ब्रह्मचर्य संपवलेले अगस्ति

Date: 
Sun, 30 Oct 2011

पर्णकुटीच्या आतल्या आडोशाला लोपामुद्रा उभी होती. पिवळी वसने, पिवळी कांती, उभट मुद्रा, घारे डोळे, खाली मान.
“बोल ना, तुला काय बोलायचे ते. “
अगस्ति मुनी खाली बसले होते. केश रुपेरी रूप घेण्याच्या वाटेवर. चेहरा गोल. नाक किंचित बसके. डोळेही खोल गेलेले. बारीक, पण अतिशय तेजस्वी. मांडीवर चार बोटांचा चाळवण चाळा करीत, परा मर्यादेवर सुचलेला मंत्र मध्यमेपर्यंत आणण्याची खटपट करीत.
लोपामुद्राकाहीतरी सांगायची इच्छा करते आहे पण काय ते कळत नाही. पुढल्या कामाला लागायचे आहे पण पत्नीकडून आलेला व्यत्यय फार त्रासाचा मानूनही चालायचे नाही, अशा परवडीत अगस्ति होते.
लोपामुद्रेनं बोलायचा प्रयत्न केला पण ते बोल पुन्हा अबोल झाले. अगस्तिंची उत्सुकचा थोडी ताणली गेली. भृकुटीही थोडी ताणली गेली आणि लोपामुद्रेला बोलावं लागलं, “आपलं लग्न होऊन सव्वीस वर्षं झाली. आत किती दिवस राहिले आहेत कोणास ठाऊक - “
पुन्हा लोपामुद्रा घुटमळली. किंचित त्रासून अगस्ति म्हणाले, “तुला हवं आहे तरी काय? “
आता बोलले नाही तर सगळेच फुकट जाईल,हे लोपामुद्रेच्या लक्षात आले, तिची लोपलेली मुद्रा गुलाबी झाली. काहीशा कातर स्वरात तिने म्हटले, “मला तुम्ही पाहिजे आहात. “
अगस्तिंची मुद्रा कठोर झाली. ते म्हणाले, “म्हणजे काय? मी तुझा नवरा आहेच. “
“गेल्या सव्वीस वर्षांत आपल्या आश्रमाच्या पर्णकुटीचं दार लागलं नाही. ते लावून तुमच्याशी बोलण्याची परवानगी द्या. “
का कुणाला ठाऊक! अगस्तिंची कठोरता संपली. त्यांच्या स्वत:च्याच मुखावर आरक्तता आली. तीच परवानगी समजून लोपामुद्रेने दार लावून घेतले आणि अगस्त्यांच्या लक्षात आलं की, दार लावून बोलण्याची परवानगी शब्दशून्य असते.
अगस्ति आणि लोपामुद्रो लोपून गेले. पण अगस्तिंनी निर्मिलेले ज्ञान त्यांच्या सांसारिक कर्तव्याने हीणकस न ठरता आदरले गेले.
ऋग्वेदातल्या पहिल्या मंडळातले एकशे एकोणऐंशीवे सूक्त, या दोघांच्या संवादाचे आहे. अगस्ति ऋषि ऋग्वेदातल्या सव्वीस सूक्तांचा द्रष्टा आहेत. म्हातारपणी त्यांनी पत्नीच्या आग्रहावरून ब्रह्मचर्य सोडून दिले. पण त्यांना बाधले नाही. आध्यात्मामध्ये या गोष्टींना मज्जाव केलेला नाही. कित्येक ऋषी सपत्नीक राहात होते. जवळजवळ सर्व देवांची लग्ने झाली होती. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हां त्यांच्या घरी अपत्य संभव होता.
धर्माने काम हा त्याज्य मानलेला नाही. त्यातील अन्याय आणि अतिरेक त्याज्य मानला आहे. पण खरे म्हणजे कोणत्याही गोष्टीतला अतिरेक त्याज्यच असतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView