मांस विकून मोक्ष

Date: 
Sat, 21 Apr 2012

सी.बी.आय्., के.जी.बी, सी.आय.ए, एफ.बी.आय., स्कॉटलंड यार्ड, या जगातल्या पाच प्रख्यात गुप्तहेर संस्था आहेत. जगातल्या या पाचही संस्था एकत्र करून पिळल्या, तरी जे रसायन तयार होणार नाही, असे लोकविलक्षण, पण सद्‌भावाची झालर असलेले मिश्रण तुम्हाला हवे असले, तर नारदाच्या नावापाशी तुम्हाला मुक्काम करायला पाहिजे.
नारद काय करू शकत नसत? ते एकावेळी अनेक अंगाने कामे करीत. दुसऱ्यावर नजर ठेवणे, लाव्यालाव्या करणे, हवी तेव्हा शांती पटवणं, नको तेव्हा युध्द पेटवणे. आणि हे सगळंसुध्दा आपल्याबद्दल सगळीकडे आदर राखून.
नारदांची फिरकी घेण्याचे काम हमखास करी कर तो विष्णू आणि विष्णूने घेतलेल्या ताज्या फिरकीमुळेच, पायाखाली फिरण्याचे चक्र बांधलेले नारद, तुलाधाराच्या प्रत्येक हालचालीवी नजर ठेवून होते. हा तुलाधार करतो तरी काय?
आणि रहस्य तर अधिकच गूढ होत चाललेले. तुलाधार मासंाचे लचके हत्यारांनी कापून तराजूत तोलून, ते येईल त्या गिऱ्हाईकाला विकत होता. बस एवढेच. तोंडाने देवाचे नाव नाही. दुकानात एखादी देवाची तसबीर म्हणावी, मूर्ती म्हणावी , तर तीही नाही.
मनातल्या मनात किंवा तोंडातल्या तोंडात काही पवित्र मंत्र पुटपुटायचा भाव म्हणावा तर गांभीर्याच चिन्ह नव्हते. दुकानात मधूनच आतल्या बाजूने येणारी नात नातू डोकावेल तिकडे हसत मान डोलावून त्यांच्या नजरेतून खोड्या काढणार तुलाधार. संसारात रंगून गेलेला आणि गिऱ्हाईकांच्या सेवेत रंगून गेलेला.
“या मांसविक्याला का मोक्ष मिळणार? “ नारद कातावून स्वत:शीच पुटपुटले. काल संध्याकाळी विष्णूबरोबर झालेली प्रश्र्नोत्तरे नारदाला चांगलीच चावली होती. भक्ती आणि मोक्ष यांच्या रंगलेल्या गप्पात, विष्णूने श्रेष्ठभक्त म्हणून नाव घेतले ते जगात दुसऱ्या कोणाचे नाही, तर तुलाधाराचे. नारद चांगलाच चक्रावला. सवतीमत्सरापेक्षासुध्दा भक्तमत्सर भारी असतो. नारद तरतरा उठले आणि तुलाधाराचा शोध घेत, त्याच्या दुकानासमोर येऊन उभे राहिले.
दुकान, तेही मांस विकण्याच, देवभावाचा लवलेश नसलेले. याला म्हणे मोक्ष मिळणार!! हा म्हणे मोठा भक्त!!! नारद संतापाने डाफरले.

दुपार संपली, संध्या कलली. नारद तरातरा दुकानापाशी आली, तुलाधाराने नम्र आवाजात नारदाला विचारले, “किती मांस तोलू तुम्हाला? किती हवंय?”
“मांस नकोय मला. उत्तर हवंय.” नारदाने वीणेवर हात आपटन सांगितले. वीणेतून आलेला प्रतिसाद नेहमीप्रमाणे गोड नव्हता, घुसमटलेला हाता. नारदाने घुसमटलेल्या घुश्श्यातच विचारले, “तू कसली भक्ती करतो आहेस? विष्णूची का शंकराची? तुला कैलास हवाय का वैकुंठ? कुठला मोक्ष तुला मिळणार आहे? “
या चमत्कारिक गिऱ्हाईकाडे तुलाधार पहातच राहिला. लवत्या, मृदू आवाजात त्याने आपला गोंधळ लपवला आणि तो म्हणाला, “भक्ती म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय? मला तर काहीच माहीत नाही. महाराज, मी स्वच्छ मांस आणतो, त्यात भेसळ करीत नाही, पोटापुरते स्वत:ला ठेवून योग्य भावाने आलेल्या माणसाला विकून टाकतो. “
जुनी आठवण तुलाधाराच्या मनात जागी झाली. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी मरताना मला सांगितले होत, ‘बाळा रे, काही वेळी मांसही वीक पण सत्या विकू नकोस. त्यानेच तुझा संसार सुखाचा होईल. ‘ ते शब्द सकाळ, दुपार, संध्याकाळ मला आठवतात. बाजूच्या दुकानदाराने मला आग्रह केला, दोष दिल, जास्ती किंमतीला मांस विकायचा आग्रह केला. पण मला तसे करवतच नाही. इतकंच, एवढंच. मी तुम्हाला मांस विकणार नाही. पण जेवायला मात्र बोलावतो, चला. माझी जेवायची वेळ झाली आहे. “
नारदाने त्या पुण्यवान तुलाधाराच्या पंक्तीला जेवणही घेतले. तुलाधाराच्या वृत्तीतली सहजता, त्याच्या बोलण्यातला निष्पापपणा, संसारातली शांती, नारदांना विष्णूने न दिलेले उत्तर देऊनही गेली. शक्ती शब्दात नसते, सहज वर्तनात असते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView