नीती इंद्राला का हसली?

Date: 
Sat, 5 May 2012

भीतीची जादू इंद्रालाही उंदराएवढा लाचार करून टाकते. तसा इंद्र लाचार झाला होता. दरिद्री ब्राह्मणाचा वेष त्याने धारण केला होता. त्याला प्रल्हादाला फसवायचे होते.
प्रल्हाद हा अत्यंत नीतिमान राजा विलक्षण परोपकारी. एवढा शीलवान की त्याच्या परोपकारी तपाने इंद्राचे इंद्रपदही धोक्यात येत होते. सत्तेला सत्याचे आव्हान पचत नाही. इंद्राची धावपळ झाली. सत्ता जायची पाळी आली तेव्हा तो स्वत:च्या गुरूकडे म्हणजे बृहस्पतीकडे गेलाच, पण अखेर असुरांच्या गुरूकडे, म्हणजे शुक्राकडेही गेला. कारण प्रल्हाद असूर घराण्यातला.
शुक्राचार्याने इंद्राला सल्ला दिला की तू खुद्द प्रल्हादाकडेच जा. तो एवढा शीलवान आहे की त्याच्या दातृत्वानेच तुझे इंद्रपद टिकेल.
प्रल्हादाचे शील मागण्यासाठी इंद्राने ब्राह्मणाचा वेष घेतला. म्हणजे त्या काळी तरी ब्राह्मण कमी बिघडले होते असे दिसते. त्याच्या वेषाखाली आपण लोकांना फसवू शकू असे वाटणे, ही एक ब्राह्मणाची त्या वेळची तरी शिफारस होती. ब्राह्मण विद्वान असत आणि विद्वान असण्याच्या भरात धनवान होण्याचे राहून जात असे.
नेमक्या त्याच गोष्टीबद्दल तेव्हाच्या पुष्कळा ब्राह्मणांबद्दल इतरांना आदर असे आणि तो आदर बाळगून प्रल्हादाच्या दरबारात ब्राह्मणरूपी इंद्राचे स्वागत झाले. इंद्राची विद्वत्ता ब्राह्मणरूपात लपलेली होतीच. तिच्यावर संतुष्ट झालेल्या प्रल्हादाने विचारले “तुला काय हवे ते माग. “
“मला तुझे शील हवे आहे. “गळाला लागलेल्या त्या माशापुढे, हावऱ्या इंद्राने, हवा असलेला वर मागितला.
प्रल्हाद दचकला. दिलेले वचन मोडणे पाप होते. तर नीती किंवा शील सोडणे, त्याहूनही मोठे संकट होते. लहानपणी उकळत्या कढईत यातना सोसलेल्या आणि डोंगरावरून कडेलोट भोगलेल्या प्रल्हादाने, दु:सहतेचा हा डोंगरही पेलला.
त्याच्या शरीरातून शील गेले. एक तेज लवलवत प्रल्हादाच्या शरीरातून निघाले आणि इंद्राच्या शरीरात जाऊन लपले.
पण तेवढेच नाही. दुसराही एक तेजोनिधी प्रल्हादाच्या शरीरातून इंद्राच्या शरीरात झेपावला. “तू कोण? “अगतिक प्रल्हादाने विचारले.
“धर्म आहे मी, महाराज. जिथ शील तिथे धर्म.”
त्या धक्क्यातून प्रल्हादाला सावरता आले नाही. कारण मागोमाग तिसरा धक्का तयार होता. सत्याचे तेज प्रल्हादाला सोडून चालले होते.
चौथी गेली ती शक्ती आणि पाचवी गेली ती लक्ष्मी.
हतबुध्द झालेल्या प्रल्हादाकडे, तोऱ्याचा तुरा लावेलेला इंद्र, पाठ फिरवून तरातरा चालू लागला. त्याचे तात्पुरते ब्रह्मसौजन्य गळून पडले होते. इंद्रपदाच्या महासिंहासनावर त्याला आणखी एक मुदतवाढ मिळत होती.
आत बसलेली बुध्दी इंद्राच्या अंतरात्म्याला हसत होती आणि म्हणत होती, “अरे मूर्खा, असे मागितलेले शील कधी पुरत नाही आणि ज्या शीलाने परोपकार हे पुण्य मानले, त्याची नीती वाढल्यावाचून रहात नाही. “
इंद्राला त्या वेळी ते हसणे ऐकू गेले नाही. सत्ता बहिरी असते. सत्ता आंधळी असते. इं्रद्राच्या भोगसिंहासनापेक्षासुध्दा प्रल्हादाची त्यागभोग मूर्ती अधिक मोठी होती.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView