रावणातून रामाकडे
वसंताने मामांना खूष करायचे ठरवले. तो म्हणाला, “मामा, तुमच्यासारखा माझा देवाबिवावर विश्र्वास नाही. पण राम शूर होता हे खरं, रावण दुष्ट होता हही खरं रावणानं एकही पाप करावयाचं ठेवलं नव्हतं.”
मामा काहीच बोलले नाहीत. वसंताला जरा आश्र्चर्यच वाटले.
पण एकदा मुद्दा वसंताने हातात घेतला होता. तेव्हा त्याने जिद्द धरली. तो म्हणाला, “रावणाने सगळे देव कैदेत टाकले ते चांगलेच केले म्हणा. पण दुसऱ्याने मिळविलेले धन पळवायचे ही काही चांगली गोष्ट नव्हती. दुसऱ्याची बायको पळवण्याची हिकमत तर, कुठल्याही नीच माणसाला शोभण्याइतकी दुष्ट होती”
मामांनी तोंड उघडले ते वसंताविरुध्द बोलण्यासाठी. “रावण दुष्ट होता यात शंकाच नाही. पण त्यात एकही गुण नव्हता, असे मला वाटत नाही. त्याच्यात काही उत्कृष्ट गुण होते. “
वसंताऐवजी मामी मध्ये पडल्या. त्या पक्क्या सनातनी. त्या जवळ जवळ निषेधात्मक खेकसल्या, “काय बोलणे हे मेलं”
वसंताने मामाचं गृहछिद्र आणखी मोठं केलं. तो मामांना म्हणाला, “रावणाचा एक तरी गुण सांगा बरं.”
मामा शांतपणे म्हणाले, “एकच का चार सांगतो. रावण हा उत्कृष्ट शिवभक्त होता. दुसरा गुण म्हणजे त्यानं उत्कृष्ट तप करायचा निश्र्चय दाखवला होता. तिसरा गुण, रावण शूर होता. म्हणूनच त्यानं, तात्कालिक का होईना, देवांवरही विजय मिळविले होते. त्याचा चौथा गुण म्हणजे त्यानं संसारकर्तव्ये उत्कृष्ट केली. “
मामी रागावून म्हणाल्या, “संसार कर्तव्यं उत्कृ ष्ट केली? दुसऱ्याच्या बायका पळवून चांगला संसार करतात का? “
मामा म्हणाले, “ तो रावणाचा अतिरेक होता. अतिरेकामुळेच रावणाचं वाटोळं झालं. पण रावणाला दुसऱ्या बायकोची इच्छा असेल, तर त्यावेळच्या पध्दतीप्रमाणे देवादिकांनीही अनेक बायका केल्या होत्या. तू लक्षात ठेवलं पाहिजेस की रावणानं उत्तम संसार केला. “
“कशावरून? “
“कशावरून म्हणजे? त्याचे भाऊ, त्याचे पुत्र, त्याचे नातेवाईक रावणासाठी प्राणपणाने लढले. बापलेकांचं एवढं प्राणापलीकडे प्रेम क्वचितच दिसतं.”
वसंता ऐकतच राहिला.
मामा पुढे जोरात म्हणाले, “रावणानं परस्त्री पळवली असेल पण मंदोदरीला त्यानं नाराज ठेवलं नव्हतं.”
“अस्सं!”
“होय” मामा म्हणाले. “रावणाला मारल्यानंतर मंदोदरी ढसाढसा रडली, असं वाल्मिकींनी लिहिलं आहे. रावणाला शिव्या देण्यापेक्षा दोष टाळून घ्यावेत. आणि मग रामाच्या सत्य शौर्याशी नम्र व्हावे”
वसंता शिशिर ऋतुसारखा थंड पडला. आणि मामी दणदण पावलं टाकीत स्वयंपाकघराच्या आडोशाला गेल्या.