निश्र्चयाची चोरी नको

Date: 
Sun, 10 Mar 2013

तामिळातल्या राजाने ‘चौर्य कर्म’ निष्ठेची ती कथा ऐकली, आणि तो थक्क होऊन गेला. प्रधानानं तामिळनाडूतल्या त्या आपल्या राजाला सांगितलं, की चोर स्वत:ला स्कंदचे पुत्र म्हणवून घेतात. स्कंद किंवा कार्तिकेय, हा शिवाचा पुत्र, सगळे चोर जर स्कंदपुत्र म्हणवून घेतात, तर ते शिवाचे नातू झाले.
ही सगळी कथा ऐकल्यावर राजा प्रधानाला म्हणाला, “मला चोरी करायला शिकायचं आहे. “
आता थक्क होण्याची पाळी प्रधनाची होती. पण राजहट्टच तो! करणार तरी काय? प्रधानानं एका अट्टल चोराला राजापुढे उभं केलं. राजाला चोरी शिकण्याची इच्छा झाली आहे, यावर तो चोर विश्र्वास कसा ठेवणार? त्यानं साफ संागून टाकलं, की, “मीच कधी चोरी केली नाही, तुम्हाला कसं शिकवणार? “
राजाला काही बोलता येईना. पण तो चोर मागे फिरल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याची हिऱ्याची अंगठी चोरीला गेलेली आहे. चोर राजाला एकांतात भेटला होता. साहजिक आळ चोरावर आला. आणि तिथल्या कायद्याप्रमाणे न्यायधीशानं चोराला फाशीची शिक्षा दिली.

फाशीच्या दिवशी राजा चोराचं वर्तन पहात होता. फाशीच्या तक्तावर चढण्यापूर्वी चोरानं अखेरची प्रार्थना केली, “हे स्कंददेवा, मी निरपराध आहे. पण ज्यानं चोरी केली, त्याला मात्र तू शिक्षा केल्यावाचून राहू नकोस. “

राजा मनात चरकला. त्या चोराला चोरी केली, हे केवळ अनुमान होते. राजाने त्याला प्रत्यक्ष तसं पाहिलं नव्हतं. कदाचित् अंगठी इकडेतिकडे कुठेतरी पडली असेल. ती उद्या सापडली, तर आपणच अपराधी ठरणार किंवा दुसऱ्या कोणी चोरली असेल, तर चुकीच्या फाशीबद्दल आपणही गुन्हेगार ठरणारच.
राजा भांबावला. फाशीची स्थगिती, हा पुरातन गोंधळ आहे. त्याने चोराला सोडून द्यायचा हुकूम दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाड्यात राजा बसला होता. तेव्हा चोरानं त्याची भेट घेतली. अंगठी राजापुढे ठेवून त्यानं म्हटलं, “महाराज, ही आपली अंगठी घ्या. “
राजा दुसऱ्यांदा थक्क झाला होता. त्यानं चोराला विचारलं, “फाशीच्या छायेतसुध्दा तू चोरी कबूल का केली नाहीस? “

चोरानं उत्तर दिलं, “चोरी करणं ही चूक नाही. अशीच माझी निष्ठा आहे. ती कबूल करणं, म्हणजे चूक करणं, प्राण गेला तरी ती ‘चूक’ म्हणून कबूल करायची नाही हा निश्र्चय. आपण मला भर दरबारात सोडून दिलं आहे. तो हिशोब संपला. अंगठी आपली आहे. “

राजा तिसऱ्यांदा चकित् झाला. त्याला त्या तत्वज्ञाचा मोह पडला नाही, पण निश्र्चयाचा पडल. दुर्दैव एवढंच असतं की, दुर्जनांच्या टोळ्या असतात. त्यांच्यात पक्के निश्र्चय झालेले असतात. सज्जनांचे संघ उभे रहात नाहीत. त्यांचात एकी झालेली नसते. सज्जन म्हणवणाऱ्यांच्या निश्र्चयाची चोरी झालेली असते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView