बिनरक्ताचा विजय

Date: 
Sun, 4 Dec 2011

हत्तीच्या प्रचंडतेपुढे एक उभी पातळता साकारली होती. रुद्र क्रृध्द ऐरावताचा तो अवतार. श क्तीने उन्मत्त आणि रागाने बेभान झाला होता. त्याला डिवचले होते कोणी तिसऱ्यानेच. आणि त्याचा राग, समोर सापडलेल्या जिवावर काढला जाणार होता. एखाद्या सश्यशाम पर्वताएवढ्या हत्तीच्या समोर उभी राहिलेली पीतगौरव काया, बलसंभाराता हत्तीच्या पासंगालाही पुरली नसती. समोरच्या त्या कायेची सोंडेइतपत सगळ्या शरीराच्या रुंदी. हस्तीदंताएवढे दंड. हत्तीच्या अर्ध्या सोंडेएवढे, फार तर वजन.
ही सगळी बळाची बाह्यता झाली.
कोण होता हत्तीसमोर?
महावीर! तपानं तृप्त झालेला. मानवतेचा तेजस्वी तारक. किती तरी दिवसांचा तो मूर्तीमंत उपवास. सिध्दार्थाचा तो पुत्र. त्रिशलीचा पुत्र. इंद्रानं पाहिल्याबरोबर सहज स्फूर्तीनं ‘वीर’म्हटलं तो हा वर्धमानाचा पुढे महावीर झालेला महापुत्र. ‘वैशालीचा राजा’म्हणून घेण्याचं पत्करलं असतं, तर तो फक्त वैशालीचाच राजा झाला असता. वैशालीचं राज्यं त्यांन नाकारलं. तो लोकांचा राजा झाला. संगमदेवानं परीक्षा घेतली तेव्हा वर्धमान वडाच्या झाडावर होता. संगमदेव सापाच्या अवतारात होता. वडाच्या पारंब्या खुजा ठराव्यात एवढं एकेक वेटोळं वडाच्या झाडाभोवती त्यानं घातलं.
वर्धमानाच्या डोळ्यात रागह नव्हता, भय नव्हतं. होती ती शांती. संगमदेव या शांती सागरातच विरघळला. आणि कीर्तीचे ते शांतीशिखर, तेव्हापासून ‘महावीर’ या नावानं जगानं गौरवलं.
पण मत्सराच्या गोमेला शंभर पाय असतात. नियतीच्या परीक्षा-सूत्राचीही अनेक सूत्रे असतात. त्यातलंच एक सूत्र, या विशालस्थंडिल हत्तीच्या रुपानं महावीराच्या अंगावर चालून येत होतं.
एका उग्रभैरव, चिडलेल्या आकांतासमोर उभं होतं, एक शांतीचं कमलपुष्प.
महावीराला पाहिल्यावर हत्तीनं आपला वेग कमी केला खरा, पण थांबवला नाही. वळवळत्या उभ्या नागासारखी ती सोंड.
हत्ती, शक्तीच्या उन्मनतेनं एकेक पाऊल पुढे टाकीत होता.
मागले बघे श्र्वास रोखून होते. काही उत्सुक, आनंदाच्या शिगेनं आणि काही, व्याकुळ करूणेच्या ओलाव्यान.
छातीवर हात बांधून महावीर समोरचा जांभळा क्रोध न्याहाळत होते. क्रोधाची बुब्बुळे निर्वेराच्या नेत्रस्थानाशी भिडली.
आश्र्चर्य घडलं. सोंड खाली आली. हत्तीनं पुढले दोन्ही पाय दुमडले. त्याच्या नजरेतला क्रोध, समोरच्या शांतीनं शोषून घेतला होता. पराभवाच्या, नव्हे, पण एका अननुभूत आनंदाच्या तृप्तीनं गहिवरलेल्या गजराजानं, अलौकिक महावीराला मुजरा केला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView