दोन ‘उभ्या‘ समाध्या

Date: 
Sun, 29 Jul 2012

एक लाख विरुध्द चाळीस.
शिखांच्या बहादुरीचा दहावा चमत्कार घेरला गेला. चहुबाजूने घेरला गेला. आनंदपूरच्या ह्या वेढ्यात आलीखान, दिलावरखान, मागे हटले. पण रजपूत आणि मोगल मिळून लाख तलवारी समोर असताना, गुरू गोविंद-सिंग आनंदपूर किती लढवणार? तेव्हा रात्रीच्या बोगद्यातून त्याने शत्रूला चकवले, आपली माता, पत्नी आणि दोन मुले, जोरावरसिंग-फत्तेसिंग यांना गंगाराम या सेवकाबरोबर दूर धाडून दिले. मग तो स्वत: चमकौरच्या किल्ल्यात अजितसिंग आणि झुंजारसिंग या दोन उरलेल्या वंशाधारांना घेऊन, संकटाच्या सागरात एकटा खडा राहिला. आणि तिथेत तो विषम सामना सुरू झाला. एक लाख विरुध्द चाळीस.
अजितसिंग आणि झुंजारसिंग, त्वेषाचे हत्तीबळ घेऊन पुढे घुसले. अभिमन्यूचे ते वारस, वीरत्वाची पराकाष्ठा करीत, मोगलांशी मातब्बर झुंज करते झाले.
तलवारीच्या विजा झाल्या. शूरत्वाने संख्या खाऊन टाकली. वीरत्वाचा तो अंगारवट एवढा भव्य होता की त्याच्या आडोशाने, गुरू गोविंदसिंग शत्रूचा डोळा चुकवून, किल्ल्याबाहेर केव्हा पडले ते कळलेच नाही.
शिखांच्या या शेवटच्या गुरूवरचे संकट चौफेर धावून येत होते. ज्या काकाडे - गंगारामकडे आपले कुटुंब आणि दोन मुलगे गुरू गोविंदसिंगांनी सोपवले होते, त्यानेच विश्र्वासघात केला. सरहिंदचा सुभेदार वझीरखान याला कळवले, की गुरू गोविंदसिंगांची ही वंशशाखा त्याने ताब्यात घ्यावी. ती वंशशाखा म्हणजे मेंढरे नव्हती. ते मरुताचे वारस होते. पराक्रमाचे पुत्र होते. पंचनद्यांचे पाणी प्यालेले शौर्यशिष्य होते.
वझीरखानने गळ्याजवळ तलवारीचे पाते टेकवून हुकूम सोडला, “धर्म बदला, तर तलवार मागे घेतो. “
एक काळी कभिन्न भिंत मागे उभी होती. तिच्यामध्ये कोरलेले दोन कोनाडे, दोन पुत्रांच्या पडछाया झेलीत उभे होते. पाहाणाऱ्या आया व्याकुळल्या होत्या. शत्रू शेफारले होते. आणि मित्र उरलेच नव्हते.
वाघाच्या दोन बच्च्यांनी क्षणमात्र एकमेकांकडे पाहिले. उत्तर काय द्यावे याबद्दल दोघांच्याही मनता संशय नव्हता. बेमुर्वत उत्तर देण्याचा हक्क दोघांनाही हवा होता. पण उत्तर एकच होते, “आम्ही गुरू गोविंदसिंगाचे बच्चे आहोत. मरण क्षुद्र आहे. आमच्या रक्ताच्या थेंबागणिक सूडाची फुलं, मानवी देह धारण करतील. आणि तुम्हा मारणाऱ्यांना मारतील. “
वझीरखान या उत्तराने चेवून गेला. मुंडके एका झटक्यात उडवून या कार्ट्यांना नाहीसे करावे, असे क्षणभर त्याला वाटले. पण त्याने तलवार मागे घेतली. मागे उभे असलेल्या कभिन्न सहकाऱ्यांना त्याने हुकूम दिला, “त्यांना मागल्या कोनाड्यात चेचा. कोनाडे लिंपून टाका. याना कणाकणाने मरू दे. उध्दटपणा असाच उखडला गेला पाहिजे. “
दोन शेर आत लोटले गेले. पायापासून कणाकणाने लिंपले गेले. बेंबीच्या देठापासून धर्मघोष उच्चारला जात होता. बेंबी दबली. छाती दबली. फुफ्फुसे दबली. गळा चुनखडीने चेपला. तोंडात माती पडली. डोळ्यावर ओल्या वाळूचे शिपकारे आले. प्राणवायू नेणारे नाकाचे नळ बंद झाले. आणि अखेर डोळेही बंद झाले.
असले वीरमरण, नव्या न्यायाची फुंकर जन्माला घालते. प्रत्येक क्रूर अन्याय, आपला भावी शत्रू निर्माण करतो. वझीरखानाने गुरू गोविंदपुत्र नाहीसे केले नाहीत, तर त्यानं स्वत:चा छेद घेणारा भावी बंदा वैरागी जन्माला घातला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView