भरलेले पिस्तुल

Date: 
Sun, 22 Jun 2014

फसवणारा फसला जातो, याचा हा एक आगळा अनुभव.
अनुभव आहे गोव्यातला.
ही कथा गोवा मुक्त होण्यापूर्वीच्या काळातली आहे. खरं म्हटलं म्हणजे निसर्गाचं सौम्य, शांत रूप म्हणजे गोवा. हिरव्या शालूचा श्रृंगार केलेल्या टेकड्या, त्यांच्या पायाशी पसरलेली रेखीव शेतं. मग नारळाच्या टोपल्या डोईभर डोलवीत लगडणारे ताडमाड वृक्ष. तिथं रुपेरी वाळूची सरहद्द ओलांडल्यावर पसरलेला अथांग दर्या. त्याशेजारी डोलकाठ्या उभारून चंदेरी लाटांया पैंजणाचा नाच करणरा किनारा.
त्या किनाऱ्यापलीकडच्या लाटांवरूनच पोर्तुगीजांचं भूतही नाचत आलं. काळ्या ढगाला रुपेरी कडा म्हणतात, तशा या सुंदर समुद्रावरून शेकडो वर्षाचा शाप चालत आला.
त्या शापाला शेवटले आचके लागले, त्या काळातली ही कथा. पोर्तुगीज पातशाहीचे हस्तक म्हणवून घेणारे, अत्याचार करीत उन्मत्त झाले होते.

फर्टुडो हा त्यांच्यापैकीच एक. सावर्ड्याच्या बाजूनं जीे सरहद्द भारत आणि गोवा यंाच्यामध्ये होती, तिथं फर्टुडोची काळी नजर कावळ्याच्या वृत्तीनं रोखलेली होती.
त्या नजरेला चुकवून फर्नांडिसला बाहेर पडायचं होतं. फर्नांडिस हा एक पेटलेला देशभक्त होता. मानेवरचं जू झुगारून द्यायला तयार झालेल्या जवानांपैकी, संगरात उडी घेतलेला.
संगर फार धोक्याचा होता. पोर्तुगीज अत्याचाराला दयामाया नव्हती. देशभक्त बापांनाह स्वत:च्या मुलांना या संगरात लोटताना आतड्याला पीळ पडायचा. मुलंही तशीच होती. एक मुलानं घर सोडून आयुष्याचा होम पेटवला आणि बापाला नम्रपणे पत्र पाठवलं, “बाबा, मला क्षमा करा. पटलेलं चांगलं कृत्य शेजाऱ्याच्या मुलानं करावं, असं प्रत्येक बापानं म्हटलं तर चांगली कामं होतील कशी? “
अशा त्या तेजस्वी काळात फर्नांडिसही परिस्थितीवर स्वार होऊन पोर्तुगीजांबरोबर लढत होता. कित्येक वेळा गोव्यात जायचं, तिथली लोकांची संपत्ती सुरक्षित जागी ठेवायची, बाहेरच्या लोकांची मदत आत पोचवायची, अशी उलटसुलट कामे त्याने अनेक वेळा केली. प्रत्येक वेळी बदललेलं नाव अन् बदललेलं गाव.
यावेळी फर्नांडिसला महत्त्वाचे कागदपत्र आणि काही पैसे सरहद्दीबाहेर काढायचे होते.
रस्ता सोडून पायवाटेनंच फर्नांडिस चालत होता. ती पायवाट संपत होती, त्यापलीकडे टोकदार तारांच्या भितीचा एक उभारा आणि लगोलग भारताची हद्द. फर्टुडोला भारताच्या उभ्या असलेल्या तीन फर्लांगावरचा सुभेदार ग्यानसिंग दिसत होता. पण प्रश्र्न तीन फर्लांगाचाच होता. मध्ये नुसती काटेरी तार नव्हती, तर त्या काटेरी तारेच्या अलीकडे सैतानसेवक फर्टुडो मोठ्या मिजाशीत बसला होता. समोरच्या सुभेदारक डे तो टक लावून पाहात होता. प्रत्यक्ष त्याच्याशी फर्टुडोला काही गोळागोळी करायची नव्हती, त्यामुळे विश्रांतीच्या त्या क्षणाला त्यानं काडतुसाचा पट्टा आणि रायफल, शेजारच्या छोट्या झुळझुळत्या झऱ्याच्या काठाला ठेवली होती, त्या

त्या झऱ्यातच हातपाय धुवून ग्यानसिंगाकडं पाहत फटुडो कुर्ऱ्यात उभा होता.

फर्नांडिसने मनाशी काही बेत पक्का केला. त्यानं हळूहळू चालायला सुरुवात केली आणि चालता चालता फर्टुडोची ती काडतुसं अन् रायफल झऱ्यात ढकलून दिली. म्हणजे पायानं ठोकरलीच. ठोकरल्यावर एक किंकाळी फोडली. चकित झालेला फर्टुडो मागं वळून पाहायला लागला तेव्हा फर्नांडिसनं त्याला सुनावलं, “बंदूक अशी वाटेत ठेवता काय? माझ्या पायाला केवढं लागलं?”
“वाट? ही वाट आहे? बदमाश! “फर्टुडोनं पुढं उडी घेतली तसं फर्नांडिसनं सरळ आपल्या हातातलं पिस्तुल झाडलं. पण नेम मात्र चुकवला किंवा चुकला.
फर्टुडो आता नि:शस्त्र होता, पण त्याने किंकाळी फोडली असती तर आजूबाजूचे पहारेकरी एका मिनिटात तिथं हजर झाले असते आणि कितीही जलदी केली तरी तारेवर जपून चढून जायला फर्नांडिसला चार-पाच मिनिटं लागली असती. म्हणून त्यानं फर्टुडोला हातानंच गप्प बसायला खूण केली आणि पिस्तुलच त्याच्यापुढं टाकलं.

मग हातातल्या दोन्ही पेट्या फर्नांडिसनं एकाएकी उंच करून तारेपलिकडे फेकून दिल्या. फर्टुडोनं पुन्हा ओरडण्यासाठी तोंड उघडलं.
फर्नांडिस फर्टुडोला म्हणाला, “हे पाहा, मी तुला मारू शकलो असतो, पण मारलं नाही. तुला मारून मला काय मिळणार? आता तू एवढंच कर की मी तिकडे टाकलेल्या दोन पेट्या आहेत. कागदपत्रांची पेटी मी घेऊन जातो. दुसऱ्या पेटीत सहा हजार रूपयांच्या नोटा आहेत. मी पलीकडे गेल्यावर त्या तुला तारेतून देईन. तेवढ्या तू घे. त्याआधी पलीकडं जायला मला तू मदत कर. “

फर्टुडोला स्वत:ची भिजलेली बंदूक समोर दिसत होती. स्वत:ची असहायता दिसत होती. तसंच फर्नांडिसनं हातातलं शस्त्र टाकून दिलेलं दिसत होतं. त्यानंही त्याचा फर्नांडिसबद्दलचा विश्र्वास वाढला होता. फर्नांडिस तारेपलीकडे गेला तरी, त्यानं दिलेल्या त्याच्याच पिस्तुलानं फर्नांडिसला मारणं फर्टुडोला सहज शक्य झालं असतं. कारण पेट्या घेण्यासाठी फर्नांडिसला वाकणं भागच होतं.

स्वार्थाचा निरोप माणसाच्या डोक्यात चटकन् पोचतो. फर्टुडोच्या डोळ्यातला विखार संपला. फर्नांडिसला तो समजला अन् त्यांन एकाच झेपेत तारेच्या पलीकडे उडी घेतली. तारेच्या वरच्या कडेला त्याचा पाय घसरल्यासारखा वाटला तेव्हा फर्टुडोनं त्याला बाजूच्या काठीचा आधारही दिला.
उडी मारून फर्नांडिस पलीकडे पोचला आणि त्यानं दोन्ही पेट्या हातात घेतल्या. फर्टुडो त्याच्यावर पिस्तुल रोखून म्हणाला, “मुकाट्यानं दोन्ही पेट्या माझ्या बाजूला सरकवून दे. नाही तर याद राख, गोळी घालीन. अजून तुझी हद्द दहा फूट पलीकडे आहे. “
हा सरळ विश्र्वासघात होता. फर्नांडिस सहा हजार रूपये द्यायला तयार झाला होता, पण विश्र्वासघात झाला तर काय करायचं हेही त्याला माहीत होतं. त्यानं सुसाट वेग घेतला आणि तो भारतीय हद्दीत पोचला. तोवर ग्यानसिंगही मागून धावत आला होता.

अर्थात फर्टुडोनं पिस्तुल झाडलं आणि तेव्हाच त्याला फर्नांडिसनं कोणती काळजी घेतली होती हे कळून आलं. फर्नांडिसच्या सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलात एकच गोळी शिल्लक होती. ती त्यानं पूर्वीच झाडली होती. त्यामुळे ते पिस्तुल भरलेलं आहे, असं फर्टुडोला वाटलं होतं. पण दुसरी गोळी त्ंया पिस्तुलात नव्हती. फार लोभ केला नसता तर त्याला सहा हजार रूपये मिळाले असते.
फर्नांडिस ओरडून म्हणाला, “मुकाट्यानं ते पिस्तुल टाकून दे इकडं. तुझं काडतुसाजवळ असलेलं सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड मी खिशात टाकलं होतं. ते परत हवं असेल तर पिस्तल मुकाट्यानं परत टाक.”
आपोआपच ते पिस्तुल फर्नांडिसच्या पायाशी आलं. त्याबरोबर कानावर “विश्र्वासघातकी, हरामखोर” असे चार अपशब्दही पडले, पण अपशब्द ऐकूनही फर्नांडिस किंवा ग्यानसिंग यांना हसूच फुटलं.
फसवणाराच अखेर फसला जातो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView