दोन पुतळ्यांची गोष्ट

Date: 
Sun, 11 Sep 2011

”योगवासिष्ठ्य” मध्ये निर्वाण प्रकरण उत्तरार्ध, अध्याय एकशेतीनमध्ये व्यासपुत्र शुकाची गोष्ट दिलेली आहे.
स्वत: व्यास म्हणजे विद्वत्तेचे जगद्‌वंद्य, स्तोत. अठरा पुराणांचा कर्ता. महाभारताचा रचयिता. ऋषींना, राजकारणी श्रेष्ठांना, आणि ब्रह्मवृंदांना वंदनीय विभूती. शुक हा त्याचा अगदी निस्पृह, अलिप्त विरागी मुलगा. विद्वतेच्या पोटी जसे काही वैराग्य जन्माला आले.
अधिक सूक्ष्म अभ्यासासाठी व्यासमुनींनी शुकाला जनकाकडे पाठवले. पण शुक हा उपदेशाला पात्र आहे वा नाही, हे जनकाला ठरवायचे होते. शुक आल्याची बातमी जनकापर्यंत द्वारपालांनी पोहचवली आणि द्वारपाल शुकापर्यंत परतले. ते म्हणाले, ”महाराजांपर्यंत तुम्ही आल्याची बातमी सांगितली. आणि ते ‘बरे आहे‘ एवढेच म्हणून कामाला लागले. ”
‘बरे आहे‘ असे औपचारिक उद्‌गारसुध्दा न काढता, शुक महाद्वाराबाहेरच स्वस्थ राहिला. सात दिवस गेले. द्वारपालांनी शुकाला आत बोलावले, पण राजवाड्यात घेतले नाही. बाहेरच्या चौकात थांबवले, शुकाच्या हृदयाचा ठोका वाढला नाही, की पापण्यांची झपझप झाली नाही. पुढले आठ दिवस तो शांतीने मोकळ्या चौकात राहिला.
आणि मग द्वारपालाने पुढल्या सात दिवसांसाठी शुकदेवांना आणून बसवले ते थेट अंत:पुरात. भोवताली रंजन करू इच्छिणाऱ्या अनेक युवती. उत्तम खाद्यपेये, शृंगारलेली शय्या यांच्या गराड्यात शुक कोरडाच राहिला. शांत, थंड, स्पंदनरहित.
ज्ञानाची, उपदाणरची, सूक्ष्म आविष्काराची याला ओढ होती. पण त्यातही उसळी नव्हती.
आणि मग खुद्द जनकराजाने शुकराजाला समोर बोलावले व विचारले, ”तू कोण आहेस? कोठून आलास? कोठे आलास? ”
शुकाच्या बिनघोर शब्दांनी उत्तर दिले, ”साखरेचा पुतळा, साखरेच्या रस्त्यावरून चालत आला. साखरेची झाडे भोवती होती. साखरेच्या वाड्यात दुसरा साखरेचा पुतळा आहे. ”
गुरू, शिष्याची परीक्षा घेतो, तशीच शिष्यही गुरूची परीक्षा घेत असतो. शिष्याची चांगली उत्तरे पटणे, ही गुरूची परीक्षाच असते.
जनक तृप्त झाला. असल्या पोचलेल्या पुरुषाला जनक अधिक ते काय सांगणार? जनक म्हणाला, ”स्वसंकल्पवशाब्दाध्दो नि:संकल्पश्र्च मुच्यते” स्वत:च्या संकल्पामुळे माणसांवर बंधने येतात. हे संकल्प सोडले म्हणजे माणूस मुक्त होतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView