महावीर, दैव आणि प्रयत्न

Date: 
Sat, 28 Apr 2012

त्या दिवशीचं दृश्य मजेदार होतं थंडीच्या दिवसात आंघोळ करताना तोंडातून वाफा निघत असतात. अंगातून वाफा निघत असतात. गरम पाण्याच्या ओघळाबरोबर वाफांच्या लाटा आजूबाजूला लहरत असतात. गावाबाहेरचा डोंगर त्या दिवशी तसाच वाफांच्या लाटामध्ये आंघोळ करत होता. वर ढग, खाली धुके आणि अंगावरून ओघळणारे पाण्यंाचे ओघळ. अशी ती डोंगरांची आंघोळ चालली होती.
सकडलाचा मुलगा गावाबाहेर या डोंगराखालीच रहात होता. थंडी असो, वारा असो, ऊन असो, त्याचं काम सुरू असे. नसत्या चिंता चिकटवून दु:खी न होणारा तो मुलगा होता. “आपलं काम करावं आणि जे जे मिळेल ते दैवाकडून मिळालं असं समजावं.” असं तो लोकांना सांगे. हाताने काम करी पण लहर आली तर बसूनही राही. सगळं काही देवाच्या इच्छेने घडतं, हा त्याचा सिध्दान्त.
भगवान महावीर चालले होते. शांतीचं तप जसं काही साकार होऊन, जगाचे सुस्कारे शांत करीत, पुढे चाललं होतं.
“महाराज, देवाने आपल्याला या गावात कुठे यायची बुध्दी दिली? “सकडालाचा मुलगा बसल्या जागेवरूनच म्हणाला.
भगवान, मृत्तिका पात्रे बनवणाऱ्या चक्र यंत्रापाशी आले आणि त्यांनी सकडालपुत्राला विचारले, “हे तुम्ही काय करता आहात? “
माणसाला आपली काही मतं ठाम ठेवावीशी वाटतात. त्यातच त्याला गोडी वाटते. सगळं काही देव करतो या विश्र्वासापेक्षा, तसं मत धारण करण्याचा अहंकारच मोठा असतो. त्या मोठेपणाच्या सुप्त मग्रुरीतच, सकडालाचा मुलगा म्हणाला, “मी? कोठे काय करतो आहे. भांडी होताहेत. “
महावीर म्हणाले, “काल रात्री मी डोंगरमाथ्यावर झोपलो होतो. तुम्ही शेजाऱ्याशी मारामारी केलीत, कारण काल तुम्ही घडवलेलं मोठं भांडं त्यानं फोडलं होतं. मला वाटतं तुम्ही त्या शेजाऱ्याची जाऊन क्षमा मागायला पाहिजे. “
“का? का म्हणून? “
भगवान शांतीरहस्याच्या गोडीने म्हणाले, “ते भांडं देवानं तुझ्या शेजाऱ्याला फोडायची बुध्दी दिली, असं तू म्हणायला हवं होतंस, नाही का? “
उत्तर देण्यासाठी शिवशिवणारे ओठ शिवशिवतच राहिले. सकडालाच्या मुलाला कोणत्या शब्दाचे स्फोट बाहेर उडवावेत, हे काही कळेना. शेजाऱ्याच्या चुकीवर पांघरूण घातलं, तर वार तरी कोणावर करायचा, असा त्याला पेच पडला.
सकडालाचा मुलगा निराळ्याच मुद्‌द्यावर घसरला. त्यानं विचारलं, “म्हणजे उद्या एखादा माणूस माझ्या बायकोला त्रास द्यायला लागला, तर मी स्वस्थच रहायचं का? माझ्यावर कोणी कसलाही अन्याय केला तर मी तो देवाच्या नावानं सहन करायचा का? “
“नाही बेटा, तुला सहन करण्याचं सामर्थ्य नसेल तर प्रयत्न करण्याची, आणि त्याची जबाबदारी घेण्याची हिम्मत, तुला बाळगली पाहिजे. “
सकडालाचा मुलगा खुषीनं हसला. खोट्या दैववादाचे मडके, आज त्यानेच फोडून टाकले होते. आणि प्रयत्नवादाचे चक्र फिरविण्याची नवी जाणीव ज्या भगवानाने दिली, त्यांच्यापुढे सकडालाच्या मुलाने आदरपूर्वक हात जोडले.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView