दुर्योधन आणि वसंता

Date: 
Sat, 7 Jul 2012

वसंत मामाना म्हणाला, “माामा दुर्योधनाचं काय वाईट झालंं? त्यानं जन्मभर राज्य केलं, आणि शेवटी मांडी फुटून चांगला लढताना मेला. उलट तुमचा तो अर्जुन. “
“माझा तो म्हणजे...? “मामानी मध्येच अर्धवट पुटपुटत अर्धवट मोठ्याने वसंताला प्रश्र्न विचारण्याचा धीर केला. अर्जुनाची मालकी वसंताने आपल्याकडे सोपविलेली पाहूनसुध्दा त्यांना फारसा आनंद झालेला दिसला नाही. पण वसंताला मामांच्या आनंद, दु:खाचं काही एक देणं-घेणं नव्हतं. त्यानं अर्जुनाला पुन्हा एकदा मामाच्या डोक्यावर लादलाच. डाव्या तळहातावर मूठ आपटीत वसंता ओरडला, “तुमचा तो अर्जुन पाहा. शेवटी त्याला कृष्णाचा स्त्रीवंहशी राखता आला नाही. साध्या चोरानं त्या अर्जुनाला पळवून लावलं, असं महाभारत सांगतं. त्यापेक्षा दुर्योधनाचं मरण पाहा - “
“तुझ्या दुर्योधनाचं.” मामा ‘तुझ्या’ या शब्दावर जोर देत, पण निर्विकार होऊन म्हणाले.
वसंता ठसकून म्हणाला, “होय होय माझा दुर्योधन. तो बिचारा सरळ होता. त्याचे राग, लोभ, प्रेम सर्वच तीव्र होते. तो मित्रांचा मित्र होता, आणि शत्रूंचा शत्रू होता. मरताना तो काय म्हणाला माहीत आहे? “
आता दुर्योधन मेला तेव्हा मामा कशाला तिथे मरायला गेले होते? आणि महाभारतातलं दुर्योधनाचं भाषण पाठ करून ठेवायला मामा काय ‘दुर्योधन गीते’चे अभिमानी होते काय? पण पेटलेल्या वसंताला सांगणार कोण? तेव्हा मामांचं ते अज्ञान दूर करण्याच्या आवेशाने तोच पुढे म्हणाला, “दुर्योधनाचे अखेरचे उद्‌गार आहेत की, मी मांड्या मोडून पडलो आहे खरा; पण माझं वाकडं काय झालं? मी यजनच केलं. आश्रितांचं रक्षण केलं. समुद्रवलयांकित पृथ्वीचं पालन के लं. जेवढा जमला तेवढा दानधर्म केला, मित्रांचं मित्रपण केल, शत्रूंना शरावर नाचवलं. बंधुजनांचा मान राखला, मोठ्यामोठ्या राजांना आज्ञा केल्या, आणि दुर्लभ मान मिळविला. जातीवंत अश्र्वाच्या वाहनातनं फिरलो, परराष्ट्र जिंकली. निरोगी आयुष्य काढलं. माझं काय वाईट झालं?”

मामा शांतपणाने म्हणाले, “एवढंच नाही, वसंता. अशा पध्दतीनं दुर्योधन युध्दात मेल्यामुळे, त्याला स्वर्गावर हक्क प्राप्त झाला. “
वसंताने डावा हात झिडकारून टाकला, आणि म्हणाला, “ते स्वर्गाचं, नरकाचं तुम्ही पाहा. पण हा एक मुद्दा चांगला संागितलात तुम्ही. तेव्हा आता तुम्हीच सांगा, दुर्योधनाचं वाईट काय झालं?
सगळे कौरव, अगदी तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वर्गात गेले असणार. कारण सगळेच युध्दात मेले. तेव्हा दुर्योधनाचं अन् कौरवांचं वाकडं काय झालं?”
मामा डोळे मिचकावत म्हणाले, “दुर्योधनाला तो स्वर्गसुध्दा नरकासारखा वाटला असेल. कारण तिथे पांडवांचं काय, पण कुणाच्याही कुरापती काढण्याचं सुख उरलेलं नव्हतं. नुसती वैभव आणि मित्रसंगती पुरे असती तर, ती हस्तिनापुरात होतीच. ही मंडळी स्वर्गात कशाला गेली मरायला? “
वसंता क्षणभर आवाक् होऊन पाहात राहिला. मग तो घाईघाईनं उठत म्हणाला, “अरे! साहेबानं महत्त्वाचं काम सांगितलं ते विसरलोच मामा, आहे माझ्याजवळ उत्तर, देईन कधीतरी. “ आणि मग वसंता अर्जुनानं सोडलेल्या तीरासारखा दाराबाहेर पडला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView