ब्राह्मण विरुध्द क्षत्रिय

Date: 
Sat, 21 Jul 2012

उग्र युध्द उभं राहिलं. ब्राह्मण विरुध्द क्षत्रिय. संगर सोपं नव्हतं. एकवीस वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी केली अशी ज्याची कीर्ती तो परशुराम, दाशरथी रामापुढे ठाकला होता. ब्राह्मण तपाविरुध्द क्षत्रिय तेज उभं राहिलं होतं.
डोळ्यात आग, मनगटात आग, ओठात आग, आणि पोटात आग असं ज्वालाग्राही युध्द भडकलं. पाहाणारे स्तिमित झाले, अवाक् झाले, भयाने व्याकुळ झाले. आणि उलट्या बाजूचे, हर्षाने हुरळून गेले.
दोघांपैकी कुणीच बोलत नव्हतं. लढाईत शस्त्र बोलत असतात. शब्द हे शक्ती कमी करीत असतात, हे भान दोघांानाही होतं. मनापासून लढणं हाच दोघांचाही धर्म होता. मागे न हटणं, हाच हठयोग दोघेही शिकले होते, पळपुट्याचा हटयोग, दोघांच्याही पिढ्यात कुणी शिकलं नव्हतं.
एकाग्रता दोन ठिकाणी साकारली होती. वीर रस दोन नद्यातून वाहात होता. उग्रतेच्या लाटा दोन समुद्रातून एकमेकावर चाल करून येत होत्या.
परशुरामानं एकवीस वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी केल्याच्या भाकडकथांनी प्रेक्षकातले क्षत्रिय भुलले नव्हते. त्यांना माहीत होतं, की ते जर खरं असतं, तर त्यांचं क्षत्रियत्व कुठून उगवलं असतंं? इतकंच नाही तर, पृथ्वी एकदा नि:क्षत्रिय केल्यावर दुसऱ्यांदा नि:क्षत्रिय करायला क्षत्रिय उरलेच कसे? तेव्हा त्या भाकडकथा होत्या, हे शहाण्या क्षत्रियांना माहीत होतं. परशुरामाच्या ब्रह्मतेजाचं काम एवढंच होतं, की क्षत्रियांनी क्षत्रियासारखं वागावं, म्हणून त्यातले अन्यायी आणि आळशी क्षत्रिय बाजूला व्हावे.
तेव्हा परशुराम रामाविरुध्द उभा राहिला, शहाण्यांना त्याचा अर्थ कळला नाही. आश्र्चर्यही वाटलं. राम अन्याय करणार नाही, आणि तो आळशीही नाह. मग रामाविरुध्द हा ब्राह्मण का उठला आहे?
अशा प्रश्र्नांची उत्तरं सुखासुखी मनाला पटत नाहीत. तेव्हा ती उत्तरं लढाईच्या दु:खातून पेटत असतात. परशुरामानं जिवाच्या करारानं रामाविरुध्द रण उभं केलं होतं. त्याचा हेतू रामाला माहीत होता का नव्हता हेही इतरांना माहीत नव्हतं.
रामानं परशुरामाच्या उगारलेल्या शस्त्राचा वेध, विजेसारख्या गेलेल्या बाणाने घेतला. बोलता बोलता, म्हणजे एकही शब्द न बोलता रामानं परशुरामाला नि:शस्त्र केलं होतं.
पाहाणाऱ्यांनी श्र्वास रोखून धरले हाते. क्षत्रिय जिंकला होता. ब्राह्मण हरला होता.
ब्राह्मणाच्या नेत्रातला निखारा नाहीसा झाला होता. परशुराम उताविळपणानं पुढे झाले. रामाला पोटाशी धरले आणि ते म्हणाले, “हे रामा, माझ्या पुण्याचं बख कुठल्यातरी सत्यशील शौर्यात मला मिळवून टाकायचं होतं. परीक्षेशिवाय सोन्यालाही कुणी कोंदणात बसवत नाही. तेच मी केलं. माझ्या पराभवानं आज मी धन्य झालो. तुझ्या पराक्रमानं पावन झालो. “
रामानं खालच्या मानेनं स्वीकारलेला तो महान विजय होता. तो विजय घेऊन नतमस्तक झालेला राम, आणि देऊन उन्नतनमस्तक झालेला परशुराम. भेदापलिकडील सामाजिक एकता पाहायला, गीतेच्या अकराव्या अध्यायतले सूक्ष्मदृष्टी नेत्र हवेत. पण हवेत का ते कोणाला?

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView