पाहणे ना कौतुकाचे ना तिरस्काराचे. तो बोलला तर काहीच नाही. त्याच्या भुवया तेवढ्या उंचावल्यासारख्या झाल्या. उमराव खुलाशासाठी म्हणाले, “अतिशय उंची शराब आहे. हजारो मोहरा देऊनही मिळणार नाही. आपल्याच मालकीची ती आता झाली. “
डायोथेनिसने बाटली हातात घेतली. सुबक, सुंदर, चकचकीत वस्तू होती ती. आत किरमिजी रंगाचा द्रव दिसत होता.
“खरंच तुमच्या मालकीची झाली आता. “उमरावाने पुन्हा आश्र्वासन दिले. डायोथेनिसला खूष करता आले असते, तर ऍलेक्झॅंडरला खूष करता आले असते. म्हणूच उमरावाचा तो आटापीटा चालला होता.
डायोथेनिसने आपल्या मालकीची ती वस्तू हातात घेतली, तिचे बूच उघडले आणि बाजूच्या मातीच्या ढिगाऱ्यावर ती ओतून टाकली. बिचाऱ्या उमरावाला आश्र्चर्याचा उद्गार काढायला वेळ मिळाला नाही, तर अडवायला कोठून मिळणार?
थोड्या वेळाने उमरावाच्या तोंडून शब्द फुटले, “काय केलंत हे! हजारो मोहरांची दारू तुम्ही मातीत मिसळीत. “
डायोथेनिस तुच्छतेने हसला आणि उमरावाला म्हणाला, “मी ती पोटात घातली असती तर मीच मातीत लोळलो असतो. त्यापेक्षा तू दिलेली दारू मातीत मिळून गेली तेच बरोबर झाले. “
बिचारा उमराव! डायोथेनिसला दिलेली दारू आणि उमराव साहेबांची आशा, दोन्ही धुळीला मिळाली होती. डायोथेनिसने आपल्या नि:स्पृहतेचा धर्म तेवढा टिकविला होता.