भगवान बुध्दांचा चमत्कार

Date: 
Sun, 31 Mar 2013

हसणंसुध्दा काटेरी असू शकतं. आपल्याबद्दलच्या उपहासाचं हसणं, आपण स्वत: उपवास करण्यापेक्षा अधिक पीडा देतं.
परिसेनाच्याभोवती तुच्छतेच्या तीरांचा मारा होत होता. बिचारा परिसेन! तिरस्काराचे तीर घेऊन येणाऱ्या त्या हसऱ्या लाटा सोसत, खाली मान घालून उभा राहिला. म्हातारा, खांदे पुढे आलेला, पाठीला पोक, तोंड उघडं, ओठ थरथरते आणि कपाळाच्या खोबणीत नेहमीचं पाणी साचत राहिलेले डोळे.
पाचशे भिक्षूंनी तीन वर्ष परिसेनाला शिकवण्यासाठी डोकं फोडलं. पण परिसेनाच्या डोक्यात काही शिरलं नाही. तेव्हा त्या सगळ्या भिक्षूंनी त्याच्यापुढे हात टेकले.
परिसेनाला शिकता येत नव्हतं, हे जेवढं खरं, तितकंच त्याच्या पाचशे गुरूंना शिकवता आलं नव्हतं, हेही खरं. दयाविव्हळ भगवान बुध्द पुढे झाले. त्यांनी परिसेनाला एकच पाठ शिकवला.
“जो विचारांचा, आचारांचा सयंम करता, दुसऱ्याला त्रास देत नाही तो ‘निर्वाण’ मिळवू शकतो. “
बस्स!एवढंच. एकच गाथा, एकच सूत्र. वास्तविक परिसेन तेच करत नव्हता का? जन्मभर त्यानं कोणाला त्रास दिला नव्हता. परपीडेचा विचारही केला नव्हता. मग उच्चार दूरच. वाईट मनुष्य सुधारला, की त्याच्यामध्ये क्रांती होते, ती ठळकपणाने दिसते. पण सहज स्वभावानं चांगला वागणारा माणूस, जेव्हा तसं वागणं चांगलं असतं हे ऐकतो, तेव्हा आत तो संतुष्ट होतो. परंतु बाह्य क्रांतीची खूण दिसत नाही. कारण तो आधीच चांगला वागत असतो.
परिसेनाचं तेच झालं. तो आता स्वयंशांत झाला. त्याला सत्यबोध झाला होता. तो बोधिस्तव झाला होता.
पण प्रसेनजित राजाच्या दरबारात पहाऱ्यावर उभे असणाऱ्या पहारेकऱ्याला ते कुठे माहिती होतं? बुध्द दरबारात पुढे चालत गेला. परंतु मागे भगवान बुध्दाचं भिक्षापात्र हातात घेऊन चालणाऱ्या परिसेनाला, पहारेकऱ्यानं अडवलं.
राजापाशी भगवान पोचले, तेव्हा राजा उठला. पण विस्फारलेल्या डोळ्यानं म्हणाला, “भगवान आपल्या मागून भिक्षापात्र धरत, एक हात नुसताच हवेत येतो आहे. पाहा एकदा! “

भगवानांना मागे पाहण्याची गरज नव्हती. ते म्हणाले, “तो परिसेनाचा हात आहे. त्याला बोधिस्थिती प्राप्त झाली आहे. त्याच्या कर्तव्यात त्याला कुणी अडवूश शकत नाही. “
राजा चाचरत म्हणाला, “मी ऐकलं होतं, परिसेन ज्ञानहीन आहे. “
“पण शीलहीन नाही, विचारहीन नाही. तो सहजज्ञानी होता. आता प्रयत्नज्ञानीसुध्दा झाला. दुधात साखर पडली. तो बोधिसत्व झाला. बोधपूर्ण झाला. “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView