बायकांची बलपूजा - गौरीपूजा

Date: 
Wed, 24 Apr 2013

“याचं तुम्ही मुळीच ऐकू नका. “कालीचा क्रोधावतार कडाडला. आणि ते पाहून न्यायासनावर बसलेले ब्रह्मा, विष्णु, महेशही चक्रावले.
बायकांचं शिष्टमंडळ आलं होतं, ते कोलासुराविरुध्द. तो कोलासूर बायकांना छळत होता. धिंडवडे काढत होता. कुचेष्टा करत होता. त्याच्या त्रासातून सोडविण्याची विनंती करण्यासाठी हे स्त्रियांचं शिष्टमंडळ आलं होतं. आता यात वावगं काय होतं? पण त्या शिष्टमंडळाची विनंती ऐकल्याबरोबर कालीनं क्रोधावतार, म्हणजे साक्षात् पती रुद्र शंकराचा अवतार धारण केला. आणि बिचारा न्यायासनावर बसलेला रुद्ररूप शंकर हा तिचा पती, आपलं रुद्ररूप मनातल्या आश्र्चर्याच्या स्वाधीन करून मुकाट बसला. उमेपासून कालीपर्यंत पार्वतीची अनंत रूपं, प्रसंगाला साजेल अशी तिची मानसमूर्ती. कधी हेलावून जाणारी हेमावती, तर कधी अजिंक्य दुर्गानाही हलवून टाकणारी दुर्गा. यावेळी तिचं रूप कराला कालीचं होतं. विजेच्या शब्दांनी लखलखत बायकांच्या शिष्टमंडळाला ती म्हणाली, “तुम्ही बायका ह्यांच्याकडे मदतीसाठी आलात? तुमचे शूर पती, तेजस्वी पुत्र कुठे गेले? बहिणीच्या अब्रूसाठी सर्वस्वाची राख करणारे, आणि बांधलेल्या राखीला स्वाभिमानाने जागणारे तुमचे भाऊ कुठे गेले? “

कोलासुराच्या आगीतून येऊन, येथे कुठे येऊन फुफाट्यात पडलो? असं अनेक स्त्रियांना झालं. तोंडं सुकली. जिभांना कोरड पडली. माना खाली गेल्या. कालीचा धबधबा पुन्हा कोसळलाच. “तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, सारखं भीत राहायला. चहुबाजूंनी जन्मभर असं मरत राहण्यापेक्षा, एकदाच रणांगणात मरून जाऊया. चला, माझ्या मागे.”
काली एका झेपेत बाहेर निघाली. तिच्या मागोमाग त्या ललनांचा समूह. नव्या चेतनेनं फुंकर घातलेला.

कोलासूर आपल्या गुर्मीत पडला होता. पोसलेललं शरीर. भव्य देह. कमावलेली रग आणि जातीवंत सर्वदुष्टता त्याच्या रूपानं साकार झाली होती. तिते पोहचेपर्यंत कालीचं रूप गौरवर्ण झालं होतं. दोन काळ्या विवरातून ज्वालामुखी दिसावेत, तसे दिसणारे तिचे डोळे, गौरीच्या रूपात बदलले. जणु सोन्याच्या मखमली पेटिकेत ठेवलेले दोन हिरवे हिरे! रागावायचं असतं ते सहसा आपल्या माणसांवर. शत्रूशी लढताना स्थिरचित्तच असायला हवं. कालीचं गौर रूप झालेल्या त्या महालक्ष्मीनं, हातातला शूळ कोलासुराच्या पोटावर टेकवला, आणि म्हणाली, “ऊठ, हिम्मत असेल, तर लढ.”

एक बाई आपल्याला आव्हान देते? तारवटलेल्या डोळ्यांनी गौरीच्या त्या आत्मविश्र्वास फुललेल्या चेहऱ्याकडे कोलासूर पाहात राहिला. लोकांच्या भयावर जगणारी माणसं नेहमी आतून भित्रीच असतात. त्यंाना आव्हान द्यायची सवय असते. घ्यायची नव्हे. गौरीचं हे पुण्यशुभ आव्हान पुढे आल्याबरोबर कोलासूर गरगरला. आणि व्हायचं तेच झालं. काही क्षणात तो कोसळला मागोमाग त्याचे अनुचर, चवताळलेल्या बायकांच्या लोंढ्याकडे पाठ फिरवून पळत सुटले.
श्रीगणेशाच्या मातेचं हे गौरवशाली, गोरं असं महालक्ष्मीचं रूप, गणेशस्मरण दिवसातच पूजतात. गौरीचं पूजन या वीरशाली आठवणीनं व्हावं आणि तिच्या स्मरणमृत्तिकेचं विसर्जन केलं तरी तिच्या सामर्थ्यस्फूर्तीचं केव्हाही विस्मरण होऊ देऊ नये.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView