शनिच्या राशीला माणसांचा आ’ग्रह’
नारद सगळ्या ग्रहांचा निरोप घेऊन आकाशतून पृथ्वीकडे जायला निघाले, तेव्हा शेवटीची पाळी आली, ती शनीची.
नारदांनी शनीच्या स्तुतीची माणसं करीत असलेली व्रतं सांगितली. त्याच्या मूर्तीची रूपं सांगितली. शनीचं व्रत म्हणजे शनीची लोहमूर्ती तेलानं भरलेल्या लोखंडाच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवायची. काळ्या वस्त्रांची जोडी गरीबाला देऊन टाकायची. आणि ‘श नो देवीरभिष्टये’ हा मंत्र म्हणायचा. याशिवाय शनीच्या गुणकर्मावरून त्याला शनैश्र्वर, मंद, रौद्र इत्यादी दहा नावे आहेत -
कोणान्तऽको रौद्रयमोश्र्थ बभ्रु:
कृष्ण: शनि: पिङगलमन्दसौरि:।।
शनीच्या या दहा नावांनी स्मरण केल्यावर शनीचा त्रास जातो, असं म्हटलं जातं. शनी हा पापग्रह आहे. त्याची साडेसाती प्रसिध्द आहे. त्यामुळे ही सगळी स्तुतीव्रतं करायची, हा माणसांचा समज नारदानं सांगिताला. नारदांच्या तोंडून हे ऐकल्यावर शुक्राप्रमाणे शनी जरा डाफरूनच म्हणाला, “स्तुतीनं मला फसवायचं? ही माणसं काय मला मूर्ख समजतात का? “
नारद मनातल्या मनात म्हणाा, “बाबंानो, तुम्हा सगळ्या ग्रहांना माणसाची तुमच्याबद्दलची मते सांगितली, तर तुमच्या सगळ्या माणासंाबद्दलची मतं वाईट होऊन जातील. वास्तविक अवकाशातले ग्रह जेवढे वाईट करीत नाहीत, तेवढे वाईट माणसांचे एकमेकांबद्दलचे आग्रहे एकमेकांचं वाटोळं करतात. त्या वाटोळ्याच्या वाटेचा इशारा फार तर, सृष्टीतील ग्रहवर्तुळं काही अंशी देत असतील. पण सृष्टीतल्या बऱ्यावाईटास सर्वांशानंं ग्रहांना जबाबदार धरणं हे शुध्द बेजबाबदारपणाचं आहे. ते खरं पण हा बेजबाबदारपणा दुरुस्त करणं, हे तुुमच्यासारख्या उच्चपदस्थ मोठ्यांचंच काम नाही का? “
एवढं सगळं काही नारद मोठ्यानं बोलू शकले नाहीत. ते एवढंच म्हणाले, “माणसाच्या चुकांची जाणीव देण्यासाठी आपणच खटपट करायला नको का? त्यांच्या चांगल्या गुणाना वाव द्यायचा, आणि त्यांच्या गैरसमजाची दुरुस्ती हेच आपलं काम.”बुध ग्रहानं आपली बुध्दी चालवली. तो म्हणाला, “द” म्हणजे देणारा, ‘नार’म्हणजे मोठा नर. माणसाला मोठेपण यावं म्हणून जो देकार करतो तो ‘नारद’ जा नारदमुनी, लोकांना ग्रहांचं खरं कार्य अवश्य समजावून सांगा. “
तेवढ्यात बुभुत्कार ऐकू आला. आकाशात गडगडाट ऐकू आला. धुमके तूसारखा हनुमान कुठून तरी येत होता. बोलता बोलता तो आला, आणि त्यानं शनीला प्रेमभरानं जवळ घेतलं. शनीही आदरभावानं त्याच्याजवळ गेला. नारद म्हणाला, “हे तुमचं प्रेम माणसांनी पाहिले, तर त्यांना झीटच येईल, तिथे ते समजतात, की शनीचा राग काढण्यासाठी शनिवारी मारुतीची उपासना करावी. कारण शनी मारुतीला भितो. शनीच्या पापकर्मापासून मारुती माणसाला मुक्त करतो. “
शनी क्रोधाच्या आविष्कारानं म्हणाला, “तुमच्या माणसांनी कर्माचा सिध्दांत रद्द केला आहे का? कार्यकारणभाव रद्द केला आहे का? त्यांना वाईट फळ मिळत असेल. ते त्यांच्या कर्मानं. त्यांची घाण उपसण्याबद्दल मला नरकात जावं लागतं, मारुतीची उपासना केल्यामुळे मला संतोष होतो. भीती वाटत नाही, याचं कारण मारुती हा त्यागाची, समाजसेवेची, शुध्दतेची, निष्ठेची मूर्ती आहे. त्या मूर्तीचंं स्मरण केल्यामुळं माणसं शुध्द होतात, हे खरं आहे. माणसं शुध्द झाली, त्यांचं बरं झालं, की मलाही बरं वाटतं. माणसांच्यावर माझं प्रेम आहे. “