बुध्दाचा अवतार उमलला

Date: 
Sat, 6 Oct 2012

आषाढाचा महिना उल्हास ओलांडून चालला होता. उत्सव उताला येत होता. कपिलवस्तु उत्सवात बुडून गेलं होतं. राजा शुध्दोदन आणि राणी महामाया उत्सवाच्या रम्यतेत रंगले होते. उत्सवाच्या सातव्या दिवशी गर्भ संभव जन्माला आला. महामायेला स्वप्नात दिसलं की चार दिक्‌पालांनी आपल्याला झोपेतच मंचकासह उचललं आहे. एका विशाल शाल वृक्षाखाली त्यांनी आपल्याला मंचकासह नेऊन ठेवलं आहे.
समोत तिनं पाहिलं. तिला पहावंच लागलं. एक अत्यंत आकर्षक, सौम्य, शंात, तेज देह धारण करून तिच्यापुढे उभं होतं.
“कोण तू? “
“सुमेध, माझं नाव. अनेक जन्माच्या फेऱ्यातून आता या सुमेधरूपात मी आहे. मला आता शेवटचा जन्म घ्यावयाचा आहे. माता म्हणून तू माझा स्वीकार करशील का? “

महामाया काही बोलेना. तिचा गळा दाटून आला होता. पण उत्तर द्यायला विलंब केला तर विपरित घडेल असं समजून ती घाईघाईनं म्हणाली, “हे माझं भाग्य आहे, की तू मला माता म्हणून निवडलंस. “
बस्स. स्वप्न संपले. ते खरं होण्यासाठी दहा महिने झाल्यावर महामाया आपल्या माहेरी जायला निघाली. लुंबिनी वनातून पालखी जात होती. ते वन स्वर्गीय अशा चित्रलतावनाप्रमाणे भासत होतं. वृक्षांच्या चवऱ्या ढाळल्या जात होत्या, आणि खालून गर्भरेशमी पालखी पुढे जात होती. झाडे, फळा-फुलांनी डवरलेली होती. विविध रंगांची पाखरं डौलदार पंख पसरून वातारवण जिवंत करीत होती.
महामायेला तिथं उतरावंसं वाटलं. शालवृक्षांच्या बुंध्याशी ती चालत गेली. झुळुकीनं वर-खाली हेलावत असलेल्या एका फांदीला तिनं हातात धरलं. वाऱ्याच्या झटक्यानं ती फांदी उचलली गेली आणि तिला हातात पकडलेली महामायाही वर उचलली गेली. एवढ्या हालचालीनं महामायेच्या प्रसूतीवेदनेला वेग आला.
दिवस होता वैशाखी पौर्णिमेचा. चंद्र पूर्णत्वाला पोचल्याचा तो दिवस, मानवतेच्या पूर्णतेची एक पातळी उंचावत होता.

बुध्दाचं बालपण चालू झालं. असितऋषी त्या बालकाला पहाण्यासाठी राजवाड्यात पोहोचले, तेव्हा गौतमाच्या अंगावर बत्तीस लक्षणं आणि चौऱ्यांऐंशी शुभचिन्हं होती. असितमुनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
शुध्दोधनाचा थरकाप झाला. त्याला ते अशुभ वाटलं. राजानं कंपित आवाजात विचारलं,”का रडता महाराज? माझ्या मुलाचं पुढं काही अशुभ होणार आहे का? “
असित उत्तरले, “नाही रे राजा, हे बालक दुर्दैवी होण्याचा प्रश्र्च नाही. जगाचं दुर्दैव पुसून टाकण्याच याचं भाग्य आहे. दुर्दैवी आहे तो मी. आता मी म्हातारा झालो. एक अपूर्व चरित्र घडत असताना ते पहाण्याचं भाग्य मला मिळणार नाही, एवढंच माझं दु:ख आहे. “
शुध्दोधनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहायला लागले. त्याची चिंता संपली होती. मंचकावरचं ते बालक, निर्भर आनंदानं आपल्या अवतारकार्याच्या उंबरठ्यावर आनंदस्थित होतं.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView