हसनने काय बुडवले?

Date: 
Sat, 12 May 2012

ख्वाजा हसन हा महान संत. पण कित्येक महानता, क्षुद्रतेतूनच जन्माला येतात. पुढे मोठा झालेला हसन प्रथम लहान होता. प्रत्येकाचा पाळणा लहानच असतो. महामार्गावर जाण्याचे भाग्य लाभलेल्या प्रवाशाला, मध्ये केव्हा तरी चुकांचा चौक ओलंाडूनच, पुढे जावे लागलेले असते.
ख्वाजा हसन या महान संताची गोष्ट निराळी नव्हती. अहंकार, आढ्यता, दुसऱ्याबद्दल तुच्छता आणि संशय हे चार रस्ते मिळालेल्या चौकात, आयुष्यातला एक कालखंड हसनने घालवला होता.
असाच तो एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर हिंडत होता. समुद्राच्या भरतीवर एक नाव डोलत होती. वेगवान वाऱ्याचया तीव्रतेने ती नाव अस्थिर झाली होती.

डाव्या बाजूला किंचित दूर खजुरीच्या झाडाखाली एक नीग्रो बसला होता. म्हणजे तो काळा होता, हे निराळे सांगायची गरज नाही. डाव्या बाजूला एक सुरई, उजव्या बाजूल मध्यम वयातील बाई, तारूण्याची तरतरी गमावलेली पण नीटस, ऐसपैसपणाने डोळ्यात भरणारी.
हसनबरोबर त्याचा मित्र होता. खजुरीच्या झाडावरून पुढे जाताना, हसन आपल्या मित्राला म्हणाला, “काय उल्लू लोक असतात पाहा. खजुरीच्या झाडाखाली दारू आणि बाई, ही सोंगे कशाला? यांची घरे काय ओस पडली आहेत? “
मित्राचे हसणे समुद्राच्या वाऱ्यावर खदखदत गेले. हसन तुच्छतेने थुंकला आणि पुढे गेला. नीग्रो काहीच बोलला नाही. बाईही बोलली नाही.
त्या तुच्छतेचा वारा समुद्राला सहन झाला नसावा. समुद्रावरचा वारा एकाएकी वाढू लागला. समुद्रावर कशीबशी तग धरलेली ती नाव चांगलीच गांगरली. आणि हा हा म्हणता आरोळ्यांच्या आवाजात ती नाव उलटली.
हसन समुद्राच्या जवळ होता. त्याने आरोळ्या ऐकल्या आणि गंभीर चेहरा करून काही पुटपुटत मित्रासह हसन पुढे जायला लागला.
झपाटल्यासारखा नीग्रो उठला. तीरासारखा किनारा ओलंाडून आत घुसला. लाटांच्या थपडा सहन करत करत उलटलेल्या नावेपर्यंत पोचला. आणि दोन बुडत्या जीवांना दोन बाजूला धरून, त्याने किनाऱ्याच्या नंदनवनात वर आणून सोडले.
माणसांनी भरलेला आजूबाजूचा सगळा किनारा, त्या काळ्या नीग्रोच्या अभिनंदनासाठी भोवताली जमला. मनाच्या लाजेने हसनही तेथे लोटले. आणि निथळत्या नीग्रो नरवीराला म्हणाले, “तू या दोघांना वाचवले आहेस. पण दारू आणि बाई सोडशील, तर स्वत:ला आणि बाईलाही वाचवशील.”
नीग्रो नम्रतेने म्हणाला, “खाविंद, त्या सुरईत दारू नाही, पाणी आहे. आणि ही बाई माझी आई आहे. “
हसन हादरून गेला. समुद्र पोटात घेईल तर बरे, असे त्याला क्षणभर वाटले. अहंकार आणि भ्याडपणा यात बुडण्यापेक्षा समुद्रात बुडणे बरे, असे त्याला वाटले. नशीब एवढेच की ज्ञानाचा तो क्षण त्याने वाऱ्यावर सोडून दिला नाही. काडीएवढ्या त्या ज्ञानदानाने हसनला वेळेवर वाचवले. आणि थेट आदरणीय संतपदाकडे त्याचे आयुष्य नेले. त्याने आपला अहंकार ज्ञानाच्या समुद्रात बुडवून टाकला होता. दारूपेक्षा तोच जास्ती जलाल असतो, हे त्याला कळले होते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView