स्वत:ची स्वत:ला फाशी
रंभासुराच्या तपाची अखेर येत होती. आकाशातल्या ढगांनी डोंगराभोवती फेर धरला होता. जसे काही गोवर्धनाभोवती गोफ नाचत होते. जणू पांढऱ्या वासरांनी गोमातेला विळखा घातला होता. रंभासूर अखंड बारा वर्षे तप करीत होता.
शंकर मुकाट्यानं रंभासुरापुढे उभे राहिले आणि म्हणाले, “काय हवं ते माग. “
रंभासुरानं शंकरांनाच मागून टाकलं. रंभासूर म्हणाला, “हे शिवप्रभू तुम्हीच माझे पुत्र म्हणून व्हा.“
शंकराला “हो “ म्हणणं भागच पडलं. आणि मग काही दिवसांनी रंभासुराल्या भेटलेल्या महिषी या स्त्रीपासून, शंकराचा अंश असलेला पुत्र झाला. त्याचं नाव महिषासूर हे पडलं.
तप करण्याचं वडिलांनी घेतलेलं स्फुरण, महिषासुराच्या मनातही आलंं. मात्र तप केलयावर त्यानं बापाचा वर मागण्यातला संयम बाळगला नाही. त्यानं ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं, की कोणाही पुरूषाकडून त्याला मरण नसावं.
तपाच्या नियमाप्रमाणे, हा वर जिंकलेला महिषासूर, तापून उठला. त्यानं त्रैलोक्याला त्राही भगवान केलं.
अरुणाचलच्या रम्य परिसरात मात्र त्याची काळरात्र ओढवली. तिथं पार्वती बसली होती तपाला. तपाचं तेज निराळंच असतं. पण पाप्याला पुण्यदर्शनातही पापाच्याच खुणा दिसतात. तेव्हा त्याच्या मनात पार्वतीबद्दल अभिलाषा निर्माण झाली. महिषाससूर जसा काही स्वत:च्या मरणाकडेच चालत जात होता. पार्वतीकडे पाहात त्यानं प्रश्र्न फेकला, “तू तप कशासाठी करते आहेस? “
“बल श्रेष्ठ शंकरासाठी “पार्वती तीव्र थंडतेनं म्हणाली.
महिषासुराचं पाप म्हणालं, “बलश्रेष्ठ तर मीही आहे. कोणाही पुरूषापेक्षा मी बलश्रेष्ठ आहे. अर्थात् स्त्रीपेक्षा तर आहेच आहे.“
महिषासुराच्या मग्रुरीा उत्तरार्ध सिध्द व्हायचा होता. काटेकोरपणानं बोलायचं तर तपाचं अभय, पुरूषापासून होतं. हे माही असलेली पार्वती त्याला हसून म्हणाली, “तुझं सामर्थ्य सिध्द कर. “
तपशंात पार्वती मुकाट्यानं उठली, आणि युध्द सुरू झालं. परशु, खडग्, चक्र, त्रिशूळ, भाला ही हत्यारं एकमेकांवर कोसळायला लागली. गंागरलेला महिषासूर काही वेळातच पार्वतीच्या पुढ्यात पडाल. पार्वतीनं महिषाच्या अंगावर डावा पाय दिला. उजव्या पायावर भार देऊन तिनं तोल सावरला आणि त्रिशूळ महिषासुराच्या छातीत खुपसला.
गर्व हा लोभानं शक्ती गोळा करत राहातो. त्यातच गुंततो. सगळी शक्ती कुठल्याही लोभाला प्राप्त होऊ शकत नाही, ही गोष्ट तो विसरतो. तो जमा न करू शकलेली शक्ती अधिक असते. अगणित असते, प्रबळ असते, हे साधं गणित त्याला लक्षात येत नाही. आणि त्यातूनच महिषासुरासारख्यांचे मृत्यू आणि ‘महिषासुरमर्दिनी ‘ सारख्या पदव्या जन्माला येतात. शक्तीचं विज्ञान कळणं, हे शक्ती मिळवण्यापेक्षा महत्त्वाचं असतं.