धोंडा आणि आरसा

Date: 
Sat, 14 Jan 2012

कुलटा ठरलेल्या बाईला हमरस्त्यावर ठोकून काढण्याचे काम सुरू होणार होते.
एक पतित, अभागी अबला दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेली. अपराध सिध्द झालेली. बाजूला फेर धरणाऱ्या शेकडो माणसांचे केवढे शौर्य की ते एका दुबळ्या पापाचा नाश करायला निघाले होते. कुणाला ठाऊक? बिचाऱ्या त्या बाईला बिघडवणारा, त्या जमावातच आगेमागे दगड घेऊन मारायला खडा होता की नाही ते!
ती स्त्री मान वर करण्याच्याही परिस्थितीत नव्हती. स्वत:च्याच चुकीत चूर होऊन गेली होती. स्वत:च्या दोषांचा अभिमान बाळगण्याइतकी आधुनिकता, तिच्यात भरली नव्हती. डोक्याच्या भरल्या केशसंभारावर, दोन्ही हाताची घडी तिने आवळून धरली होती. कोणत्याही क्षणी अणकुचीदार दगड हात फोडतील, ते तिला माहीत होतं. हाताचा बळी देऊन, डोक्यांचे काही वेळ तरी रक्षण करण्याचा, तिचा दुबळा प्रयत्न होता.
“हडळी, सुख भोगताना बरं वाटलं नाही? कर बाजूला हात. नाहीतर त्यांनाचा तोडातो. “ खवळलेल्या त्या पुण्यरक्षकाच्या डाव्या हातात कुऱ्हाड व उजव्या हातात भला मोठा धोंडा होता. तो त्याने वर उचलला, आणि त्याचवेळी त्याचे लक्ष डाव्या बाजूस विरळ होत गेलेल्या गर्दीकडे गेले. कुणाला तरी वाट दिली जात होती. आणि ज्याला वाट दिली होती, त्याचे पाऊल हळूहळू पुढे पोहचत होते.
कुऱ्हाडवाल्याने दचकून पाहिल, आणि त्याच्या कानावर एक स्पष्ट उद्‌गार आला, “शाब्बास मित्रा! दुसऱ्यानं पाप करू नये म्हणून तुझी केवढी धडपड! पण तू कधीच पाप केलं नाहीस ना? तुझ्या बायकोची तुझ्याविरुध्द काही तक्रार नाही ना? “
कुऱ्हाडीचा मालक ओशाळला, समोर पुण्यराज ख्रिस्त उभे होते. सडपातळ, ताठ, करुणाकर, डोळ्यात शांती ओथंबलेले.
कुऱ्हाडीच्या मालकाला मागे ख्रिस्तानेच वाचवले होते. त्याचा उजवा हात खाली आला. अन्याय निवारण्याचा आवेशही खाली आला.
परम दयाघन जीझस, हातात धोंडे असलेल्या जमावाकडे वळून म्हणाले, “ही बाई घोर पापी आहे आणि तिला शासन झालेच पाहिजे. ज्याने आयुष्यात कधीच पाप केले नाही, आई वडिलांना, बायकोला, मित्रांना, मुलांना फसवले नाही, अशाला आपण पहिला धोंडा मारण्याचा मान देऊ या. प्रत्येकाने हातात्या धोंड्याला आरसा समजून, आपले चारित्र्य त्यात पहावे. “
असा कोणी दगडोपंत जगातच जन्मलेला नव्हता. तर जेरूसेलममध्ये कोठून जन्माला येईल? ज्याच्या त्याच्या हातातले धोंडे गळून पडले. आणि त्यांच्या पायांना वेग आला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView